PM Vikasit Bharat Rojgar Yojana announced By Narendra Modi : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाद्वारे देशभरातील तरुणांना एक भेट दिली आहे. देशातील तरुणांसाठी एक लाख कोटी रुपयांची योजना सुरू करत असल्याची घोषणा मोदी यांनी यावेळी केली. ‘पंतप्रधान विकसित भारत योजना’ या नावाची एक नवी योजना केंद्र सरकारने सुरू केल्याचं मोदी यांनी जाहीर केलं. या योजनेअंतर्गत तब्बल ३.५ कोटी तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या जातील, असं मोदी म्हणाले. तसेच खासगी क्षेत्रात पहिली नोकरी करणाऱ्या तरुण-तरुणींना सरकारकडून १५,००० रुपये दिले जातील, अशी घोषणा देखील मोदी यांनी यावेळी केली.
पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत केंद्र सरकार अशा कंपन्या व व्यवसायांना अनुदान देणार आहे जे जास्तीत जास्त लोकांना रोजगार देतील. सरकार यावेळी अनुदान देण्याबरोबरच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना १५,००० रुपये देणार आहे. या योजनेमुळे देशात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, खासगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढतील अशी सरकारला अपेक्षा आहे. ही योजना प्रामुख्याने सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग, उत्पादन, सेवा आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करेल.
मोदी सरकारची महत्त्वकांक्षी योजना नेमकी काय आहे?
खासगी क्षेत्रातील पहिली नोकरी सुरू करणाऱ्या तरुण तरुणींना या योजनेचा (१५,००० रुपये) लाभ मिळणार आहे. पहिली नोकरी सुरू करताना ईपीएफओमध्ये नोंदणी केल्यानंतर त्या तरुणांना या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेअंतर्गत दोन हप्त्यांमध्ये तरुणांना प्रत्येकी ७,५०० रुपये प्राप्त होतील. ज्या तरुणांचा पगार १ लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. १ लाख रुपयांहून अधिक पगार घेणारे तरुण या योजनेसाठी अपात्र ठरतील. सहा महिने नोकरी केल्यानंतर पहिला हप्ता (७,५०० रुपये) आणि १२ महिने पूर्ण केल्यानंतर, फायनॅन्शियल लिटरेसी प्रोग्राम (आर्थिक साक्षरता कार्यक्रम) पूर्ण केल्यानंतर उरलेला हप्ता (७,५०० रुपये) मिळेल.
या योजनेची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “या योजनेमुळे तरुणांसाठी नोकरीच्या नवनव्या संधी निर्माण होतील. आपण शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. महिलांसाठी ‘लखपती दिदी’सारखी योजना सुरू केली आहे. आता लाखो शेतकरी व महिला या योजनांचा लाभ घेत आहेत. पाठोपाठ आपल्या सरकारने आता तरुणांसाठी योजना आणली आहे.