Debt Snowball Method And Reddit Post: दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी कर्जाचे सुज्ञपणे व्यवस्थापन करणे आवश्यक असते. जेव्हा परतफेड वेळेवर केली जाते आणि कर्ज नियंत्रणात राहते, तेव्हा क्रेडिट स्कोअर चांगला राहतो आणि आर्थिक ताणही कमी होतो. परंतु जेव्हा चुकीचे आर्थिक व्यवस्थापन केले जाते, तेव्हा कर्ज व व्याजाचा डोंगर तयार होतो आणि आर्थिक संकट ओढवते.
दरम्यान, सोशल मीडियावर एका रेडिट युजरने कर्ज आणि त्याची योग्य परतफेड करण्यासाठी ‘स्नोबॉल’ पद्धत कशी वापरायची, याबद्दल सांगितले आहे.
या रेडिट युजरने अलीकडेच शेअर केले की, त्याने डेट स्नोबॉल पद्धतीने फक्त दोन वर्षांत १२.२ लाख रुपयांचे कर्ज कसे फेडले. यावेळी त्याने इतरांना सल्ला दिला की, “लहान कर्जापासून सुरुवात करा, पहिल्यांदा ५,००० रुपये फेडा.”
या रेडिट पोस्टमध्ये युजरने स्लाइस, CRED, बजाज, पेटीएम पोस्टपेड आणि ICICI सारख्या प्लॅटफॉर्मवरून घेतलेल्या क्रेडिट कार्ड, ‘बाय नाऊ, पे लेटर’ थकबाकी आणि वैयक्तिक कर्जांची एक लांबलचक यादी दिली. ब्रेकअपमध्ये ७,५०० रुपयांपासून ते ३.८ लाख रुपयांपर्यंत अशा एकूण १२.२२ लाख रुपयांच्या कर्जाचा समावेश होता.
या रेडिट युजरने आपल्या पोस्टच्या सुरुवातीला लिहिले की, “२ वर्षांत मी १२.२ लाख रुपये कर्ज फेडले. हे ‘कर्ज फेडण्याची स्नोबॉल पद्धत’ वापरल्यामुळे शक्य झाले. मी स्नोबॉल दृष्टिकोन अवलंबला, सर्वात आधी सर्वात छोटे कर्ज फेडले आणि नंतर त्याच ईएमआयचा उपयोग पुढील मोठं कर्ज फेडण्यासाठी केला. प्रत्येक वेळेस एक कर्ज फेडल्यावर, मी त्या ईएमआयची रक्कम पुढील कर्जात सामील केली आणि अशा प्रकारे मी कर्जाचा भार कमी केला.”
नोकरीवरून काढून टाकण्यात आले
या युजरने पोस्टमध्ये पुढे म्हटले की, “हे सर्व करत असताना मी क्रेडिट कार्ड आणि ‘बाय नाऊ, पे लेटर’ चा वापर पूर्णपणे थांबवला. याच शिस्तीची प्रेरणा टिकवण्यासाठी मी एका गुगल शीटमध्ये याच्या नोंदी करत गेलो.”
या आर्थिक शिस्तीबाबत बोलताना युजरने सांगितले की, “हो, माझे हप्ते चुकले. मला २०२३ मध्ये नोकरीवरून काढून टाकण्यात आले. माझ्या CIBIL मध्ये जवळजवळ एक वर्षापासून हप्ते थकल्याचे दिसत होते. यामुळेच मी लहान कर्जे ताबडतोब फेडण्यास सुरुवात केली आणि कर्जाचा बोजा कमी व्हायला सुरुवात झाली.”