भांडवली बाजारातील चढ-उतारांमुळे गुंतवणूकदारांना कधी नफा होतो तर कधी तोट्याला देखील सामोरे जावे लागते. तसेच जे करदाते उद्योग-व्यवसाय करतात त्यांना नफा किंवा तोटा होतो. करदात्याला नफा झाल्यास तो करपात्र असतो आणि तोटा झाल्यास तो आपला कर वाचवू शकतो. असे या वर्षी न करता आल्यास तो पुढील वर्षी सुद्धा त्याचा लाभ घेऊ शकतो. असे केल्यास करदात्याचे करदायित्व कमी होऊ शकते. यासाठी प्राप्तिकर कायद्यात काही नियम आणि अटी आहेत. याची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.

उत्पन्न आणि तोटा :

प्राप्तिकर कायद्यानुसार करदात्याला त्याचे उत्पन्न पाच स्रोतांमध्ये विभागावे लागते. यामध्ये पगाराचे उत्पन्न, घरभाडे उत्पन्न, उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न, भांडवली नफा आणि इतर उत्पन्न या पाच उत्पन्नाचा समावेश आहे. करदात्याला जे उत्पन्न मिळते ते याच पाच उत्पन्नाच्या स्त्रोतात विभागावे लागते. प्रत्येक उत्पन्नाच्या स्त्रोतात मिळणाऱ्या उत्पन्नासाठी नियम वेग-वेगळे आहेत, त्यातून मिळणाऱ्या वजावटी वेगवेगळ्या आहेत तर काही उत्पन्नाच्या बाबतीत कराचा दर सुद्धा वेगवेगळा आहे. त्यामुळे करदात्याला त्याचे उत्पन्न योग्य स्त्रोतात विभागणे गरजेचे आहे.

करदात्याला ज्या व्यवहारात तोटा होतो, तो त्याच स्त्रोतांमध्ये विभागावा लागतो. हा तोटा घरभाडे उत्पन्न, उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न, भांडवली नफा या स्त्रोताच्या उत्पन्नात होऊ शकतो. असा तोटा झाल्यास करदात्याला तो दुसऱ्या उत्पन्नातून वजा करता येतो. उत्पन्नातून असा तोटा वजा केल्यास करदात्याचा कर वाचू शकतो. त्यासाठी काही नियम आहेत. तसेच हा तोटा इतर उत्पन्नातून वजा करण्यासाठी एक ठराविक क्रम आहे आणि त्या क्रमानुसार तो उत्पन्नातून वजा करता येतो किंवा पुढील वर्षांसाठी कॅरी-फॉरवर्ड करता येतो.

हा क्रम खालीलप्रमाणे :

१. त्याच उत्पन्नाच्या स्रोतांतून प्रथम वजावट

२. इतर स्त्रोतातील उत्पन्नातून वजावट

३. पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड

करदात्याला तोटा झाल्यास तो त्याच स्त्रोतातील उत्पन्नातून वजा करता येतो, तो होत नसेल किंवा काही बाकी शिल्लक असेल तर तो इतर स्त्रोतातील उत्पन्नातून वजा करता येतो, तो होत नसेल किंवा काही बाकी शिल्लक असेल तर तो पुढील वर्षांसाठी कॅरी-फॉरवर्ड करता येतो. करदात्याला याच क्रमामध्ये तोट्याची वजावट घेता येते. परंतु या प्रत्येक क्रमामध्ये काही अपवाद आहेत.

त्याच उत्पन्नाच्या स्त्रोतातून प्रथम वजावट :

करदात्याला ज्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये तोटा झाला असेल तर तो प्रथम त्याच उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये झालेल्या नफ्यामधून वजा करता येतो. उदा. करदात्याला एका उद्योग व्यवसायाच्या उत्पन्नात तोटा झाल्यास तो तोटा दुसऱ्या उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नातून प्रथम वजा करावा लागतो. याला अपवाद आहे सट्टा व्यवहारातील (ज्या व्यवहारात मालाचा ताबा घेतला जात नाही) तोटा, जो इतर उद्योग-व्यवसायातील उत्पन्नातून वजा करता येत नाही, तो फक्त सट्टा व्यवहारातील नफ्यामधूनच वजा करता येतो. याशिवाय घोड्याच्या व्यवसायातील तोटा हा फक्त घोड्याच्या व्यवसायातील उत्पन्नातूनच वजा करता येतो, लॉटरी, शब्दकोडे, पत्तेखेळ, किंवा जुगार, बेटिंग मधील तोटा इतर कोणत्याही उत्पन्नातून वजा करता येत नाही.

दीर्घमुदतीचा भांडवली तोटा हा फक्त दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो, अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येत नाही. अल्पमुदतीचा भांडवली तोटा मात्र दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातून किंवा अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो. उदा. करदात्याला घराच्या विक्रीतून दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला आणि समभागाच्या विक्रीतून दीर्घमुदतीचा किंवा अल्पमुदतीचा भांडवली तोटा झाल्यास हा तोटा घरातील दीर्घमुदतीच्या नफ्यातून वजा करता येतो.

इतर स्रोतांतील उत्पन्नातून वजावट :

एका उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये झालेला तोटा त्याच स्त्रोतामधून वजा होत नसेल तर तो इतर स्त्रोतामधील उत्पन्नामधून वजा करता येतो.

याला अपवाद खालीलप्रमाणे :

अ. भांडवली तोटा हा इतर स्रोतांच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही.

आ. उद्योग-व्यवसायातील तोटा पगाराच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही.

इ. घराच्या उत्पन्नातील तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येतो, परंतु फक्त २ लाख रुपयांपर्यंतचाच तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येतो. करदात्याने नवीन करप्रणाली स्वीकारल्यास हा २ लाख रुपयांचा तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही.

ई. कोणत्याही उत्पन्नाच्या स्रोतांमधील तोटा हा लॉटरी, शब्दकोडे, पत्तेखेळ, किंवा जुगार, बेटिंगमधील उत्पन्नातून वजा करता येत नाही.

उ. कोणत्याही उत्पन्नाच्या स्रोतांमधील तोटा हा घोड्याच्या शर्यतीच्या / व्यवसायातील उत्पन्नातून वजा करता येत नाही.

ऊ. आभासी चलनाच्या व्यवहारात झालेला तोटा हा इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही.

पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड :

एका उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये झालेला तोटा त्या स्रोतांमधून वजा होत नसेल आणि तो इतर स्रोतांमधील उत्पन्नामधून सुद्धा वजा होत नसेल तर तो पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो. हा पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड केलेला तोटा पुढील वर्षातील उत्पन्नातून वजा करता येतो. यासाठी सुद्धा काही नियम आहेत.

१. ज्या वर्षी तोटा झाला आहे, तो तोटा पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करावयाचा आहे त्या वर्षीचे विवरणपत्र मुदतीत दाखल करणे बंधनकारक आहे.

 हा नियम घर-भाडे उत्पन्नांतर्गत तोट्याच्या कॅरी-फॉरवर्डसाठी लागू नाही. ज्या वर्षी तोटा नाही परंतु मागील वर्षीचा तोटा पुढील वर्षासाठी कॅरी-फॉरवर्ड करावयाचा असेल तर विवरणपत्र मुदतीत दाखल करण्याची अट नाही.

२. सट्टा व्यवसायातील तोटा हा त्याच वर्षीच्या सट्टा व्यवसायाच्या नफ्यातून वजा न झाल्यास पुढील ४ वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो.

३. घरभाडे उत्पन्नाच्या तील तोटा हा पुढील ८ वर्षांसाठी कॅरी-फॉरवर्ड करता येतो आणि पुढील वर्षी फक्त घरभाडे उत्पन्नातूनच वजा करता येतो.

४. उद्योग-व्यवसायातील तोटा हा पुढील ८ वर्षांसाठी कॅरी-फॉरवर्ड करता येतो आणि पुढील वर्षी फक्त उद्योग-व्यवसायातील उत्पन्नातूनच वजा करता येतो.

५. भांडवली तोटा हा पुढील ८ वर्षांसाठी कॅरी-फॉरवर्ड करता येतो. पुढील वर्षी दीर्घमुदतीचा भांडवली तोटा हा फक्त दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो आणि अल्पमुदतीचा भांडवली तोटा पुढील वर्षी दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातून किंवा अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो.

६. करदात्याला झालेला तोटा दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही.

७. करदाता कॅरी-फॉरवर्ड केलेला तोटा पुढील ४ वर्षात (सट्टा व्यवसायातील तोट्यासाठी) आणि या व्यतिरिक्त तोटा पुढील ८ वर्षात उत्पन्नातून वजा करू शकला नाही तर तो रद्द होतो. या मुदतीनंतर तो उत्पन्नातून वजा करता येत नाही किंवा कॅरी-फॉरवर्ड सुद्धा करता येत नाही.

pravindeshpande1966@gmail.com