मुंबईमध्ये जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात महाविद्यालये सुरू झाली की सांस्कृतिक वर्तुळात कमालीची उत्सुकता असते ती म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाची. नाटक, नृत्य, संगीत, कला, साहित्य आदी विभागांमध्ये स्पर्धा पार पडत असतात. यामुळे महाविद्यालय सुरू होताच सर्व विद्यार्थी या महोत्सवाच्या तयारीला लागले आहेत. पाहुयात कोणत्या महाविद्यालयांची किती तयारी झाली आहे ती..

प्रत्येक महाविद्यालयाची वेगळी घोषणा.. प्रत्येकालाच जिंकण्याची इच्छा.. दिग्गजांना हरवण्याची जिद्द.. अशा वातावरणाने भारावलेल्या युवा महोत्सवाच्या तयारीला शहरातील महाविद्यालयांमध्ये जोरदार तयारी सुरू झाली आहे. यामुळेच जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात विद्यार्थ्यांसाठी जरी महाविद्यालये सुरू झाली असली तरी पहिल्या आठवडय़ातच महाविद्यालय प्रशासनाची या संदर्भात बैठक होऊन शिक्षकांमधूनच सांस्कृतिक विभागासाठी एक समन्वयक निवडला जातो. या समन्वयकाकडेच युवा महोत्सवाची एकूण जबाबदारी असते. त्यानंतर महाविद्यालय सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या बैठकीतून विद्यार्थ्यांमधून दोन समन्वयक निवडले जातात जे युवा महोत्सव समितीच्या बैठकीत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करतात. याउलट विद्यार्थ्यांमध्ये वेगळाच उत्साह असतो ही सर्व मंडळी तर मे महिनाच्या सुट्टीतच या सगळ्या लगबगीत असतात. महाविद्यालय सुरू झाल्या-झाल्या नाटक, नृत्य आणि संगीत विभागासाठी ऑडिशन घेणे, मुलांची जमवाजमव करणे, प्रशिक्षकांशी सुसंवाद साधणे या कामांमध्ये ही मंडळी गुंतलेली दिसतात. तर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागासाठी समन्वयकाकडे नाटक, लोकनृत्य या स्पर्धासाठी प्रशिक्षक नेमून देणे, एकल विभागाच्या स्पर्धासाठी स्पर्धक निवडणे या कामांची यादी असते. नाटक विभागात वरिष्ठ महाविद्यालयातील मुलांचा सहभाग हा मोठय़ा प्रमाणावर असला तरी आणि जूनच्या शेवटच्या आठवडय़ात तालमींना जरी सुरुवात झाली असली तरी ऑगस्ट मध्ये प्रथम वर्षांत प्रवेश घेणाऱ्या मुलांनाही काही स्पर्धामध्ये सहभागी करून घेतले जाते. युवा महोत्सवाची ही नशा माजी विद्यार्थ्यांमधूनही उतरली नसल्याने ही मंडळीदेखील या संपूर्ण प्रकियेत सहभागी असतात प्रशिक्षक आणि मुलांच्या मदतीसाठी ही मंडळी कार्यरत असतात.

युवा महोत्सवाच्या तारखा अजून जाहीर झाल्या नसल्या तरी कित्येक महाविद्यालयांमध्ये तालमींना सुरुवात झाली आहे. काही महाविद्यालयामध्ये विद्यार्थी समन्वयक निवडून त्यांच्या बैठकाही पार पडल्या आहेत. प्रामुख्याने नाटक आणि लोकनृत्य या स्पर्धाच्या तालमींना सुरुवात झाली असून काही महाविद्यालये अजून प्रथम वर्ष प्रवेश प्रकिया पूर्ण होण्याची वाट बघत आहेत.

तर काही महाविद्यालयांमध्ये माजी विद्यार्थी हेच प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. मुंबईत साठय़े, पोद्दार, मिठीबाई, डहाणूकर, रुपारेल या महाविद्यालयांमध्ये ताकदीचा सामना दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रंगणार असून कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागणार आहे. चुरशीची लढाई लढावी लागल्याने यातील काही महाविद्यालयांमध्ये तालमींना सुरुवातही झाली आहे.

पोद्दार महाविद्यालय

मांटुग्यातील पोद्दार महाविद्यालय यावर्षीही युवा महोत्सवाच्या तयारीला जोमाने लागले आहे. २५ जूनपासूनच तालमीला सुरुवात झाली असून नाटक आणि लोकनृत्याची जोशात तालमी महाविद्यालयात होत आहेत. नाटकासाठी रंजित पाटील हे दिग्दर्शक म्हणून काम पाहत आहेत तर दरवर्षीप्रमाणे प्रशांत बाफलेकर यांच्या खांद्यावर लोकनृत्य प्रशिक्षणाची जबाबदारी आहे. विद्यार्थी मन लावून युवा महोत्सवाची मेहनत करत असल्याने आणि पावसाळी दिवसात मुलांनी बाहेरचे खाऊन त्यांची तब्येत बिघडू नये या हेतूने महाविद्यालयाकडूनच मुलांसाठी सकाळच्या नाश्त्याची आणि दुपारच्या जेवणाची सोय केली जात असल्याची माहिती महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समन्वयक वृषाली कणेरी यांनी दिली.

महर्षी दयानंद महाविद्यालय

एम. डी. कॉलेजचे विद्यार्थी ही युवा महोत्सवाच्या तयारीला लागले असून त्यांची तालीम ही महाविद्यालयाची युवा महोत्सवासंदर्भात बैठक होण्याआधीच सुरू झाली आहे. साधारण मे महिनाच्या सुरुवातीपासून मुले तालमीला लागले आहेत. नाटकासाठी एम. डी. कॉलेज सांस्कृतिक वर्तुळात ओळखले जात असल्याने यावर्षी नाटय़ दिग्दर्शनाची जबाबदारी ओमकार राऊत आणि विनोद जाधव यांच्यावर आहे. मुळातच नाटक आणि साहित्य विभागांतील स्पर्धाना प्रथम प्राधान्य आमचे महाविद्यालय देणार असल्याची माहिती महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे समन्वयक गणेश जोशी यांनी दिली. त्याचबरोबरीने विद्यार्थ्यांना पूर्ण पांठिबा महाविद्यालय देत असल्याचे त्यांनी सांगितले.

साठय़े महाविद्यालय 

पाल्र्याच्या साठय़े महाविद्यालयातही युवा महोत्सवाची दमदार तयारी सुरू असून नाटय़विभागाच्या नाटय़वलयमध्ये उत्साहात मुले नाटकाच्या तालमीला लागले आहेत. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी रोहन जाधव आणि हेमंत जांगली हे मार्गदर्शकाचे काम करत असून या वर्षी विशेष म्हणजे नाटय़वलयची मुलेच नाटकाच्या संकल्पनेवरती आणि तयारीचे काम करत आहेत. तर लोकनृत्यासाठीच्या ऑडिशन लवकरच महाविद्यालयांत होणार असून त्याच्याही तालमी सुरू होणार आहेत. प्रशांत बाफलेकर हेच विद्यार्थ्यांच्या लोकनृत्याच्या तालमी घेणार आहेत. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समन्वयक जयश्री गायकवाड या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या आहेत.