Apple CEO Tim Cook : ॲपल ही जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे सीईओ टिम कुक (Tim Cook) हे आहेत. खरं तर ॲपलचे स्मार्टफोन जगभरात लोकप्रिय असून ॲपल ही कंपनी त्यांच्या प्रोडक्ट्सच्या माध्यमातून लोकांच्या मनावर राज्य करतात. कंपनीच्या या यशात सीईओ टिम कुक यांचा देखील महत्वाचा वाटा मानला जातो. मात्र, आता सीईओ टिम कुक यांच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
ॲपल कंपनीच्या प्रमुखपदी एक दशकाहून अधिक काळ घालवल्यानंतर आता टिम कुक हे लवकरच आपलं पद सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. तसेच टिम कुक यांनी ॲपलचं सीईओ पद सोडलं तर त्यांच्या जागी ॲपलचे नवे सीईओ कोण असतील? याबाबतही वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरू आहेत. या संदर्भातील वृत्त फायनान्शियल टाइम्सच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.
वृत्तानुसार, अॅपलचे सीईओ टिम कुक लवकरच पद सोडू शकतात, कारण ते ६५ वर्षांचे होणार आहेत. खरं तर टिम कुक हे २०११ पासून कंपनीचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. टिम कुक यांच्यानंतर अॅपलचं सीईओ कोण होणार? याबाबत चर्चा सुरू असून त्यांच्या जागी जॉन टर्नस कंपनीचे पुढील सीईओ असू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जॉन टर्नस हे २४ वर्षांपासून अॅपलमध्ये काम करत आहेत.
दरम्यान, टिम कुक यांच्या पद सोडण्याच्या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, तरी अॅपलच्या सीईओ पदासाठी जॉन टर्नस (John Ternus) यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. जॉन टर्नस हे २००१ मध्ये अॅपल टीमचा भाग म्हणून कंपनीत सामील झाले होते. आज ते हार्डवेअर इंजिनिअरिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कंपनीत काम पाहतात.
