वादळ म्हटलं की मनात भीती, चलबिचल, मानसिक द्वंद्व सुरू होतं. मे महिन्याच्या पूर्वार्धात भारत-पाकिस्तान त्यानंतर इराण-इस्रायल युद्धाने थरकाप उडविला. ही झाली मानवनिर्मित वादळं. त्यात निसर्गाने देखील भर टाकली. दरवर्षी जुलैपासून पडणारा जोरदार पाऊस यावर्षी मेच्या उत्तरार्धातच विजेच्या कडकडाटासह बरसू लागला. तथापि इराण-इस्रायल युद्धविरामाने या काळ्या ढगांना रुपेरी किनार लाभली. लगोलग बाजारातील अनिश्चितता संपली. गेले २८ कामकाज दिवसांमध्ये २५,२२२ चा उच्चांक आणि २४,४७३ च्या नीचांकाच्या परिघात अडकलेल्या निफ्टी निर्देशांकाने ही अनिश्चितता संपल्यावर, ‘तेजीचं वादळ वारं सुटलं गं’ म्हणत धूम ठोकली. आता निफ्टी २५,६०० च्या पल्याड झेपावला आहे. वादळ म्हटलं की मनात चलबिचल, अस्वस्थता येते. पण हे वादळ बाजाराच्या बाबतीत सुखद अशी तेजीची झुळूक घेऊन आलं. निफ्टी निर्देशांकावरील २५,२००चा अवघड टप्पा जो इतके दिवस पार होत नव्हता तो या वादळवाऱ्यात विनासयास पार केला गेला.
इराण-इस्रायलच्या युद्धबंदीच्या पार्श्वभूमीवर निफ्टी निर्देशांकावर जी तेजी सुरू झाली आहे तिचं स्वरूप काय? ही तेजी शाश्वत आहे की अल्पजीवी, या तेजीचं वरचं लक्ष्य काय असेल, हे आजच्या व पुढील लेखात विस्तृतपणे जाणून घेऊया.
आता चालू असलेल्या तेजीचं सूतोवाच हे या स्तंभातील २६ मे म्हणजे मागच्याच आठवड्यातील ‘ही वाट दूर जाते’ या लेखात केलेले होते. त्या लेखातील वाक्य होतं – “निफ्टी निर्देशांकाच भविष्यकालीन आलेखन करताना, २७,००० ते २९,००० ची तेजीची उत्तुंग शिखरं सर करत ही तेजीची वाट फार दूरवर जाणारी दिसून येते.” भाकित केलेलं वरील वाक्य काळाच्या कसोटीवर तपासू. मे महिन्याच्या पूर्वार्धातील भारत-पाकिस्तान युद्ध, ते संपत नाही तर इराण-इस्रायल युद्ध अशा आव्हानात्मक, जगाला हादरा देणाऱ्या परिस्थितीत निफ्टी निर्देशांक काळाच्या कसोटीवर ‘तावून सुलाखून’ बाहेर आला. या दोन महिन्यात निफ्टी निर्देशांकावर मामुली अशी ७४९ अंशांची (निफ्टी निर्देशांकाचा ११ जूनचा २५,२२२ उच्चांक उणे १३ जूनचा २४,४७३ नीचांक) घसरण झाली. जी निश्चितच आपल्यासाठी उत्साहदायी आहे.
येणाऱ्या दिवसात ९ जुलैपर्यंत एखाद्या हलक्या-फुलक्या घसरणीत, निफ्टी निर्देशांकाला २५,००० ते २४,८०० स्तराचा भरभक्कम आधार आहे. निफ्टी निर्देशांकांने हा स्तर राखल्यास त्या निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य हे २५,८०० ते २६,१०० तर द्वितीय वरचे लक्ष्य हे नवीन उच्चांकाला गवसणी घालणारे म्हणजेच २६,३०० ते २६,५०० असे असेल.
आता गुंतवणूकदारांच्या मनातील दुसरा प्रश्न ‘युद्ध पुन्हा उफाळलं तर?’ ताज्या युद्धांमधून विदारक सत्य परिस्थिती जगासमोर आली ती म्हणजे युद्धाच्या ऐन भरात पाकिस्तान आणि इराण हे दोन्ही देश मध्यस्थ देशांमार्फत युद्धबंदी, तह व्हावा यासाठी मिनतवाऱ्या करत होते. युद्धांमुळे पाकिस्तान आणि इराण हे दोघेही अशक्त, कमकुवत झाले आहेत. त्यामुळे हे दोन्ही देश पुन्हा उचल खातील ही शक्यता कमीच.
युद्ध आणि निर्देशांकांचा उच्चांक याचा आढावा घेतल्यास, १९९९ च्या कारगिल युद्धात निफ्टी निर्देशांक १,३६७ उच्चांकासमीप होता आणि युद्धानंतर १,८१८ चा उच्चांक त्याने नोंदवला. हे २५ वर्षापूर्वीचं उदाहरण झालं. पण अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी २७ सप्टेंबर २०२४ ला निफ्टी निर्देशांकाने २६,२७७ चा उच्चांक मारला तेव्हा रशिया-युक्रेनचं युद्ध ऐन भरात होतं आणि अजूनही ते चालूच आहे. त्यामुळे आता युद्धाची भीती बाजूला ठेवलेली बरी.
आताच्या घडीला खरी चिंता ही अमेरिकेकडून दिली गेलेली तीन महिन्यांची ‘आयात कर सूट अंमलबजावणीच्या मुदत-समाप्ती’ची आहे. येत्या ९ जुलैला ही मुदत संपत आहे. भारताच्या बाबतीत आयात कर हा कमी अथवा सवलतीच्या दरात आल्यास निफ्टी निर्देशांक नवनवीन उच्चांक प्रस्थापित करेल किंवा आयात कर जास्त आकारल्यास निफ्टी निर्देशांक किती गटांगळया खाईल या दोहोंचा आढावा पुढील लेखात विस्तृतपणे घेऊ.
आशीष ठाकूर (लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.)
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.