मुंबई विद्यापीठातील राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्र गेली ११ वर्षे समाजातील विविध घटकांवर संशोधन आणि विकासकार्य करीत आहे; पण याच कार्याला तरुणाईची जोड मिळावी यासाठी विद्यापीठाला १६० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाने समाजकार्य अभ्यासशाखेची निर्मिती केली. डॉ. चंद्रकांत पुरी गेली अनेक वर्षे समाजातील वंचित घटकांवर काम करीत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एमएसडब्ल्यू विभागातून समाजकार्याचे शिक्षण घेत आहेत.

विशेष म्हणजे या विभागातील विद्यार्थ्यांचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व असावे, यासाठी ते सतत कार्यरत आहेत. सामाजिक संशोधन करतानाच अनेक पीएचडीचे विद्यार्थी त्यांनी घडवले. एमएसडब्ल्यू हा अभ्यासक्रम फक्त शिक्षण नव्हे, तर माणूस म्हणून जगण्यासाठी मिळालेली एक दिशा आहे, असे मनोगत इथल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. एमएसडब्लू पदव्युत्तर अभ्यासक्रम समाजकार्यातून अर्थार्जनाच्या अनेक संधी उपलब्ध करून देणारा आहे. समाजात परिवर्तन करायचे असेल तर त्यातील तरुण मुलांनी पुढे यायला हवे आणि त्यासाठीच हा अभ्यासवर्ग आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गाजावाजा करण्यापेक्षा समाजात काम करून परिवर्तन होणे गरजेचे आहे.

अर्थात हे ध्येय या विभागाने एका वर्षांत साध्य केले आहे. आज एक खूप मोठे काम सामाजिक स्तरावर सुरू झालेले आहे. अनेक विद्यार्थी त्यात सहभागी होत आहेत. हीच संख्या वाढावी म्हणून विद्यार्थी वर्गाने पुढे यायला हवे. जांभुळपाडय़ासारख्या आदिवासी भागात विद्यार्थ्यांना नेण्यात आले. येथील आदिवासी, कातकरी समाजातील महिलांच्या समस्या, वंचितांचे प्रश्न अशा अनेक विषयांवर अभ्यास करण्यात आला. तरुणांनी समाजकार्याचा शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी पुढे यायला हवे. या अभ्यासवर्गाचे अर्ज विद्यापीठात राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्र येथे सुरू झाले आहेत. २२ जून ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी २७ जून रोजी पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे.

परमार्थ आणि अर्थार्जन साधण्यासाठीची ही एक अमूल्य संधी आहे. हे एक कुटुंब आहे आणि यात अनेक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याची गरज प्रा. डॉ. चंद्रकांत पुरी यांनी बोलून दाखवली.

२५० अभियांत्रिकी विद्यार्थी प्रशिक्षणासाठी परदेशी

‘विश्वनिकेतन आयमीट’ ही अभियांत्रिकी संस्था गेली चार वर्षे भारतातील अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना परदेशातील विविध विद्यापीठांमध्ये ४५ दिवसांसाठी प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत आहे. मागील चार वर्षांत या उपक्रमाद्वारे भारतातील ४० महाविद्यालयातील ६५० विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. यंदा पात्र ठरलेले २५० विद्यार्थी हे अमेरिका, इटली, ग्रीस, डेन्मार्क, रशिया या ठिकाणच्या नामांकित विद्यापीठांमध्ये प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत. भारतातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळण्यासाठी विश्वनिकेतन संस्थेने युरोप-अमेरिकेतील नामांकित विद्यापीठांबरोबर सामंजस करार केले आहेत. भविष्यातील तंत्रज्ञानावरील प्रकल्पामध्ये काम करता येणे, आंतराष्ट्रीय पातळीवर संधी मिळणे, जागतिक स्तरावरील रोजगार कौशल्य विकसित करणे, सांघिक भावना आणि रोजगार संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. भारतातील अभियांत्रिकी शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करून प्रकल्पाधारित प्रशिक्षण अवलंबविण्यासाठी ‘विश्वनिकेतन हे सेंटर फॉर टेली इन्फास्ट्रक्चर ग्लोबल कॅप्सुल’ या जागतिक संस्थेसोबत कार्यरत आहे.

विश्वनिकेतनच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अन्य देशात गुणवत्तेचे प्रदर्शन घडवता येते. त्याचप्रमाणे हे प्रकल्प भविष्यात येऊ घातलेल्या तंत्रज्ञानावर आधारित असल्याने यामार्गे विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन होत असल्याचे मत विश्वनिकेतनच्या संचालिका जान्हवी इनामदार यांनी व्यक्त केले.

आपत्ती व्यवस्थापन शिबीर

सायली चाळके

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कृत ‘आव्हान -२०१७’ चान्सेलर्स ब्रिगेड हे राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर १० जून रोजी पार पडले. या शिबिरात ३८ जिल्ह्य़ांमधून १२०० विद्यार्थी व ७४ शिक्षक सहभागी झाले होते. या वेळेस शिबिरात विविध प्रकारचे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे आणि विविध कार्यक्रम आणि स्पर्धा पार पडल्या. भारतातील एनडीआरएफ म्हणजेच ‘नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स’ च्या पाचव्या बटालियनने आपत्तीच्या वेळी स्वत:चा आणि आपत्तीग्रस्तांचा बचाव कसा करावा, याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले. यात प्रथमोपचार, आगीपासून बचाव, पूरपरिस्थिती हाताळणी, एमएफआर-मेडिकल फर्स्ट रिस्पाँडर यात कशा प्रकारे करता येते याचे राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले.

या शिबिरात वेगवेगळ्या विद्यापीठांनी शोभायात्रा स्पर्धेत भाग घेतला होता. यात मुंबई विद्यापीठाने सर्वोत्तम शोभायात्रेचा पुरस्कार पटकावला. मुंबई उपनगरातील २० मुले आणि १० मुली स्वयंसेवक म्हणून तर संघ संचालक म्हणून प्राध्यापक प्रणव पांचाळ सहभागी झाले. विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच सुयश प्राप्त झाल्याचे प्राध्यापक प्रणव पांचाळ यांनी सांगितले. भव्य-दिव्य कार्यक्रमासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कोल्हापूरच्या महापौर सौ. हसिना फरस आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठात इफ्तार पार्टी

मुंबई विद्यापीठातील संज्ञापन आणि पत्रकारिता या विभागातर्फे दिनांक २१ रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांतर्फे रोजा (उपवास) केला जातो. सूर्यास्ताच्या वेळी इफ्तार केला जातो. धार्मिक ऐक्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी म्हणून पत्रकारिता विभागाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच भाग म्हणून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या इफ्तार पार्टीत विभागप्रमुख डॉ. संजय रानडे, प्रा. डॉ. सुंदर राजदीप, प्रा. दैवता पाटील, प्रा. डॉ. लुब्ना मुसा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

प्रवेशाचा हंगाम

सध्या शहरातील महाविद्यालयांमधील प्रवेशाची घाई सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाला होणारी गर्दी सरून आता पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. आहे त्याच महाविद्यालयांत प्रथम वर्षांला प्रवेश घ्यायचा का, महाविद्यालय कसे बदलायचे, हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळेपर्यंत एखादा पर्याय हाती ठेवायचा का.. असा खल सध्या घरोघरी, कट्टय़ांवर सुरू आहे.

माहिती पुस्तक आणि अर्ज घेण्यासाठी रांग लावणे, त्यानंतर अर्ज भरण्यासाठी रांग, यादी पाहण्यासाठी गर्दी, मग पुन्हा शुल्क भरून प्रवेश निश्चित करण्यासाठी रांग .. आणि हा सगळा खटाटोप किमान ४ ते ५ महाविद्यालयांमध्ये. हा सगळा प्रवेश गोंधळ बहुतेक महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे आता संपला आहे. त्यामुळे दरवर्षी बारावीचा निकाल जाहीर झाला की दुसऱ्या दिवशीपासून गजबजून जाणारा पुण्यातील महाविद्यालयांचा परिसर अद्यापही शांतच आहे. मात्र महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाल्या आहेत.

शहरातील बहुतेक मोठय़ा महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेचे तपशील आणि वेळापत्रके जाहीर केली आहेत.

रोटी-कपडा आणि पाणीविल्सन महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘रोटी-कपडा-पाणी’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. ‘होप’ या कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवणार येणार आहे. याद्वारे मुंबईतील झोपडपट्टी विभागात खाद्यपदार्थ, कपडे आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. हा उपक्रम दरवर्षी विद्यार्थी राबवत असून प्रत्येक वर्षी नावीन्यपूर्ण संकल्पना ‘होप’ या कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येतात. २०१५ साली अशाच प्रकारचा उपक्रम विद्यार्थ्यांनी राबवला होता. ज्यात कर्करोगग्रस्तांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कर्करोगमुक्त व्यक्तींचे अनुभव ऐकण्यास मिळाले.

२७०७ शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसह गिरगाव चौपाटीवर ‘अम्ब्रेला मोझ्ॉक’ हे अभियान राबविण्यात आले होते. तसेच या अभियानाची नोंद ‘द लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’नेही घेतली होती.