Dilip Piramal Of VIP Industries: व्हीआयपी इंडस्ट्रीजचे अध्यक्ष दिलीप पिरामल यांनी नुकतेच स्पष्ट केले की, त्यांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीला व्यवसायाच्या व्यवस्थापनात फारसा रस नाही. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली होती की, प्रमोटर ग्रुप एंटिटीज खाजगी इक्विटी गुंतवणूकदारांच्या गटाला आणि इतरांना ३२% हिस्सा विकण्याची योजना आखत आहेत. त्यानंतर दिलीप पिरामल यांचे हे वक्तव्य आले होते.

“आमचा व्यवसाय कुटुंबाच्या मालकीचा आहे आणि पुढची पिढी तो चालवण्यास फारशी उत्सुक नाही. आमच्या ५३ वर्षांच्या इतिहासात, व्हीआयपी बाजारपेठेतील आघाडीची कंपनी आहे. परंतु गेल्या पाच वर्षांत, आम्ही बाजारपेठेतील हिस्सा गमावत चाललो आहोत. गेल्या वर्षी, आम्ही चारही तिमाहीत तोटा नोंदवला होता”, असे पिरामल यांनी एनडीटीव्ही प्रॉफिटला सांगितले होते.

एंजलवन या वित्तीय सेवा वेबसाइटनुसार लगेज बॅग्ज बनवणाऱ्या व्हीआयपी इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ६,८३० कोटी रुपये आहे. गेल्या ५२ आठवड्यात शेअरने ५८९.७५ रुपयांचा उच्चांक आणि २४८.३५ रुपयांचा नीचांक गाठला होता.

सीएनबीसीच्या अहवालानुसार, ७५ वर्षीय दिलीप पिरामल यांना त्यांच्या कंपनीच्या शेअरची किंमत ७०० रुपयांवर असताना कंपनी विकली नसल्याबद्दल पश्चात्ताप वाटत आहे.

“दोन वर्षांपूर्वी, कंपनीच्या शेअरची किंमत ७०० रुपये होती, मार्केट कॅप १०,००० कोटी रुपये होती आणि आम्हाला त्या किमतीसाठी ऑफरही मिळाली होती. पण त्यावेळी माझ्या व्यवस्थापनाला वाटले होते की सहा महिन्यांत किंवा एका वर्षात, शेअरची किंमत आणखी ५० टक्क्यांनी वाढेल, पण दुर्दैवाने तसे झालेले नाही”, असे पिरामल यांनी सीएनबीसी-टीव्ही १८ ला सांगितले.

पिरामल यांनी आता व्हीआयपी इंडस्ट्रीजमधील ३२% हिस्सा खाजगी इक्विटी फर्म मल्टीपल्स, मिथुन संचेती व सिद्धार्थ संचेती आणि संविभाग सिक्युरिटीज यांना विकला आहे. याची किंमत १,७६३ कोटी रुपये इतकी आहे. दरम्यान, पिरामल यांनी कंपनीचा २०% हिस्सा त्यांच्याकडे राखून ठेवला आहे. मात्र, संचालक मंडळावर ते राहणार नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिरामल कुटुंबाविषयी

दिलीप पिरामल यांना दोन लग्नांमधून तीन मुली आहेत. त्यांची पहिली पत्नी गीता पिरामल होत्या. २००५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या जोडप्याला राधिका आणि अपर्णा या दोन मुली आहेत. त्याच वर्षी नंतर दिलीप पिरामल यांनी शालिनी अग्रवाल यांच्याशी लग्न केले. त्यांना प्रियदर्शिनी नावाची एक मुलगी आहे. दिलीप हे अजय पिरामल यांचे मोठे भाऊ आहेत, ज्यांचा मुलगा आनंद पिरामल यांचा विवाह मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांच्याशी झाला आहे.