करोना साथीच्या काळात एकूण सर्वच व्यवहार संपर्करहित करणे आवश्यक होते या उद्देशाने डिजिटल पेमेंटला विशेष प्राधान्य देण्यात आले अशा व्यवहारातील जलदता व सहजता यामुळे डिजिटल व्यवहाराना चांगला प्रतिसाद मिळू लागला. आज तर बहुतेक सर्वजण आपले दैनंदिन आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीनेच करीत आहे, इतकेच नव्हे तर आपल्या युपीआय प्रणालीचा अनेक देशात वापर सुरु झाला आहे. आर्थिक व्यवहारातील वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे खरे तर आपली चांगली सोयच झाली आहे. यामुळे आर्थिक व्यवहार रोख रकमेत न होता बँकेमार्फतच होतात यामुळे काळ्या पैशाच्या वाढीस आळा बसण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होत आहे.

ही जरी जमेची बाजू असली तरी अशा डिजिटल व्यवहारात होणाऱ्या घोटाळ्यांचे /फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. असे घोटाळे/फसवणूक क्यूआरकोडच्या गैर वापर, मोबाईल सिम कार्ड /वीज कनेक्शन/गॅस कनेक्शन बंद करण्याच्या धमक्या देणारे निनावी फोन, मेल व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस , बक्षिस लागले असल्याची खोटी मेल , डिजिटल अरेस्ट यासारख्या मार्गाने होत असल्याचे गेली काही दिवस मोठ्याप्रमाणावर दिसून येत आहे. हे फसवणुकीचे व्यवहार जरी बँक खात्यामार्फत होत असले तरी फसवणूक झालेल्या व्यवहाराचा प्रत्यक्ष लाभार्थ्याची ओळख पटविणे खूप अवघड होऊन जाते. शिवाय अशा गुन्ह्यातील दोषीपर्यंत पोहोचणे तपास यंत्रणांना अवघड होऊन जाते ,कारण अशा फसवणुकीच्या व्यवहारात मनी म्यूल्सचा सहभाग असतो. सर्व सामन्यास मनी म्यूल म्हणजे काय याची कल्पना नसते व आपल्यापैकी कोणीही कळतनकळत मनी म्यूल होऊ शकतो. म्हणून आज पण मनी म्यूल म्हणजे काय, एखादी व्यक्ती मनी म्यूल कसी होते व त्याचे दुष्परिणाम काय याची माहिती घेऊ.

मनी म्यूल म्हणजे काय ?

मनी म्यूल म्हणजे असी एक व्यक्ती जी आपल्या बँक खात्यावर स्वत:शी संबंधित नसलेली रक्कम जमा करून घेत असते व त्यानंतर दिलेल्या सूचनेनुसार त्याच्याशी सबंधित नसलेल्या खात्यावर ट्रान्सफर करीत असते. अशी रक्कम बहुतांश वेळा फसवणुकीतून किंवा बेकायदेशीर व्यवहारातून आलेली असते. थोडक्यात हे बँक खाते बेनामी नसते तर हे खाते त्या व्यक्ती कडून नकळत तर कधी काही मोबदल्यात अशा गैर व्यवहारासाठी वापरण्यास दिले जाते. असे आपले बँक खाते वापरू देणाऱ्या व्यक्तीस मनी म्यूल (पैसे वाहून नेणारे खेचर )असे म्हणतात. साधारणपणे अशा मनी म्यूलला या पैशांमागच्या गुन्हेगारी बाबतची कल्पना नसते. गुन्हेगारी टोळ्या अशा मनी म्यूल्सचा वापर करून गैरव्यवहार/फसवणूक करून मिळविलेला काळा पैसा पांढरा करीत असतात. याला मनी लॉन्ड्रिंग असे म्हणतात. थोडक्यात मनी लॉन्ड्रिंगमध्ये मनी म्यूल्सचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो.

मनी म्यूल्स कसे बनविले /नेमले जातात ?

गुन्हेगारी टोळ्या मनी म्यूल नेमण्यासाठी प्रामुख्याने पुढील पद्धती वापरतात
१)फसव्या जाहिराती : यामध्ये ई-मेल/एसएमएस /व्हॉट्स अ‍ॅप/फेसबुक किंवा तत्सम सोशल मीडिया माध्यमातून नोकरीचे प्रलोभन दाखविले जाते. अशा जाहिरातीमध्ये चांगला मोबदला दिला जाईल असे सांगितले जाते. विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही अनुभवाची /शिक्षणाची अट असत नाही व काम घर बसल्या ऑनलाईन करावयाचे असते. यामुळे सुशिक्षित परंतु कुठलेही व्यवसायिक कौशल्य नसणारी व्यक्ती सहजगत्या अशा जाहिरातीस बळी पडून मनी म्यूल होते.
२) रोमान्स स्कॅम: यामध्ये प्रामुख्याने विवाह लांबलेले, घटस्फोटीत किंवा विधवा -विधुर स्त्री/पुरुष यांच्याशी सोशल मीडिया किंवा डेटिंग प्लॅटफॉर्म संपर्क साधला जाऊन त्यांच्या वैवाहिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांना प्रलोभन दाखवून मनी म्यूल बनविले जाते.

मनी म्यूलचे तीन प्रकार

१)अशी व्यक्ती की जिला आपले बँक खाते अशा प्रकारच्या गैरव्यवहारासाठी वापरले जात आहे याची जाणीव नसते. असी खाती पर्सनल डेटा चोरी करून उघडली जातात.
२) ज्यांना नोकरीचे आमिष दाखवून खात्याचा तपशील द्यायला सांगितला जातो व या खात्यातून व्यवहार करण्यास सांगितले जाते व व्यवहाराच्या काही टक्के (२% ते ५ %) रक्कम मोबदला म्हणून दिली जाते.
३) रोमान्स स्कॅम मधील व्यक्ती सोशल मीडिया किंवा डेटिंग प्लॅटफॉर्म ओळख झालेल्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन आपल्या खात्यावर समोरच्या व्यक्तीस रक्कम जमा करण्याची अनुमती देते व त्यानंतर समोरच्या अनोळख्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन ती सांगेल त्याप्रमाणे आपल्या खात्यात जमा झालेली रक्कम अनोळखी माणसाच्या खात्यावर ट्रान्सफर करते.

मनी म्यूल होऊ नये यासाठी दक्षता कशी घ्यावी?

१)जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचा नोकरीसाठी अर्ज न करता आपल्याला एखादी चांगला पगार असलेली नोकरी देऊ केली जाते तसेच त्यासाठी कुठल्याही अनुभव/शिक्षणाची अट नसते अशा नोकरीचा मोह टाळावा.
२) जेव्हा एखाद्या डेटिंग प्लॅटफॉर्म ओळख झालेली व्यक्ती आपले बँक अकाऊंट, आधार कार्ड व पॅन यासारखा तपशील मागत असेल तर अशा व्यक्तीस प्रत्यक्ष भेटून खात्री पटली तरच त्याचे सोबत आर्थिक व्यवहार करावेत.
३)वर्क फ्रॉम होम व ऑनलाईन असे जर कामाचे स्वरूप असेल तर काम देऊ करणारी व्यक्ती किंवा संस्था यांची पूर्ण माहिती घेऊनच काम स्वीकारावे. केवळ घरबसल्या कमी कष्टात पैसे मिळतील म्हणून अनोळखी व्यक्ती अथवा कंपनीने देऊ केलेली नोकरी/भागीदारी स्वीकारू नये.
४) परदेशी कंपनी अथवा व्यक्ती कडून नोकरी अथवा भागीदारी देऊ केली जात असेल पूर्ण खात्री झाल्याशिवाय ऑफर स्वीकारू नये.
कळत नकळत मनी म्यूल झाल्यास खालीलप्रमाणे दुष्परिणाम होऊ शकतात :
१)फौजदारी गुन्हा (क्रिमीनल चार्जेस) : भारतीय दंड संहिते नुसार मनी लॉन्ड्रींग हा पीएमएलए अ‍ॅक्ट २००२ नुसार हा एक गंभीर गुन्हा असून यानुसार कळत अथवा न कळत मनी म्यूल झालेल्या व्यक्ती वर फौजदारी गुन्हा दाखल होऊन तुरुंगवास तसे दंडही होऊ शकतो.
२) बँक खाते मनी म्यूल असल्याचे निदर्शनास आल्यावर ताबडतोब संबंधित तसे अन्य बँक खाती गोठविली जातात,यामुळे आपली आर्थिक अडचण होऊ शकते. प्रसंगी रक्कम जप्तही केली जाऊ शकते.
३)संबंधित व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा डागाळली जाऊन नवीन कर्ज मिळणे व नोकरी मिळणे कठीण होते. गुन्हेगारासी संबंध असल्याचे उघड झाल्याने मित्र, नातेवाईक व शेजारी दुरावतात.
मनी म्यूल खाते उघडले जाणार नाही यासाठी बँकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना रिझर्व्ह बँकेने नुकतीच सर्व बँकांना केली आहे . यासाठी केवायसी बाबतची पूर्तता काटेकोरपणे करण्या बाबत सुचविले आहे. शिवाय एका ठराविक कालावधी नंतर खात्याची पुन्हा केवायसी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच आपणही आपल्या बँक खात्य्च्या गैरवापर होत नाहीना याबाबत सतर्क असणे गरजेचे आहे.