डॉ. उमेश करंबेळकर

आपोआप

आपल्या शरीरात काही क्रिया आपल्या नकळत, सहज आणि सतत घडत असतात. त्यासाठी आपल्याला खास काही करावे लागत नसते. जसे की ह्रदयाचे ठोके, अन्नपचन होण्यासाठी आतडय़ांची हालचाल, श्वासोच्छवास, पापण्यांची हालचाल वगैरे. या क्रिया आपोआप घडत असतात.

आता हा आपोआप हा शब्द कसा आला असेल यावर विचार करताना एक शक्यता अशी वाटली की, तो हिंदीतील ‘अपने आप’वरून आला असेल. परंतु नंतर ज्ञानेश्वरीमध्ये आठव्या अध्यायात ही ओळ वाचनात आली.

आंतु मीनलेनि मनोधर्मे।  स्वरुपप्राप्तीचेनी प्रेमें। आपेंआप संभ्रमें।  मिळावया।।८.९३।।

यामध्ये आपेंआप असा शब्द दिसला.

या ओवीचा, ‘आत सर्व मनोवृत्ती एकरूप झाल्याने, स्वरूपप्राप्तीच्या प्रेमाने, स्वरूपाशी ऐक्य होण्याकरिता आपोआप झालेल्या घाईने’ असा अर्थ दिला आहे. आपेंआप म्हणजे आपोआप हे सरळ दिसतंय. त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की हिंदीतील अपने आपवरून आपोआप शब्द तयार झाला नाही. कारण ज्ञानेश्वरांच्या काळात हिंदी किंवा फारसी भाषेचा मराठीवर पगडा बसला नव्हता.

मग ज्ञानेश्वरांनी आपेंआप असा शब्दप्रयोग का केला असावा? एक शक्यता अशी की, आप म्हणजे पाणी. आपें हे सप्तमीचे एकवचन. त्याचा अर्थ पाण्यात. पाणी पाण्यात सहज मिसळते. ती पाण्याची सहज प्रवृत्तीच आहे. त्यावरून आपेंआप हा शब्द अस्तित्वात आला आणि नंतरच्या काळात त्याचे आपोआप हे रूप रूढ झाले असावे असे मला वाटते.

आपोआपला इंग्रजीत NEST-2019 असा शब्द आहे. त्यावरून पुलंच्या हसवणूक या पुस्तकातील ‘मी आणि माझा शत्रुपक्ष’ हा लेख आठवला. शिकारी हा पुलंच्या शत्रुपक्षातील आघाडीचा शत्रू. त्याच्यानंतर नवीन घर बांधलेले किंवा बांधकाम चालू असताना साइट दाखवणारे लोक हे शत्रू नंबर दोन. असा हा शत्रू नंबर दोन म्हणजेच एक घरमालक पुलंना त्याने त्याच्या घरात केलेल्या विविध करामती दाखवत होता. त्याच्या घरातील प्रत्येक गोष्ट आपोआप होत असे. ऑटोमॅटिक ग्राइंडर, ऑटोमॅटिक चूल अशा बऱ्याच ऑटोमॅटिक गोष्टी दाखवल्यानंतर तो त्याच्या संडासच्या उंबऱ्यावर उभा राहून, ‘आणि हा संडास’ असे म्हणतो. तेव्हा, ‘‘काहो येथेही ऑटोमॅटिक होतं का कुंथावं लागतं?’’ असं विचारून पुलंनी त्या शत्रूचा, घरातही नाही आणि परसातही नाही, खोली आहे पण रुंदी नाही अशा स्थळाच्या उंबऱ्यावर हिरण्यकश्यपूसारखा शब्दानं का होईना, कोथळा काढला. पुलंचे विनोद हे मुद्दाम जुळवलेले किंवा ठरवून केलेले नसतात. ते असे उत्स्फूर्त असतात. विनोद ही पुलंची सहजप्रवृत्ती होती. त्यामुळे ते असे आपोआप तयार होतात, जसा आपेंआपपासून आपोआप शब्द तयार झाला.