प्रश्न : बँकातील कमी होणारे व्याजदर विचारात घेता, म्युच्युअल फंड योजना पर्याय ठरू शकतात का?
उत्तर : म्युच्युअल फंड, शेअर बाजार, कर्जरोखे, बँकातील मुदत ठेवी, पोस्टातील बचत योजना, सरकारी कर्जरोखे, सोने-चांदीतील गुंतवणूक हे सध्याच्या स्थितीला गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेले हक्काचे गुंतवणूक पर्याय आहेत. या विविध गुंतवणूक पर्यायांचा विचार केल्यास प्रत्येक पर्यायाची जोखीम आणि परतावा या संबंधातील स्थिती वेगवेगळी आहे. आपण गुंतवणूक करताना याचा विचार केंद्रस्थानी ठेवून आपला निर्णय घेणे गरजेचे आहे.
सर्वसामान्य गुंतवणूकदारांना अनेक वर्षांपासून आपले पैसे बँकेत ठेवण्याची सवय झालेली असल्यामुळे आणि वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच्या काळात बँकांकडून मिळणारा व्याजाचा दरही चांगला असल्यामुळे याच गुंतवणुकीची सवय लागली आहे.
बँकातील ठेवी कालबाह्य झाल्या आहेत का?
माझ्या मते या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. बँकेमध्ये दोन प्रकारच्या ठेवींमध्ये पैसे गुंतवले जातात. यातील पहिला पर्याय बचत खात्यातील ठेवी व दुसरा मुदत ठेवी. मुदत ठेवींवर व्याज मिळत असल्याने तो गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय ठरतो. मात्र ती गुंतवणूक किती वर्षासाठी करायची आहे? हा निकष लावायचा झाल्यास बँकेतील मुदत ठेवींच्या तुलनेत म्युच्युअल फंड हा खात्रीशीर पर्याय म्हणून पुढे येऊ लागला आहे, यात काहीही शंका नाही.
एखाद्या व्यक्तीला आपल्या पोर्टफोलिओतील मुदत ठेवी काढून टाकून पूर्णपणे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल तर काही मुद्दे विचारात घ्यावे लागतील. म्युच्युअल फंडातील समभाग संलग्न अर्थात इक्विटी प्रकारच्या योजनेत गुंतवणूक केल्यास बँकेतील ठेवींपेक्षा कायमच जोखीम अधिक असते आणि परतावा मिळण्याची कोणतीही शक्यता गृहीत धरता येत नाही.
तुम्ही मुदत ठेवीत जे पैसे गुंतवले आहेत ते तुम्हाला नक्कीच कधी हवे आहेत, याचा विचार पक्का नसेल तर गुंतवणूकविषयक निर्णय घेणे कठीण होते.
एक उदाहरण घेऊ या – एका कुटुंबाला पाच लाख रुपये गुंतवायचे आहेत. मुलाच्या शिक्षणासाठी ते पैसे कदाचित तीन वर्षानंतर लागू शकतात. पण अशी परिस्थितीसुद्धा येऊ शकेल की ते पैसे पाच वर्षे लागणारही नाही. अशा वेळी इक्विटी म्युच्युअल फंडाचा पर्याय अधिक जोखीम असणारा आहे, म्हणून बँकांमध्ये पैसे ठेवणे लोक पसंत करतील.
फक्त इक्विटी फंडच असतात का?
म्युच्युअल फंडात इक्विटी फंड योजनांमधील परतावे घसघशीत असल्यामुळे त्याची सदैव चर्चा होत असते. मात्र रोखे संलग्न म्युच्युअल फंडांमध्ये (डेट फंड) पैसे गुंतवले जाऊ शकतात, हा विचारच बऱ्याचदा मागे पडतो. वर उदाहरण घेतले, त्या कुटुंबाला बँकेमधील मुदत ठेवींमधून मिळणारा परतावा अगदीच कमी वाटत असेल तर गुंतवणूक करायची असलेली एकूण रक्कम दोन प्रकारे विभागणी करून गुंतवली जाऊ शकते. अर्धे पैसे बँकांच्या मुदत ठेवीत ठेवता येऊ शकतात व उरलेले पैसे म्युच्युअल फंडातील रोखे संलग्न म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवता येतात. म्युच्युअल फंडातील रोखे संलग्न म्युच्युअल फंड योजना सरकारी कर्जरोखे, खासगी कंपन्यांनी विक्रीला काढलेले कर्जरोखे अशा निश्चित व्याज देणाऱ्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवत असते. बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा हा मिळणारा परतावा उजवा असतो. रोखे संलग्न म्युच्युअल फंडाचेही अनेक प्रकार पडतात. प्रत्येक प्रकारानुसार त्यातील जोखीम कमी-जास्त होते. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेले पतधोरण महागाईचा दर आणि रोखे संलग्न म्युच्युअल फंड योजनांचा परतावा यांच्यातला संबंध समजून घेतला पाहिजे.
हायब्रिड फंड केव्हा उपयोगी पडतात?
बँकेत ज्येष्ठ नागरिक दीर्घकाळासाठी पैसे गुंतवतात व त्यांनी गुंतवलेली रक्कम ही मोठी असते. अर्थातच त्यामागील हेतू मोठ्या रकमेवरील व्याजाचा लाभ घेणे हा असतो. याला पर्याय म्हणून म्युच्युअल फंडातील काँझर्व्हेटिव्ह हायब्रिड आणि इक्विटी हायब्रिड या दोन फंड योजनांचा विचार करता येईल.
काँझर्व्हेटिव्ह व्हायब्रिड फंडात वीस ते पंचवीस टक्के रक्कम इक्विटी शेअरमध्ये तर उरलेली रक्कम स्थिर उत्पन्नाच्या पर्यायांमध्ये गुंतवलेली असते. इक्विटी हायब्रिड फंडात किंवा अग्रेसिव्ह हायब्रिड फंडात याउलट सुमारे ६० टक्के रक्कम व उर्वरित रक्कम स्थिर उत्पन्नाच्या पर्यायात गुंतवलेली असते.
हायब्रिड फंड इक्विटी गुंतवणुकीमुळे मिळणारे फायदे करून देतात आणि डेट फंडामधून मिळणारी सुरक्षितता मिळवून देतात. पाच ते दहा वर्षे बँकेत मुदत ठेव करण्यापेक्षा थोडे पैसे या प्रकारच्या हायब्रिड योजनांमध्ये गुंतवणे हा पर्याय अगदीच स्वीकार करण्याजोगा आहे.
आगामी काळातील दिशा
ज्यांचे वय आता ४५ पेक्षा अधिक असेल त्यांनी आपल्या सेवानिवृत्तीनंतरच्या महिन्याच्या खर्चाच्या तरतुदीसाठी बँकांच्या मुदत ठेवीऐवजी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा विचार करायला हरकत नाही. दहा वर्षांपेक्षा अधिक काळ ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या न्यायानुसार थोडे थोडे पैसे गुंतवत राहिल्यास जो निधी जमा होईल त्यातून दर महिन्याला पैसे खर्चासाठी वापरण्यासाठी काढता येतील असेही नियोजन करता येते.
तुम्ही उच्च उत्पन्न गटातील असल्यास बँकांमध्ये असलेल्या मुदत ठेवीवरील व्याजावर आकारल्या जाणाऱ्या कराचा विचार करता म्युच्युअल फंड हा सरस पर्याय ठरतो यात शंकाच नाही.
जर तुम्हाला तीन महिने, सहा महिने किंवा एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी पैसे ठेवायचे असतील व ते पैसे नक्कीच लागणार असतील तर बँकेतील मुदत ठेवींच्या (एफडी) ऐवजी म्युच्युअल फंडात पैसे ठेवणे फारसे योग्य धोरण असणार नाही. थोडक्यात बँकातील मुदत ठेवी कालबाह्य झालेल्या नसून त्याची उपयुक्तता मर्यादित आहे.