प्रश्न : मी शासकीय सेवेत असून म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’च्या माध्यमातून नियमितपणे गुंतवणूक सुरू आहे. त्यातील बहुतांश रक्कम ‘फ्लेक्झीकॅप फंडा’मध्ये आहे. आमच्या मुलासाठीसुद्धा म्युच्युअल फंड या पर्यायाचा विचार करत आहोत. त्यासाठी ‘एनपीएस’ किंवा ‘एसआयपी’ यापैकी कोणता पर्याय उत्तम आहे?- अनंता एकलहरे उत्तर : तुम्ही विचारलेले प्रश्न हे दोन ते तीन संकल्पनांचे मिश्रण आहे, त्याचा त्या पद्धतीने आढावा घेऊया. तुम्ही उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक निधी एका म्युच्युअल फंड घराण्याच्या ‘फ्लेक्झीकॅप फंडा’मध्ये आहेत. म्हणजेच आपल्या गुंतवणुकीतील बराच मोठा भाग एकाच म्युच्युअल फंड योजनेत असणे योग्य नाही. तुम्ही शासकीय सेवेत असल्यामुळे तुमचे उत्पन्न स्थिर आहे, हा तुमचा सर्वात मोठा फायदा आहे. यामध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज कॅप, मिडकॅप आणि स्मॉल कॅप या तिन्ही प्रकारचे फंड असणे आवश्यक आहे. ‘फ्लेक्झीकॅप’ या प्रकारचे फंड वरील तिन्ही प्रकारच्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात, ते खरे असले तरीही पोर्टफोलिओ संतुलित असण्यासाठी तीन ते चार फंडांचा आपल्या पोर्टफोलिओमध्ये समावेश करता येईल. याच बरोबरीने जोखीम घेण्याची तयारी असल्यास सेक्टोरल प्रकारच्या फंडात पैसे गुंतवणे हा पर्यायसुद्धा आपल्यासाठी खुला आहे. औषधी निर्माण अर्थात फार्मा सेक्टर आणि पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रा सेक्टरचे फंड यासाठी निवडू शकता. शेअर बाजारातील गुंतवणूक या संधीचा लाभ घेऊन करायच्या असतात. ज्या वेळी मिडकॅपचा बोलबाला असतो, त्या वेळी आपल्याकडे एकही मिडकॅप फंड नसणे हे शर्यतीत मागे पडल्यासारखे आहे. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओचे पुनर्गठन करून वर उल्लेख केलेल्या योजनांचा समावेश अवश्य करता येईल.

तुमच्या प्रश्नांमध्ये म्हटल्याप्रमाणे, पुढील किती वर्षे तुम्हाला पैसे म्युच्युअल फंडात गुंतवून ठेवायचे आहेत? ते तुमच्या निवृत्ती नियोजनावर अवलंबून आहे. तुम्ही शासकीय सेवेत असल्याने तुम्हाला निवृत्तिवेतन मिळणार आहे, हे गृहीत धरून मी हे लिहितो आहे. दर महिन्याला आपल्याला घरखर्चाला लागणारे पैसे नेमके किती आहेत? याचे गणित करून अजून वीस वर्षांनंतर महागाईचा दर गृहीत धरून दर महिन्याला किती पैसे लागणार आहेत याचा आकडा काढायचा असतो. उदाहरणार्थ, तुम्हाला दर महिन्याला ८० हजार रुपये लागणार असतील आणि तुमच्या दोघांचे सेवानिवृत्तीनंतरचे निवृत्त वेतन ६० हजार असणार असेल तर तुम्हाला २० हजार रुपये म्युच्युअल फंडाच्या तयार झालेल्या पैशातून दर महिन्याला मिळू शकतील. यालाच ‘सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन’ अर्थात ‘एसडब्ल्यूपी’ असेही म्हणतात. आणखी बारा वर्षांनंतर तुम्ही सेवानिवृत्त होणार आहात याचाच अर्थ तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी अजून बराच कालावधी आहे. दर महिन्याला ‘एसआयपी’च्या माध्यमातून पैसे गुंतवले तर तुमचे उद्दिष्ट नक्कीच साध्य होईल.

‘न्यू पेन्शन स्कीम’ आणि ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ या दोघांचा मार्ग एकच मात्र पद्धती वेगळ्या आहेत. ज्यांना दरमहा पगारातून पैसे बाजूला काढून त्यातून गुंतवणूक करून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती निधी घ्यायचा आहे म्हणजे दर महिन्याला एक ठरावीक रक्कम हातात आली पाहिजे. त्यांच्यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून ‘न्यू पेन्शन स्कीम’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत सरकार ‘पेन्शन रेग्युलेशन अथॉरिटी’च्या माध्यमातून गुंतवणुकीचे नियम आखून देत असते. या दिलेल्या नियमानुसार ती गुंतवणूक करावी लागते. सहसा निफ्टी आणि सेन्सेक्समधील कंपन्यांमध्येच ही गुंतवणूक केली जात असल्याने दीर्घकालीन परतावा फायदेशीर ठरतो. ‘न्यू पेन्शन स्कीम’मध्ये जसे वय वाढते तसे आपोआपच तुमचे ‘इक्विटी’ गुंतवणुकीतील प्रमाण कमी होऊन ‘डेट’ प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये ते प्रमाण आपोआपच वाढवले जाते. हे वयाच्या ४५ वर्षांनंतर सुरू होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेतू हा की, जसजसे तुम्ही सेवानिवृत्तीच्या वयाकडे याल तसतसे जोखमीचे प्रमाण कमी असावे. आता तुमच्या मुलाचे वय पंचवीस-तीसच्या आसपास असेल तर ‘एनपीएस’ आणि ‘एसआयपी’ दोन्ही माध्यमांतून तुम्ही गुंतवणूक सुरू करावी. ‘एनपीएस’वर सध्या करबचतीचा फायदा होत असल्याने ती बऱ्यापैकी फायदेशीर योजना आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा विचार केल्यास मिडकॅप आणि स्मॉलकॅप प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक आवश्यक करा.