How Stock Splits affects Share Price सध्या सुशिक्षित मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणावर शेअर्स मध्ये गुंतवणूक करू लागले आहेत, याची कल्पना सातत्याने डी-मॅट खात्यांची होत असलेली वाढ यावरून येते. नव्याने गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना शेअर्स बाबतची फारशी माहिती असतेच असे नाही. उदाहरणार्थ: हक्कभाग (राईट इश्यू)/ बोनस इश्यू/ स्टॉक स्प्लीट (शेअर विभाजन ) आदींबाबतची माहिती…
स्टॉक स्प्लीट म्हणजे काय? ते कसे व का केले जाते?
जेव्हा एखादी कंपनी आपल्या शेअरच्या सध्या असलेल्या दर्शनी किंमतीचे (फेस व्हॅल्यू) विभाजन करते तेव्हा त्याला स्टॉक स्प्लीट (शेअर्स विभाजन) असे म्हणतात. त्यामुळे त्या शेअरची दर्शनी किंमत कमी होते, मात्र कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या वाढते. उदा: जर एखाद्या कंपनीचे आज रु.१० दर्शनी किंमत असणारे ५ कोटी शेअर्स आहेत व त्याची आजची बाजारातील किंमत रु. २५० व कंपनीने १:५ असे विभाजन केले. तर कंपनीचे आता २५ कोटी शेअर्स होतील व त्यामुळे
एका शेअरची दर्शनी किंमत रु.२ इतकी होईल . यामुळे कंपनीच्या भागभांडवलात काहींही फरक होणार नाही.
भागभांडवलात फरक पडत नाही
(५कोटी*१०=रु.५० कोटी व २५कोटी *२ =रू.५० कोटी)
त्याचप्रमाणे भागधारकास ही काहीही फरक पडणार नाही.
उदा: भागधारकाकडे स्टॉक स्प्लीट पूर्वी १०० शेअर्स असतील. तर त्यांचे बाजारमूल्य रु. १००२५०=२५००० असेल आता स्टॉक स्प्लीट नंतर त्याच्याकडे १००५=५०० शेअर्स असतील पण एका शेअरची किंमत आता रु.५० असेल व यामुळे बाजारमूल्य रु.५००*५०=२५००० इतकेच असेल.
शेअर विभाजन १:१, १:२, १:५ व १:१० या प्रमाणात होऊ शकते. विभाजनाचे प्रमाण काय असावे, हे कंपनी व्यवस्थापन ठरवीत असते. उदा: एचडीएफसी बँकेने आत्तापर्यंत २ वेळा आपल्या शेअर्सचे खालीलप्रमाणे विभाजन (स्टॉक
स्प्लीट) केले. १४/०७/२०११ ला रु.१० च्या दर्शनी किमतीच्या शेअरची दर्शनी किंमत रु.२ इतकी केली (१:५) त्यामुळे ज्या भागधारकाकडे या तारखेस १०० शेअर्स होते, त्याचे ५०० शेअर्स झाले व त्या दिवसापासून एचडीएफसीच्या शेअरची दर्शनी किंमत रु.२ इतकी झाली. तर पुन्हा १९/०९/२०१९ ला या रु.२ च्या दर्शनी शेअरची किंमत रु.१ इतकी करून १:१ असे विभाजन केले, यामुळे ज्याचे कडे १९/०९/२०१९ ला ५०० शेअर्स होते, त्याचे आता १००० शेअर्स झाले .थोडक्यात
ज्याच्याकडे १४/०७/२०११ पूर्वी १०० शेअर्स होते व त्याने ते आजतागायत विकले नसतील तर त्याच्याकडे आता रु.१ दर्शनी किंमत असणारे १००० शेअर्स असतील.
स्टॉक स्प्लीट (शेअर्स विभाजन)
स्टॉक स्प्लीट (शेअर्स विभाजन) करण्याचा प्रमुख उद्देश कंपनीच्या शेअर्सची बाजारातील लिक्विडीटी (तरलता ) वाढविणे हा असतो. समजा, जर एचडीएफसी बँकेने आपला शेअर स्प्लीट केलाच नसता तर आज त्यांच्या रु.१० दर्शनी किमतीच्या शेअरची बाजारातील किंमत सुमारे रु.२०००० इतकी असती की, जी आज सुमारे रु.२००० इतकी आहे.(नुकतेच म्हणजे २७ ऑगस्ट २०२५ ला एचडीएफसी बँकेने १:१ बोनस शेअर देऊ केले असल्याने एका शेअर असणाऱ्याकडे आता दोन
शेअर झाले असल्याने प्रती शेअर किंमत सुमारे रु.१००० झाली आहे )
सामान्य गुंतवणूकदारास रु.१००० चा शेअर विकत घेणे शक्य होते. याउलट जर किंमत रु.२०००० असती तर घेता आला असतेच असे नाही. थोडक्यात शेअरची किंमत कमी झाल्याने लिक्विडीटी वाढत असल्याने शेअरच्या खरेदीविक्रीचे प्रमाण वाढते.
बोनस शेअर्स
काहींचा बोनस शेअर व स्प्लीट (विभाजन ) यामध्ये गोंधळ होत असल्याचे दिसून येते. बोनस इश्यू मध्ये १:१, २:१, ५:१ व १०:१ या प्रमाणात बोनस शेअर्स मिळत असले तरी इथे शेअर्सची दर्शनी किंमत बदलत नाही व शेअर्स राखीव निधीतून दिले जात असल्याने कंपनीच्या एकूण भांडवलात सुद्धा वाढ होत नाही. फक्त राखीव निधी जेवढा कमी होतो, तेवढेच वसूल भाग भांडवल वाढते. बोनस मिळताना ज्या प्रमाणात शेअर्स मिळतात, त्याच प्रमाणात त्या शेअरची बाजारातील
किंमत कमी होत असल्याने भागधारकाकडे बोनस मिळण्यापूर्वी असलेले बाजार मूल्य व बोनस मिळाल्यानंतरच्या वाढीव शेअर्सचे बाजार मूल्य जवळजवळ सारखेच असते.
स्प्लीट मध्येसुद्धा एकूण भागभांडवलात वाढ होत नाही शिवाय वसूल भागभांडवल व राखीव निधी यातही काही बदल होत नाही, फक्त शेअरची दर्शनी किंमत ज्या प्रमाणात कमी होते त्या प्रमाणात शेअर्सची संख्या वाढत असल्याने
वसूल भाग भांडवल आहे तेव्हढेच राहते.
रेकॉर्ड डेट
स्टॉक स्प्लीट तसेच बोनस जाहीर करताना एक रेकॉर्ड डेट ठरविली जाते व ती जाहीर केली जाते. या रेकोर्ड डेटला आपल्याकडे जेवढे शेअर असतील व स्प्लीट अथवा बोनस शेअरचे जे प्रमाण जाहीर केले असेल, त्या प्रमाणात शेअर मिळतात. यामुळे बरेच गुंतवणूकदार रेकॉर्ड डेटच्या आधी शेअर्स घेतात व यामुळे या काळात मागणी वाढल्यामुळे
सबंधित शेअरच्या रेकोर्ड डेटपर्यंत बाजारातील किंमत वाढत असल्याचे बऱ्याचदा दिसून येते.