iPhones cost if America Produce: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोहा येथे बोलत असताना ॲपल कंपनीचे उत्पादने भारताऐवजी अमेरिकेत घेण्याचा सल्ला सीईओ टिम कुक यांना दिला. या सल्ल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय व्यापाराची नव्याने चर्चा होत आहे. ॲपलने आपली उत्पादने चीनऐवजी भारतात घेण्यास काही काळापूर्वी सुरुवात केली आहे. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावापुढे झुकून अमेरिकेत आयफोन आणि इतर ॲपलची उत्पादने घेतल्यास भारतीय ग्राहकांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगत आहेत.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबाने यांनी एनडीटीव्हीशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचा विरोध केला. ते म्हणाले, जर ॲपलने भारताबाहेर उत्पादन घेतले तर अमेरिकन ग्राहक आणि ॲपल या दोघांचेही नुकसान होईल. भारत, चीन किंवा व्हिएतनामच्या ऐवजी अमेरिकेत आयफोनचे उत्पादन घेतल्यास १००० डॉलर्सना मिळणारा आयफोन ३००० डॉलर्सला विकत घ्यावा लागेल. अमेरिकन ग्राहक इतका महाग फोन विकत घेऊ शकतात का?

गिरबाने पुढे म्हणाले की, ॲपलचे ८० टक्के उत्पादन सध्या चीनमध्ये घेतले जाते. यामुळे तिथे ५० लाख लोकांना रोजगार मिळतो. ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी जेव्हा भारतात उत्पादन घेण्याची योजना आखली तेव्हा काही उत्पादने चीनमधून भारतात हलविण्यात आली. पुरवठा साखळीत विविधता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

टेलिकॉम इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (TEMA) अध्यक्ष एनके गोयल यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, सध्यातरी जग आणि भारताने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्यापासून अंतर राखले पाहिजे. ॲपलने मागच्या वर्षभरात भारतातून २२ अब्ज डॉलर्स किमतीचे आयफोन निर्माण केले आहेत. आतापर्यंत ॲपलचे भारतात तीन कारखाने आहेत. आणखी दोन कारखाने स्थापन करण्याचा त्यांचा विचार आहे.

एनके गोयल पुढे म्हणाले की, ॲपलने अंशत: आपले उत्पादन चीनहून भारतात हलवले आहे. आता जर त्यांनी भारतातूनही बाहेर जाण्याचा निर्णय घेतला तर त्यांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर टॅरिफचा वाद सुरू आहे. याचाही फटका बसू शकतो. आम्हाला वाटते या परिस्थितीत ॲपल भारतातून आपले उत्पादन बाहेर हलविणार नाही.