News Flash

सोमय्यात मीडियाथेक

एस. के. सोमय्या महाविद्यालयाने नववर्षांचे स्वागत बीएमएम विभागाच्या ‘मीडियाथेक’ या महोत्सवाने केले

एस. के. सोमय्या महाविद्यालयाने नववर्षांचे स्वागत बीएमएम विभागाच्या ‘मीडियाथेक’ या महोत्सवाने केले. ९ आणि १० जानेवारी असा दोन दिवस आंतरमहाविद्यालयीन स्तरावर ‘मीडियाथेक’ साजरा झाला. यंदा महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे. त्यामुळे संकल्पनाही जरा निराळी ठेवण्यात आली होती. आजच्या तांत्रिक युगात आपण आपल्या जवळच्या व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी समाजमाध्यमाचा वापर मोठय़ा प्रमाणात करतो. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी अनेक ‘इमोजीस’ समाजमाध्यमावर उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्याही वाक्यात वापरलेला ‘ईमोजी’ हा त्या व्यक्तीच्या हेतुपूर्ण भावना व्यक्त करतो. सध्या माध्यमवर्तुळात सर्वत्र ‘ईमोजी’चे अस्तित्व आहे आणि आजच्या तरुणाईमध्ये त्याचा वापर कुशलरीत्या सुरू आहे; परंतु हा सर्व प्रकार बनवाबनवीचा असल्याने त्यातील भावना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न बीएमएमच्या विद्यार्थ्यांनी आपल्या ‘इमोटिकॉन्स’ या हटके संकल्पनेने केला. म्हणूनच संकल्पनेला धरून रोजच्या जीवनातील मानवी भावनांना महत्त्व देणाऱ्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. नृत्य, नाटय़, ‘स्टँड-अप कॉमेडी’, ‘आर.जे.’ स्पर्धा अशा नेहमीच्या स्पर्धामधूनच स्पर्धकांना त्यांना दिलेल्या भावनेवर सादरीकरण करायचे होते.

याखेरीज छायाचित्र स्पर्धा, ‘फॅशन शो’, ‘शॉर्ट फिल्म्स’, ‘अ‍ॅड स्पूफ’, ‘डब द सब’ अशा स्पर्धाचे आयोजनही महोत्सवादरम्यान करण्यात आले होते. चित्रपट आणि मालिका क्षेत्रांतील भरत दाभोळकर, झुबेर शेख, अभिषेक दास, पराग मेहता, आर. जे. मंत्रा, विकास ग्रोव्हर, सागर मवानी, सोनल कौशल, शंतनू तुंगारे इत्यादी मान्यवरांनी या स्पर्धाचे परीक्षण केले. तसेच महाविद्यालयाची मुख्य इमारत आणि आजूबाजूचा परिसर वेगवेगळ्या ‘इमोटिकॉन्स’नी सजवण्यात आला होता. एकूणच संपूर्ण महाविद्यालयात ‘इमोशनफुल्ल’ वातावरण तयार झाले होते, असे म्हणायला हरकत नाही. माध्यम महोत्सव हे मुलांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे असतात. अशा महोत्सवांमुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो तसेच त्यांच्यातील नेतृत्वकौशल्य वाढते. गेले काही महिने मुलांनी घेतलेली मेहनत, केलेली तयारी, माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती, इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद यामुळे उत्तमरीत्या पार पडल्याचे मत महाविद्यालयाच्या प्राचार्या संगीता कोहली यांनी व्यक्त केले.

कीर्ती महाविद्यालयाचा ‘मोक्ष’ लवकरच भेटीला
– कॉलेज कट्टा वार्ताहर

दरवर्षीप्रमाणे यंदाही कीर्ती महाविद्यालयाच्या बीएमएम विभागाने ‘मोक्ष’ या महोत्सवाचे आयोजन केले आहे. १६, १७ आणि १८ जानेवारीदरम्यान महाविद्यालयात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे ‘मोक्ष’ महोत्सवाचे हे दहावे वर्ष आहे. प्रत्येक वर्षी ‘मोक्ष’मधून एक सामाजिक विषय हाताळला जातो. त्यामुळे या वर्षीही सामाजिक कार्याची जाण म्हणून ‘सुरक्षित रस्ता’ हा विषय हाताळण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे राज्याच्या परिवहन विभागाकडून महाविद्यालयामध्येच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिकाऊ  वाहन परवाने वाटपाच्या योजनेचा प्रारंभ या महोत्सवातून केला जाणार आहे. याशिवाय महोत्सवाची मुख्य संकल्पना ‘डिजिटल व्हिडीओ गेम’ अशा स्वरूपाची असणार आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी उत्साहाने यात सहभागी होतील, अशी अपेक्षा आयोजकांना आहे.

रुपारेल महाविद्यालयाचा ‘उद्योजक’
– कॉलेज कट्टा वार्ताहर

डी. जी. रुपारेल महाविद्यालयाचा वाणिज्य विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी एकत्रित येऊन प्रथमच आंतरमहाविद्यालयीन स्तरावर २३, २४ आणि २५ जानेवारीदरम्यान ‘उद्योजक : एक पाऊल प्रगतीकडे’ या महोत्सवाचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांना नवे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि उद्योगजगताचे ज्ञान आणि त्याचे महत्त्व समजावे, तसेच त्या क्षेत्राची पुरेपूर माहिती व्हावी, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धाही घेण्यात येतील. दृश्य सादरीकरण, जाहिरात, लोगो, टाकाऊ पासून टिकाऊ  तसेच उत्कृष्ट उद्योजक, वादविवाद स्पर्धा आणि स्मरणशक्ती या स्पर्धाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी सामाजिक जागरूकतेवर आधारित पथनाटय़ाचे ही सादरीकरण करणार आहेत.

पुढील आठवडा वक्तृत्व स्पर्धाचा

प्रियांका मयेकर

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे १६ जानेवारी २०१७ रोजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी सेन्सॉर बोर्ड त्याचप्रमाणे धर्मनिष्ठीत राष्ट्रवाद आणि नाती ‘व्हेंटिलेटवर’ पण का? यांसारख्या विषयांची निवड करण्यात आली आहे, तर १९ तारखेला होणाऱ्या ब. न. पुरंदरे या सेंट झेवियर्सच्या ‘आमोद’ महोत्सवात स्पर्धकांना आयुष्याची कॉमेडी, माणुसकीचा अपघात आणि फर्स्ट इम्प्रेशन यांसारखे विषय देण्यात आले आहेत.

साठय़ेत ‘मराठी भाषासंवर्धन पंधरवडा’

सायली चाळके

मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी वाचनसंस्कृतीची जोपासना होण्यासाठी पाल्र्यातील साठय़े महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाने ४ ते १४ जानेवारीदरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ आयोजित केला होता. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मराठी भाषा संचालनालयाच्या विविध परिभाषा कोषांचा आणि प्रकाशनांचा परिचय व्हावा, या दृष्टीने मराठी भाषासंवर्धन पंधरवडय़ाचे आयोजन केले होते. या पंधरवडय़ात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. यात गुन्हा आणि कायदेविषयक भाषेचा परिचय होण्यासाठी मरोळ आणि अंधेरी येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राला भेट देणे तसेच मराठी शब्दकोडे स्पर्धा, निबंध स्पर्धा, क्षेत्रभेट त्याचप्रमाणे मराठी शुद्धलेखनाचे नियम आणि संगणक तथा मराठी भाषा उपयोजन कौशल्य यांवर व्याख्यान इ. कार्यक्रम आयोजिले होते. मराठी भाषा संशोधन क्षेत्र या विषयावर डॉ. पुष्पलता राजपुरे-तापस यांचे मार्गदर्शन मराठी भाषक विद्यार्थ्यांना लाभले. तसेच मराठी कवितेचा प्रवास उलगडणारा ‘कवितेचे विश्व’ हा कार्यक्रम झाला.

मुंबई विद्यापीठात लवकरच अपंग संज्ञापन अभ्यासक्रम

पराग गोगटे

मुंबई विद्यापीठाच्या जनसंपर्क व संज्ञापन विभाग तसेच अलियावर जंग संस्था आणि जोंकोपिंग विद्यापीठ, स्वीडन यांच्या संशोधन विभागाच्या सहकार्याने रामभाऊ  म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन येथे ९ ते ११ जानेवारी या कालावधीत पहिली आंतरराष्ट्रीय अपंग संज्ञापन परिषद पार पडली. या परिषदेत अपंग संज्ञापनासाठीचा उच्च पदवी अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात सुरू होणार असल्याची घोषणा झाली.

परिषदेचे प्रास्ताविक मांडताना मुंबई विद्यापीठाच्या जनसंपर्क आणि संज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. संजय रानडे यांनी अपंग संज्ञापन विषयात उच्च पदवी अभ्यासक्रम तयार करणे तसेच या विषयासंदर्भात सखोल संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे रानडे यांनी सांगितले.

उद्घाटनास ‘आयसीएसएसआर’चे संचालक प्राचार्य अजय गुप्ता, जोंकोपिंग विद्यापीठ, स्वीडन येथील डॉ. संगीता बग्गा गुप्ता, उद्योजिका शिल्पी कपूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी विविध विषयांवरील शोधनिबंध आणि मान्यवरांची मार्गदर्शनपर चर्चासत्रे पार पडली. अंध व कर्णबधिरांसाठी आशय सहस्रबुद्धे निर्मित ‘एक्सेसिबल फॉरमॅट’मधील ‘चौर्य’ हा सिनेमा दाखविण्यात आला. दुसऱ्या दिवशी जगभरातील भाषा, माध्यम आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रातील आव्हाने आणि दृष्टिकोन मांडण्यात आले. चित्रपट आणि अपंग या विषयांवरही प्रामुख्याने चर्चासत्र घेण्यात आले. जोसियोन जोइले या मॉरिशसमधील मूकबधिर प्रतिनिधीने ‘चिन्ह भाषेच्या’ साहाय्याने निबंध सादरीकरण केले. तिसऱ्या दिवशी सैद्धांतीय क्षेत्र, संस्कृती आणि तंत्रज्ञान या विषयांवर निबंध सादर करण्यात आले. अपंग संज्ञापन या विषयातील नवीन उच्च पदवी अभ्यासक्रमाविषयी चर्चा आणि निष्कर्ष मांडण्यात आले.

परिषदेच्या समारोपप्रसंगी डॉ. रानडे यांनी नवीन अपंग संज्ञापन उच्च पदवी अभ्यासक्रमाचा परिचय करून दिला. एकूणच परिषदेत जागतिक स्तरीय अपंग संज्ञापनातील विविध कल्पना, पैलू यावर चर्चा झाली. या वेळी स्वीडन, फिनलंड, मॉरिशस, इंग्लंड आणि बांगलादेशातील १०० हून अधिक प्राचार्य, शोध निबंधक, वक्ते आणि प्रतिनिधी या परिषदेस उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 4:44 am

Web Title: mediatheque 2017 in somaiya college
Next Stories
1 नववर्षांची ‘नांदी’
2 सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाचा ‘आमोद’
3 ८०%  मौजमजा  २०%  अभ्यास..
Just Now!
X