Donald Trump Tariff Hike: डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही काळापासून विविध देशांवर आयातशुल्क लादण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मोठ्या जागतिक कंपन्या आणि अमेरिकन कंपन्याही आपल्या वस्तूच्या किमती वाढविण्याची शक्यता आहे. स्पोर्ट्सवेअर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, आलिशान वस्तू आणि ऑटोमोबाइल या क्षेत्रातील वस्तूंच्या किमती आता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ट्रम्प यांनी टॅरिफमध्ये वाढ केल्यानंतर खालील ब्रँड्सनी त्यांच्या वस्तूंच्या किमतीमध्ये आधीच वाढ केली आहे.
ॲडिडास (ADIDAS)
३० जुलै रोजी प्रसिद्ध स्पोर्ट्सवेअर ब्रँड ॲडिडासने आपल्या वस्तूंच्या किमती वाढवल्या आहेत. अमेरिकेने टॅरिफ वाढविल्यामुळे ॲडिडासला या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात २०० दशलक्ष युरोजचे नुकसान झाले आहे.
नायकी (NIKE)
ट्रम्प यांनी टॅरिफ वाढविल्यामुळे १ अब्ज डॉलर्सची भरपाई करण्यासाठी किमती वाढविणार असल्याचे नायकीने जाहीर केले होते.
प्रॉक्टर अँड गॅम्बल (पी अँड जी)
घरगुती वापराच्या वस्तू निर्मिती करणाऱ्या प्रॉक्टर अँड गॅम्बलनेही किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका उत्तर अमेरिकेतील २५ टक्के वस्तूंना बसू शकतो. कंपनीचे सीएफओ आंद्रे शुल्टेन यांनी सांगितले की, टॅरिफ वाढीमुळे आमच्या वस्तूंच्या किमती वाढवाव्या लागत आहेत.
हर्मीस (HERMES)
लक्झरी वस्तूंनाही याचा तोटा सहन करावा लागत आहे. फ्रेंच लक्झरी ग्रुप हर्मीसने १७ एप्रिल रोजी जाहीर केले होते की, अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या वस्तूंना टॅरिफचा भार सहन करावा लागू शकतो.
फुजीफिल्म (FUJIFILM)
१ ऑगस्ट रोजी ब्लुमबर्गमध्ये आलेल्या बातमीनुसार, फुजीफिल्म होल्डिंग कॉर्पने त्यांच्या डिजिटल कॅमेरा, लेन्सेसचे दर वाढवले आहेत. काही वस्तूंच्या किमती १०० डॉलरने वाढविण्यात आल्या आहेत. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.
अमेझॉन
रॉयटर्स संकेतस्थळावर डेटावीव्हने केलेल्या विश्लेषणात म्हटले की, जानेवारी ते जूनच्या दरम्यान अमेझॉन डॉट कॉमवर विकल्या जाणाऱ्या १४०० हून अधिक चीन निर्मित उत्पादनांच्या किमती २.६ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. टॅरिफ वाढीचा फटका ऑनलाइन क्षेत्रालाही बसल्याचे हे उदाहरण आहे.
वॉलमार्ट
अमेरिकेतील सर्वात मोठी किरकोळ विक्रेता साखळी असलेल्या वॉलमार्टनेही काही वस्तूंच्या किमती जून २०२५ मध्ये वाढवल्या असल्याची माहिती समोर येत आहे. सीएनबीसीने केलेल्या विश्लेषणात सुमारे ५० वस्तूंच्या किमती ५१ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे.