मी महाविद्यालयीन विद्यार्थी असून नुकतीच ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणुकीस सुरुवात केली आहे. आमच्यासारख्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाकडे गुंतवलेले पैसे नेमके कुठे आणि कसे गुंतवायचे याबाबत निधी व्यवस्थापक निर्णय कसा घेतात?
म्युच्युअल फंडातील पैसे गुंतवण्याची प्रत्येक फंड घराण्याची एक विशिष्ट शैली असते आणि या शैलीवर अनेक घटकांचा प्रभाव असतो. ते घटक थोडक्यात समजून घेऊ या. एका म्युच्युअल फंड योजनेत हजारो गुंतवणूकदार वेगवेगळी रक्कम गुंतवत असतात. दर महिन्याला एकरकमी आणि ‘एसआयपी’ या माध्यमातून पैसे जमा होत असतात. दर महिन्याला ही जमा होणारी रक्कम वेगवेगळी असते. यात पहिला निर्णय हा घेतला जातो की, एकूण ‘पोर्टफोलिओ’पैकी किती टक्के पैसे गुंतवायचे? हे सुरुवातीला मुद्दाम याकरता स्पष्ट केले की, जेव्हा बाजाराची परिस्थिती अस्थिर असते त्यावेळी ‘फंड मॅनेजर’ अर्थात निधी व्यवस्थापक रोकड सुलभता असावी म्हणून जास्त पैसे बाजूला काढून ठेवतात अन्यथा पोर्टफोलिओतील जवळपास सगळेच पैसे गुंतवले गेलेले असतात.

किती रक्कम गुंतवायची हे ठरवल्यावर पुढचा प्रश्न येतो, तो म्हणजे कोणत्या क्षेत्रात आणि किती कंपन्यांचा पोर्टफोलिओ उभारायचा. यामध्ये निधी व्यवस्थापकाची स्वतःची हातोटी असते. विविध म्युच्युअल फंड घराण्यांचे ‘पोर्टफोलिओ’ पाहिल्यास आपल्याला दोन प्रकार ढोबळ मानाने करता येतात. यातील एका प्रकारचे निधी व्यवस्थापक साधारणपणे ३५ ते ५० शेअरचा पोर्टफोलिओ ठरवतात तर काही गुंतवणुकीचे विविधीकरण अर्थात ‘ड्रायव्हर्सिफिकेशन’ ही संकल्पना अधिकच गांभीर्याने घेऊन ६० ते ७० कधी कधी तर त्यापेक्षा जास्त कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात.

यापुढील निर्णयात क्षेत्र निवड महत्त्वाची असते. सर्वसाधारणपणे अर्थव्यवस्थेत ज्या क्षेत्रांमध्ये तेजी असते, त्या क्षेत्रांमध्ये पोर्टफोलिओतील जास्त पैसे गुंतवले जातात. जर निधी व्यवस्थापकाचा विचार ‘कॉन्ट्रा’ पद्धतीचा असेल म्हणजेच आज एखादे क्षेत्र फारसे चांगले परतावे देत नाहीये पण भविष्यात ते परतावे वाढणारच आहेत तर थोडी अधिक जोखीम घेऊन त्या क्षेत्रात गुंतवणूक केली जाते.

यापुढील निर्णयात कोणत्या आकाराच्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवायचे याचा निर्णय घेतला जातो. जे फंड लार्ज, मिड किंवा स्मॉल कॅप फंड असतात, त्यांना हा निर्णय घेण्याची गरजच नसते. या उलट ‘फ्लेक्सिकॅप’ हे फंड निधी व्यवस्थापकाला सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य असते. मग सद्य:स्थितीतील बाजार आणि पुढच्या एक- दोन वर्षांत उत्तम संधी उपलब्ध असेल असे क्षेत्र आणि कंपन्या निवडून निधी व्यवस्थापक तुमचे पैसे गुंतवतात.

पोर्टफोलिओ वारंवार बदलला जातो का?

शक्यतो पोर्टफोलिओमध्ये सतत बदल करणे पसंत करत नाही. म्युच्युअल फंड आणि त्यातल्या त्यात इक्विटी योजना दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी योजलेले असल्यामुळे अल्पकाळासाठी एखाद्या शेअरमध्ये संधी मिळत आहे, म्हणून ‘पोझिशन’ घेणे हे प्रकार निधी व्यवस्थापक टाळतात.

म्युच्युअल फंड ट्रेडिंग करतात का ?

म्युच्युअल फंडांनाही शेअरची खरेदी करून त्यांनी निर्धारित केलेले लक्ष्य आल्यावर विक्री करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये असलेले सर्व शेअर दीर्घकाळापर्यंतच ठेवावे अशी कोणतीही अट किंवा नियम लागू होत नाही. एखाद्या पोर्टफोलिओत उत्तम संधी दिसली तर काही कंपन्यांच्या शेअरमधील थोडासा हिस्सा विकून नफा घेतला जातो.

निधी व्यवस्थापकालाला मदत करणारा चमू

पंधरा-वीस वर्षांपूर्वीचा विचार केल्यास निधी व्यवस्थापक आपल्या प्रतिभेने गुंतवणूक व्यवस्थापन करून आश्चर्यकारक परतावे देत असत. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार वाढायचे पण, असे व्यवस्थापक कंपनी सोडून गेल्यावर त्या फंडांवर परिणाम व्हायचा. म्हणून आजकाल व्यवस्थापक एकट्यानेच निर्णय घेण्यापेक्षा म्युच्युअल फंड घराण्याची स्वतःची अशी एक रणनीती ठरवणारी फळी असते. त्यातून निधी व्यवस्थापक हा काही सर्वज्ञ नसतो, त्यामुळे त्याला शेअर बाजारातील सर्व घडामोडींचा सखोल अभ्यास करून क्षेत्रांचा आणि कंपन्यांचा अभ्यास करून योग्य तो सल्ला देणारा संशोधकांचा चमूसुद्धा असतो.

निधी व्यवस्थापकाने पोर्टफोलिओमध्ये बदल केले आहेत हे गुंतवणूकदारांना समजू शकते का ?

होय, दर महिन्याच्या म्युच्युअल फंडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या ‘फॅक्टशीट’मध्ये हे बदल आपल्याला पाहता येतात. यामध्ये एकूण गुंतवणुकीपैकी आघाडीच्या क्षेत्रात केलेली गुंतवणूक, आघाडीच्या दहा शेअरमध्ये केलेली एकूण गुंतवणूक अशी माहिती स्वतंत्रपणे दिलेली असते.