Real Estate Investment: वापरासाठी तयार घर किंवा कार्यालय यापलीकडे जाऊन स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी काही वेगळ्या संधी उपलब्ध असतात. औद्योगिक स्थावर मालमत्ता, मोकळी जागा किंवा मिश्र उपयोग करण्यासाठी विकसित केलेली मालमत्ता यासारख्या स्थावर मालमत्तांमध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला , त्या कालावधीमध्ये सामान्यत: लोकप्रिय असलेल्या गुंतवणुकीच्या पलीकडे जाऊन, वेगळ्या ठिकाणी किंवा निराळ्या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते. ती गुंतवणूक आपल्याला भविष्यकाळात फार मोठा परतावा देऊ शकते .
१. औद्योगिक स्थावर मालमत्तेमधील ( इंडस्ट्रियल रिअल इस्टेट ) गुंतवणूक:
कारखाने किंवा कारखान्यांच्या शेड्स, गोदामे, वितरण केंद्रे, शीतगृहे या सारख्या इमारतींना औद्योगिक मालमत्ता असं संबोधलं जातं . औद्योगिक स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करताना त्या मालमत्तेची जागा हा सर्वात मोठा निकष ठेवावा. काही मोक्याच्या जागेवर असलेल्या गोदामांना सतत आणि प्रचंड मागणी असते. महाराष्ट्रातून देशामध्ये जाणारे बहुसंख्य ट्रक्स भिवंडीमार्गे जातात. त्यामुळे नाशिक, वाडा, ठाणे- बेलापूर, पाताळगंगा येथील कारखान्यांमध्ये तयार झालेली उत्पादनं देशभर पाठवण्यापूर्वी आधी भिवंडीमध्ये आणून तेथील गोडाऊन्स मध्ये ठेवली जातात. साहजिकच तेथील गोदामांना नियमित आणि उत्तम भाडं मिळतं राहतं.
आज भारतामध्ये इ-कॉमर्स ची झपाट्याने वाढ होत आहे. अॅमेझॉनसारख्या या व्यवसायातील कंपन्या त्यांच्या ग्राहकांना हवी असलेली अनेक उत्पादनं एखाद्या मोठ्या गोदामामध्ये एकत्र ठेवतात. सततची मागणी, मिळणारा भरपूर नफा आणि उत्पन्न वाढवण्याची संधी यामुळे औद्योगिक मालमत्तेत केलेली गुंतवणूक केवळ पॅसिव्ह गुंतवणूक न राहाता, इच्छा असल्यास, चांगलं उत्पन्न देणारा स्वतंत्र व्यवसाय सुद्धा ठरू शकते .
फायदे :
- अ . उत्पादन करणारे कारखाने किंवा साठवण आणि वितरण करणाऱ्या कंपन्या अशा मालमत्ता प्रदीर्घ काळासाठी भाड्याने घेतात, त्यामुळे स्थिर उत्पन्न मिळत राहते .
- ब. भारतामध्ये सध्या ऑनलाईन शॉपिंग प्रमाणेच अन्य उद्योगांची वाढ होते आहे. त्यामुळे गोदामांना वाढता ग्राहक वर्ग आहे.
- क . निवासी किंवा व्यावसायिक मालमत्तेच्या तुलनेत औद्योगिक मालमत्तेची देखरेख करणं सोप आणि स्वस्त असतं.
- ड . जागतिक आणि स्थानिक पातळीवर ‘उत्पादन ते पुरवठा ‘ या साखळीच महत्त्व वाढतं आहे त्यामुळे भविष्य काळात औद्योगिक मालमत्तेची मागणी वाढत जाणार आहे.
जोखीम :
- अ. औद्योगिक मालमत्ता खरेदीसाठी फार मोठ्या भांडवलाची गरज असते.
- ब. योग्य कालावधीत भाडेकरू मिळाला नाही तर मोठं नुकसान होऊ शकतं.
- क. जागतिक किंवा स्थनिक मंदी आल्यास परतावा खूप कमी होतो कदाचित खंडित सुद्धा होऊ शकतो .
- ड . कारखाना किंवा शेड जर एका विशिष्ट उत्पादनासाठी बांधली असेल तर गरजेनुसार तिच्या मध्ये बदल करणं खर्चिक ठरत.
- इ . सरकारी नियमातील बदल, पर्यावरण नियमातील सुधारणा, औद्योगिक क्षेत्र निश्चितीतील फेरफार या सर्वांचा आपल्या उत्पन्नावर थेट परिणाम होतो .

२. मोकळ्या जागेमधील गुंतवणूक :
ज्या जागेमध्ये कोणत्याही प्रकारचं बांधकाम झालेलं नसतं अशा मोकळ्या जागेमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरतं. काही नवी सरकारी औद्योगिक धोरणं अंमलात आली किंवा त्या जागे जवळपास एखादा पायाभूत सुविधेचा प्रकल्प सुरू झाला तर अशा मोकळ्या जागांच्या किमती फार मोठ्या प्रमाणात वाढतात . साधारण तीस वर्षांपूर्वी मुंबईत वांद्रे आणि कुर्ला यामधील मोकळ्या जागेत ‘डायमंड मार्केट ‘ सुरु झालं आणि आणि तेथील जागांचे भाव रातोरात कित्येक पटीने वाढले – आज सुद्धा सातत्याने वाढत आहेत .
मोकळी जागा घेताना त्या जागेच्या भौगोलिक स्थानाचा अभ्यास करणं आणि सरकार भविष्यकाळात तिथे काय योजना आणू शकते याचा अभ्यास करणं सर्वात महत्वाचं असतं. आपण गावात किंवा अन्यत्र शेतजमीन खरेदी केली आणि जर पुढील काळात ती ‘ नॉन ऍग्रिकल्चरल लँड ‘ म्हणून घोषित झाल्यास त्यावर इमारती बांधण्याचा परवाना मिळाला तरीसुद्धा त्या जमिनीचं मूल्य फार मोठ्या प्रमाणात वाढतं आणि आपल्या गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळू शकतो.
फायदे :
- अ . मोकळ्या जमिनीत गुंतवणूक केल्यामुळे आपल्याला भविष्यकाळात चांगलं उत्पन्न मिळवण्याची तजवीज करता येते.
- ब. जमिनीच्या आजूबाजूचा भाग विकसित झाल्यावर किंवा जमिनीला अपेक्षित परवाने प्राप्त झाल्यावर आपल्याला गुंतवणुकीच्या तुलनेत कितीतरी अधिक नफा मिळतो.
- क. मोकळ्या जमिनीच्या देखभालीचा खर्च अतिशय कमी किंवा कधीकधी नगण्य असतो.
- ड. मोकळ्या जागांचे दर माफक असल्याने गुंतवणूक करण्यासाठी फार भांडवल लागत नाही
जोखीम :
- अ . जागेला सुविधा देण्याचं सरकारी धोरण अमलात येण्यास वेळ लागल्यास जागा तशीच पडून राहते. त्यातून उत्पन्न मिळत नाही. पुढे जाऊन त्या जागेला अथवा त्या परिसराला सुविधा देण्याचं धोरण सरकारने रद्दबादल केल्यास त्या जागेतून परतावा मिळणं अशक्यप्राय होऊ शकतं.
- ब . जमीन रिकामी असल्याने त्वरित उत्पन्न सुरु होत नाही.
- क . आपण जमीन विकण्याचा निर्णय घेतला तर रिकाम्या जमिनीला ग्राहक मिळण्यासाठी खूप वेळ लागू शकतो.
- ड. जागेचा विकास योग्य प्रकारे न झाल्यास नफा अपेक्षेपेक्षा बराच कमी मिळतो.
३. ‘होम स्टे’ म्हणजे घरगुती निवासी व्यवस्थेमध्ये केलेली गुंतवणूक :
एखादा बंगला किंवा घर प्रवाशांना भाड्याने देण्याचा एक नवा व्यवसाय लोकप्रिय होऊ लागला आहे. यामध्ये आपल्याकडे पूर्वीपासून असलेला बांगला किंवा घर काही दिवसांसाठी पर्यटकांना भाड्याने दिले जाते . शक्य असेल तर राहण्याच्या व्यवस्थेबरोबरच जेवण व अन्य सुविधा सुद्धा पर्यटकांना पुरवल्या जातात. या सर्वांमधून घरांध्ये केलेल्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळतो . ‘एअरबीएनबी’ किंवा तत्सम वेबसाईटवर आपली मालमत्ता अपलोड केल्यास तिला संपूर्ण देशभरातील ग्राहक मिळू शकतात .
फायदे :
- अ . ही मालमत्ता शहरी, निमशहरी किंवा अगदी पर्यटन स्थळीअसली तरी तिला ग्राहक सातत्याने मिळत जातात.
- ब. दैनंदिन तत्त्वावर उत्पन्न मिळत असल्याने खर्चाचा बोजा अंगावर पडत नाही.
- क. आपल्या होम स्टेचा अनुभव ग्राहकाला आवडल्यास तो त्याच्या कार्यालयातील सहकाऱ्यांना तसेच नातेवाईक व मित्रांना आपल्या होम स्टे विषयी सांगतो आणि त्यातून आपला ग्राहकवर्ग वाढत जातो. खर्चिक जाहिराती करण्याची गरज पडत नाही.
- ड. ही गुंतवणूक अल्पावधीत जास्त परतावा देते.
- जोखीम :
अ. काही ठिकाणी येणारे ग्राहक हे फक्त एका विशिष्ट सीझनमध्येच येतात. उदाहरणार्थ, लोणावळ्याला पावसाळ्यात होम स्टे ला सर्वात जास्त ग्राहक मिळतात. त्यानंतर ग्राहकांचा राबता कमी होत जातो. त्यामुळे वर्षभराचं आर्थिक नियोजन करताना काळजीपूर्वक आणि काटेकोरपणे करावं लागतं.
ब. प्रवाशांचा होम स्टे चा आनंद आल्हादायक करण्यासाठी ते घर कायम उत्तम प्रकारे ठेवावं लागत . त्याची सतत आणि योग्य देखभाल करावी लागते.
क. ग्राहकाला दिले जाणारे खाद्यपदार्थ ताजे आणि रुचकर असतील याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी पुरेसा वेळद्यावा लागतो.
या लेखाच्या पुढील भागात आपण पाहाणार आहोत, स्थावर मालमत्तेमधील गुंतवणुकीचे आणखी काही महत्त्वाचे मार्ग.
