Russian Oil Imports: रशियन तेलाची आयात केल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयातशुल्क लादले आहे. रशियन तेलाची आयात कमी करत नाही, तोपर्यंत हे आयातशुल्क मागे घेणार नाही, अशी भूमिका अमेरिकेने घेतली. तेलाच्या आयातीवरून अमेरिका आणि भारतातील संबंधात तणाव निर्माण झाला असताना रशियन तेलामुळे भारतीय रिफायनरींचे किती पैसे वाचतात, याची आकडेवारी समोर आली आहे. मागच्या तीन वर्षांत रिफायनरींचे जवळपास १२.६ अब्ज डॉलर्स इतके पैसे रशियन तेलामुळे वाचले असल्याचे भारताच्या अधिकृत व्यापार आकडेवारीवरून समोर आले आहे. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीची बातमी दिली आहे.
इतर देशांमधून आयात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या तुलनेत रशियन तेलाच्या किंमतीची तुलना केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे. ही बचत रिफायनरींसाठी महत्त्वाची असली तरी अपेक्षित बचतीपेक्षा अधिक नाही. रशियन कच्च्या तेलांवरील सुरुवातीला असलेल्या सवलती कालांतराने कमी होत गेल्या. मागच्या आर्थिक वर्षात या सवलती सर्वात खाली आल्या.
भारताने रशियाकडून कच्चे तेल आयात करणे थांबवले असते तर जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असत्या. तसेच भारत आयातीवर अधिक अवलंबून असल्यामुळे तेल आयातीचा खर्चही वाढला असता.
अमेरिकेच्या दबावानंतरही भारत रशियन तेलाच्या मुद्द्यावर न झुकण्याचे हे एक कारण असू शकते, असे द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे. अमेरिकेने लादलेल्या प्रचंड आयातशुल्कामुळे भारतातील लहान आणि मध्यम निर्यातदारांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्या तुलनेत रिफानरींना रशियाच्या कच्च्या तेलाच्या तुलनेत मिळणारा नफा अपेक्षेपेक्षा कमी आहे. तरीही भारताला रशियन तेलाच्या आयातीवर तात्काळ कपात करणे अवघड आहे. भारत आपल्या व्यावसायिक स्वायत्ततेशी तडजोड करू इच्छित नाही.
रशियन तेलाची आयात कशी वाढली?
फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला. त्यावेळी भारताची रशियाकडून होणारी तेलाची आयात दोन टक्क्यांहून कमी होती. युद्धामुळे अनेक पाश्चिमात्य देशांनी रशियन तेलावर निर्बंध घातले. यानंतर रशियाने इतर बाजारपेठेत सवलतीच्या दरात तेल विकण्याचा निर्णय घेतला. भारतातील रिफायनरीजनी या संधीचा फायदा उचलत तेलाची आयात वाढवली. काही महिन्यातच भारत रशियाच्या तेलाची सर्वाधिक आयात करणारा दुसऱ्या क्रमाकांचा देश बनला.