Layoff LinkedIn Post: मुंबईस्थित उद्योजक संपर्क सचदेव यांनी सोशल मीडियाव लिहिलेल्या एका पोस्टमध्ये त्यांच्या व्यावसायिक आयुष्यातील सर्वात कठीण क्षणाचे अनुभव शेअर केले आहेत. लिंक्डइनवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले की, कंपनीने त्यांना एकाच दिवसात २५ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यास सांगितले होते.
या पोस्टमध्ये, त्या घटनेची आठवण करून देताना सचदेव म्हणाले की, व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याची बातमी देताना शांतपणे प्रकरण हाताळण्यास सांगितले होते. सचदेव यांना कर्मचाऱ्यांना सहानुभूती दाखवण्याची किंवा “सॉरी” म्हणण्याचीही परवानगी नव्हती.
“कृपया तुमचे ओळखपत्र आणि लॅपटॉप जमा करा. औपचारिकतेसाठी एचआर तुमच्याशी संपर्क साधेल. तुमच्या सिस्टमचा एक्सेस लवकरच बंद केला जाईल”, असे कंपनी व्यवस्थापनाने सचदेव यांना काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना सांगण्यास सांगितले होते.
सचदेव यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे की, कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचे सांगताना, त्या कर्मचाऱ्यांचे चेहरे असह्य वाटत होते. तसेच या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या निर्णयामध्ये त्यांची कोणतीही भूमिका नव्हती. त्यांना फक्त त्या कर्मचाऱ्यांना सूचना देण्यासाठी निवडण्यात आले होते.
दरम्यान, एका कर्मचाऱ्याने त्यावेळी व्यक्त केलेली भावना गेल्या काही वर्षांपासून सचदेव यांच्या मनात आहे. कटुता न बाळगता, तो कर्मचारी म्हणाला होता, “सर, तुम्ही मला कामावर घेतले होते. तुम्ही इथे होता, म्हणून मी राहिलो. आज, तुम्ही मला जायला सांगत आहात, म्हणून मी जात आहे.”
“या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याच्या सूचना दिल्यानंतर, ऑफिसमधून घाईघाईने बाहेर पडलो आणि रडू लागलो”, असेही सचदेव यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
या घटनेला आता खूप वर्षे झाली आहेत, पण ती आठवण अजूनही ताजी आहे. त्यांनी कबूल केले की, कंपनी पुढे गेली असून कर्मचाऱ्यांनीही प्रगती केली आहे. परंतु काही क्षण कायमचे हृदयावर कोरले जातात. सचदेव म्हणाले, “कधी कधी, जेव्हा मी एकटाच शांत बसलेलो असतो, तेव्हा त्या क्षणाचा मला अजूनही त्रास होतो. कारण नेतृत्व म्हणजे फक्त निर्णय घेणे नसते, ते त्याच्यासोबत जगणे असते.”
सचदेव यांच्या या पोस्टवर असंख्य प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी ले ऑफबाबतचे त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. तसेच नेतृत्वावर असलेल्या अदृश्य भावनिक ओझ्यावरही प्रकाश टाकला आहे.
एका युजरने लिहिले आहे की, “तुम्ही काय अनुभवत आहात हे मी पूर्णपणे समजू शकतो. मला दोन वर्षांत दोनदा असे करावे लागले आणि त्यामुळे मी आतून पूर्णपणे कोसळलो आहे, पण ही कॉर्पोरेट जगताची काळी बाजू आहे.”