Income Tax Return Deadline Extension: आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आयटीआर भरण्याची शेवटची मुदत १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत आहे. अंतिम मुदत जवळ येत असताना आता कोट्यवधी करदात्यांना प्रश्न पडला आहे की, सरकार २०२४-२५ च्या आर्थिक वर्षासाठी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवणार का? प्राप्तीकर विभागाच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे वैयक्तिक करदाते आणि चार्टर्ड अकाऊंटटना अडचणी येत आहेत. यासाठी ही मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

आयटीआर भरण्याची आधीची मुदत ३१ जुलै २०२५ पर्यंत होती. परंतु प्राप्तीकर विभागाने मे महिन्यात ही मुदत १५ सप्टेंबर पर्यंत वाढवली. मात्र आता संकेतस्थळावरील त्रुटींमुळे अनेकांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (CBDT) पत्र लिहून मुदत वाढविण्याची मागणी केली आहे.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार ११ सप्टेंबर पर्यंत जवळपास ५.४७ कोटी करदात्यांनी आयटीआर भरला होता. मात्र नोंदणीकृत वैयक्तिक करदात्यांची संख्या १३.३७ कोटी इतकी आहे. तीन दिवस शिल्लक असताना हा आकडा ८ कोटींवर जाण्याची कर विभागाला अपेक्षा आहे. मागच्या वर्षी ३१ जुलै २०२४ पर्यंतच्या अंतिम मुदतीपर्यंत सुमारे ७.२४ कोटी करदात्यांनी आयटीआर फाईल केला होता.

करदात्यांना नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत?

  • संकेतस्थळ धीम्या गतीने सुरू असल्यामुळे वैयक्तिक करदाते त्रस्त
  • अनेकांना संकेतस्थळावर लॉगिन करण्यात अडचण
  • फाइलिंग प्रक्रियेत अनेकदा अडथळे निर्माण होत आहेत
  • रिफंड आणि डेटा व्हेरिफिकेशनबाबतही गोंधळ आहे

आयटीआर भरण्याची मुदत वाढवली जाईल का?

वरील त्रुटींमुळे आयटीआर भरण्यात अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक करदाते हे मुदत वाढीची आस लावून बसले आहेत. त्यामुळे ही मुदत वाढवली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र सरकारकडून यावर अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.