RBI Repo Rate Effect on House and Vehicle Loan: जेव्हा रिझर्व्ह बँक आपले द्वैमासिक पत धोरण जाहीर करते, तेव्हा त्यात प्रामुख्याने रेपो रेट बाबत उल्लेख असतो व त्यानुसार प्रचलित रेपो रेट मध्ये एकतर बदल होत असतो किंवा तो आहे तसाच ठेवला जातो. रेपो रेट जाहीर होताच त्यानुसार टीव्ही व अन्य समाज माध्यमांवर (सोशल मिडिया) प्रतिक्रिया उमटू लागतात. पण रेपो रेट म्हणजे नेमके काय व त्याचा आपल्यावर काय व कसा परिणाम होतो हे मात्र बहुतेकांना माहीत नसते. म्हणून आधी आपण रेपो रेट म्हणजे काय ते समजून घेऊ.
रेपो (रीपर्चेस ऑप्शन) रेट म्हणजे ज्या व्याज दराने रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देऊ करते तो व्याज दर व असे कर्ज देताना बँका त्यांच्याकडे असलेले कर्जरोखे नोशनली (काल्पनिकरित्या) रिझर्व्ह बँकेला विकत असतात व असे नोशनली विकलेले कर्जरोखे परत विकत घेण्याची (रीपर्चेस) हमी देत असतात. सामान्यत: असे कर्ज बँका आपल्या अल्पकालीन गरजांसाठी घेत असतात. साहजिकच जर बँकांना मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर वाढला, तर बँकांना ग्राहकांना दिलेल्या कर्जाचा व्याजदर वाढवावा लागतो. कारण सध्या बँका आपली इंटरेस्ट रिस्क कमी करण्यासाठी ग्राहकांना कर्ज देताना फ्लोटिंग इंटरेस्ट रेट पद्धतीने कर्ज देतात, त्यामुळे त्यांना द्याव्या लागणाऱ्या व्याजानुसार ग्राहकांकडून (कर्जदारांकडून) व्याज आकारता येते. थोडक्यात बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाच्या दरात वाढ झाली तर बँका आपल्या कर्जदारांना आकारत असलेल्या व्याजदरात वाढ करतात आणि बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाच्या दरात घट झाली तर बँका आपल्या कर्जदारांना आकारत असलेल्या व्याज दरात घट करतात.
…तर व्याजदर बदलत नाही
जर व्याजदर आहे तोच राहिला तर बँका आपला व्याजदर बदलत नाहीत. सध्या फ्लोटिंग इंटरेस्टसाठीचा बेस रेट (आधारभूत दर ) रेपो रेट असल्याने, रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरणात रेपो रेटमध्ये वाढ केली तर बँका आपल्या कर्जाच्या व्याज दरात वाढ करतात आणि तो कमी केला तर कर्जाचा व्याजदर कमी करतात आणि जर रेपो रेटआहे तोच ठेवला तर कर्जाचे व्याज दर बदलत नाहीत.
सध्या बँकांचे व्याज दर रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (आरएलएलआर) पद्धतीचे असतात. उदाहरणार्थ एखाद्या बँकेचा गृह कर्जासाठीचा व्याज दर आरएलएलआर रेपो +१.५ असेल आणि जर पत धोरणात रेपो रेटमध्ये ०.५०% वाढ झाली तर त्या बँकेच्या गृह कर्ज दरात ०.५०% इतकी वाढ केली जाईल याउलट जर रेपो रेट मध्ये ०.२५% इतकी घट झाली तर गृह कर्जाचा व्याज दर ०.२५% कमी केला जाईल व हे बदल ज्या ज्या वेळी पत धोरणात केले जातात त्या त्या वेळी कर्जाच्या व्याज दरात त्यानुसार केले जातात. प्रत्येक बँकेचा आरएलएलआर वेगळा असू शकतो.
थोडक्यात, द्वैमासिक पत धोरणातील रेपो रेटच्या बदलानुसार आपल्या गृह कर्ज , वाहन कर्ज वा तत्सम कर्जांचे व्याज दर बदलत असतात. असे व्याज दर वाढल्यावर आपला कर्जाचा हप्ता वाढत नाही तर कर्ज परतफेडीचा कालावधी वाढतो या उलट व्याज दर कमी झाल्यास आपला कर्जाचा हप्ता कमी होत नाही तर कर्ज परतफेडीचा कालावधी कमी होतो हे समजून घेणे गरजेचे आहे.