भविष्यकाळातील आपल्या काही योजना, ध्येय, इच्छा किंवा आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण निर्माण केलेली साधनं म्हणजे आपली ‘गुंतवणूक’! सर्वसाधारणपणे, आपले खर्च भागवल्यानंतर आपल्याकडे जी अतिरिक्त रक्कम उरते ती आपण गुंतवणूक करण्यासाठी वापरतो.
आपल्या जीवनामध्ये, मुलांचं उच्चशिक्षण किंवा लग्नकार्य, घराची किंवा वाहनाची खरेदी, कुटुंबाबरोबर सहलीसाठी परदेशी जाणं किंवा निवृत्ती नंतर आपल्या खर्चासाठी पुरेसे पैसे उपलब्ध असणं, दुर्दैवाने कुटुंबातील कुणी व्यक्ती आजारी पडली तर तिच्या उपचारासाठी पुरेशा निधीची सोय करणं या सारखी एक किंवा अनेक लहान-मोठी उद्दिष्टं असतात. ती पूर्ण करता यावीत यासाठी आपण आपल्या दैनंदिन खर्चामध्ये काटकसर करून नित्य-नियमाने कमी-अधिक बचत करत असतो. परंतु बचत आणि गुंतवणूक या दोन गोष्टी परस्परांपासून पूर्णपणे भिन्न आहेत .
बचतीमध्ये आपण आपला खर्च आपल्या उत्पन्नापेक्षा कमी करतो. त्यामुळे वाचलेले पैसे बाजूला ठेवतो. वेळेस ते पैसे बँकेच्या बचत खात्यामध्येच ठेवले जातात. बँक त्यावर जुजबी व्याज दराने थोडं व्याज देते. बचती मधून फार मोठा आर्थिक फायदा होत नाही. तशी आपली अपेक्षा सुद्धा नसते. ते पैसे सुरक्षित असतात आणि आपल्याला हवे तेव्हा आपल्या खात्यातून काढून घेऊन आपण ते वापरू शकतो, एवढंच आपल्याला पुरेसं असतं.
या उलट, गुंतवणूक करताना आपण गुंतवलेल्या पैशांवर जास्ती जास्त परतावा किंवा फायदा मिळावा अशी आपली अपेक्षा असते. परंतु, गुंतवलेल्या पैशांमधून आपण भरपूर फायदा मिळवू शकतो. त्याच बरोबर आपण ते सर्व पैसे किंवा त्यातील काही भाग गमावू सुद्धा शकतो. पैसे गमावण्याच्या धोका हा गुंतवणूकीचा एक अविभाज्य भाग आहे. कोणत्याही गुंतवणुकीमधून मिळू शकणारा फायदा आणि त्या गुंतवणुकी मध्ये पैसे गमावण्याच्या असलेला धोका यांचा परस्पर संबंध ‘समप्रमाणा’चा आहे. म्हणजे, कोणत्याही गुंतवणुकी मधून मिळणारा फायदा जितका जास्त असतो, तितकाच जास्त धोका सुद्धा, त्या गुंतवणुकीत असतो. त्यामुळे गुंतवणूक करताना त्या गुंतवणुकी मागचं आपलं नेमकं उद्द्दीष्ट, आपल्या आर्थिक क्षमता व मर्यादा आणि धोका पत्करण्याची आपली आर्थिक व मानसिक तयारी याचा संपूर्ण विचार करावा.
आपली उद्दिष्ट, क्षमता आणि मानसिकता या सर्वांना योग्य ठरतील अशी गुंतवणूकीची विविध साधनं आज उपलब्ध आहेत . त्यांचा अभ्यास करून त्यामधून मधून आपल्याला सर्वात योग्य ठरेल असं साधन निवडावं. आपल्यासाठी सर्वाधिक योग्य असणारं गुंतवणूकीचं साधन वापरल्यास ती गुंतवणूक सर्वोत्तम फायदे मिळवून देते.
गुंतवणूक करण्यापूर्वी या सर्व साधनांविषयी आणि एकूणच गुंतवणुकीविषयी सर्वांगीण तपशील समजून घेतल्यास, आपली गुंतवणूक अधिक सुरक्षित आणि जास्त नफा मिळवून देणारी ठरेल.
गुंतवणुकीचे तीन प्रमुख प्रकार
१. मालकी हक्क देणारी गुंतवणूक
या प्रकारामध्ये गुंतवणूकदार ज्यामध्ये गुंतवणूक करायची आहे ती साधनं विकत घेतो. त्या साधनांमध्ये घर, जमीन किंवा शेत या सारख्या मालमत्ता , कंपन्यांचे समभाग आणि सोनं या सारख्या वस्तूंचा समावेश होतो. एखाद्या कंपनीमध्ये भांडवल गुंतवून त्या बदल्यात त्या कंपनीचा काही हिस्सा विकत घेणं ही गुंतवणूक सुद्धा मालकी हक्क देणारी गुंतवणूक ठरते. या प्रकारची गुंतवणूक केल्यावर मालमत्तेवर मिळणारं नियमित भाडं किंवा समभागांवर मिळणारे डिव्हिडंडस यातून सातत्याने उत्पन्न मिळत राहतं. त्याचबरोबर गरजेच्या वेळी ती साधनं विकून त्यातून उत्तम नफा मिळवता येतो.
२. इतरांना पैसे वापरायला देणारी गुंतवणूक
या प्रकारामध्ये गुंतवणूकदार आपले पैसे इतर संस्था किंवा कंपन्यांना वापरायला देतो व त्या बदल्यात त्या संस्था व कंपन्यांकडून विविध स्वरूपात आर्थिक परतावा तसेच इतर काही सुविधा मिळवतो. विविध कॉर्पोरेट आणि सरकारी बॉण्ड्स किंवा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवलेले पैसे हे या प्रकारामध्ये येतात. या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये गुंतवणूकदार स्वतःच एका बँकेची भूमिका बजावतो. तो आपले पैसे इतरांना त्यांच्या कामासाठी पैसे पुरवतो व त्यांच्याकडून व्याज किंवा ‘नफ्यातील हिस्सा’ या स्वरूपात परतावा घेतो. सरकारी बॉण्ड्स मध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदाराला आर्थिक परताव्याबरोबरच करांमध्ये सवलत किंवा तत्सम अन्य सुविधा सुद्धा मिळतात. आपल्या बँकेत आपण फिक्स डिपॉझिटला ठेवलेली रक्कम आणि अगदी आपल्या बचत खात्यात ठेवलेले पैसे सुद्धा याच प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये येतात.
३. रोख रक्कम देणारी गुंतवणूक
या प्रकारच्या गुंवणूकीमधून रोख रक्कम लगेच आणि सहजतेने उभी करता येते. शेअर मार्केटमध्ये अल्पकालीन नफा डोळ्यासमोर ठेऊन केलेली समभागांची खरेदी -विक्री हे या प्रकारच्या गुंतवणुकीचं उत्तम उदाहरण आहे. या गुंतवणुकीमध्ये गुंतवणूकदार जेव्हा एखाद्या कंपनीच्या समभागांचे भाव थोडे कमी होतात तेव्हा ते समभाग खरेदी करतो. त्या समभागांचे भाव त्याच्या खरेदीच्या किंमतीपेक्षा थोडे जरी वाढले तरी लगेच तो ते समभाग विकून त्या बदल्यात रोख पैसे घेतो. गुंतवणुकीच्या या प्रकारच्या व्यवहारांमध्ये मिळणाऱ्या फायद्याचं प्रमाण कमी असतं पण त्याच बरोबर, या व्यवहारामध्ये पैसे बुडण्याचा धोका सुद्धा कमी असतो .
आपल्या गुंतवणुकीमधून जास्तीजास्त फायदा मिळवण्यासाठी आणि ती सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतवणूक करताना पुढील गोष्टी काटेकोरपणे कराव्यात.
१. गुंतवणूकीमागील उद्देश आणि आपली सांपत्तिक स्थिती
गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणुकीमागचं आपलं उद्दिष्ट निश्चित करावं. त्याचबरोबर आपली सांपत्तिक स्थिती, आपलं सध्याचं उत्पन्न, त्यामध्ये होऊ शकणारी वाढ किंवा घट, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, कुटुंबातील कमावत्या व्यक्तींची संख्या हे सर्व घटक विचारत घेऊन आपण गुंतवणुकीसाठी नेमकी किती रक्कम बाजूला काढू शकतो हे ठरवावं. आपल्याला एक मुलगा असेल तर त्याच्या उच्च शिक्षणासाठी करायच्या गुंतवणुकीचा कालावधी आणि पद्धत हे आपल्याला दोन मुलं असतील तर त्या दोघांच्या उच्च शिक्षणासाठी करायच्या गुंतवणुकीचा कालावधी आणि पद्धतीपेक्षा वेगळी असेल. त्यामुळे, गुंतवणूक करताना आपल्या नेमक्या गरजा आणि क्षमता यांचा वस्तुनिष्ठ विचार करावा.
२. गुंतवणुकीमधील वैविध्य :
आपली सर्व गुंतवणूक मालमत्ता किंवा कंपन्यांचे समभाग या सारख्या एकाच साधनांमध्ये न गुंतवता अनेक साधनांमध्ये करावी . त्यापैकी काही साधनांमधून परतावा जास्त मिळेल पण धोका जास्त असेल तर काहींमध्ये धोका कमी असेल पण परतावा सुद्धा कमी मिळेल. आपल्या एकूण गुंतवणुकीमध्ये दोन्ही प्रकारच्या साधनांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करावा. आवश्यकता वाटल्यास, कमी परतावा देणाऱ्या पण कठीण प्रसंगी आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊ शकणाऱ्या ‘इन्शुरन्स’ साधनांचा गुंतवणुकीमध्ये समवेश करावा.
३. गुंतवणुकीच्या कालावधीचा सर्वांगीण विचार :
गुंतवणुकीचा कालावधी हा गुंतवणुकीमधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. गुंतवणुकीच्या सुरवातीलाच त्याचं योग्य नियोजन करणं आवश्यक असतं . समजा, आपल्या निवृत्तीनंतर आपल्याला नियमित पैसे मिळावेत हे आपल्या गुंतवणुकीमागचं उद्दिष्ट असेल तर आपल्या निवृत्तीनंतरच्या पुढच्याच महिन्या पासून ते पैसे मिळायला सुरवात व्हावी असं नियोजन गुंतवणुकीच्या सुरवातीलाच करावं.
४. आपल्या गुंतवणुकीचा नियमित आढावा :
जगात घडणाऱ्या अनेक घटनांचे पडसाद बाजारपेठेमध्ये उमटत असतात. त्याचे परिणाम गुंतवणुकीच्या सर्वच साधनांवर होतात. त्यामुळे, कंपन्यांच्या समभागांसारख्या अस्थिर गुंतवणुकीपासून ते फिक्स डिपॉझिटसारख्या स्थिर आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या साधनामधून मिळणाऱ्या परताव्यामध्ये सुद्धा सतत बदल होत राहतात. आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यातून फायदा मिळवण्यासाठी या सर्व बदलांची माहिती आपल्याला असणं अत्यावश्यक असतं . म्हणून, आपल्या सर्व गुंतवणुकींचा नियमितपणे आढावा घेणं आणि वेळप्रसंगी, आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करणं आवश्यक ठरतं.
सुयोग्य प्रकारे केलेली गुंतवणूक कमावलेली संपत्ती वृद्धिंगत करते. तसंच, ती आपली अनेक ध्येयं पूर्ण करण्यासाठी आणि अडी -अडचणीच्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा, आवश्यक तो निधी उपलब्ध करून देते ! एक प्रकारे, आपली उद्दिष्टं आणि इच्छा पूर्ण करणं हे आपण किती पैसे कमावतो यापेक्षा आपण ते पैसे कसे गुंतवतो यावर जास्त अवलंबून असतं!!