काही गोष्टी उपजत येतात, बऱ्याचशा शिकाव्या लागतात. पण गोंधळ असा होतो की, उपजत कौशल्यांचा उपयोग करून केवळ उत्तम करिअरच करता येते असे नाही तर दैनंदिन आयुष्यही खूप आनंदी करता येते. यावर समाजमनाचे एकमत होईलच, असे नाही. म्हणजे असे बघा.. लहानपणापासून छान चित्रे काढणारे, कल्पक रंगसंगतीचा वापर करणारे मूल जेव्हा दहावीत जाते तेव्हा त्याच्या चित्रकलेवर पूर्णत: काट मारली जाते. ‘यंदा दहावी आहे तुझी. चित्रं कसली काढतोस?’ अशा पालकांच्या दटावणीला त्याला तोंड द्यावे लागते. दहावीत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार विज्ञान, वाणिज्य यासारख्या विद्याशाखांची निवड होते. काहीजण आर्किटेक्चरकडे वळतात.. पण या करिअरच्या निवडीत चित्रकला कुठेतरी बाजूला पडते.
२००५ पासून डिजिटल युग सुरू झाले. त्याआधी त्यात मोजकीच मंडळी होती. मात्र २००५ नंतर या क्षेत्रात एक मोठा आणि महत्त्वाचा बदल झाला. तो असा की, तोपर्यंत या क्षेत्रात केवळ उत्तम चित्रकारच स्थिरावू शकत असत. मात्र, डिजिटल तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे ज्याची रेषा पक्की आहे, त्या कलावंतालाही या क्षेत्रात भरभरून वाव मिळू लागला. या क्षेत्रातील विविध टप्प्यांवरील वेगवेगळ्या संधींची तोंडओळख आज आपण करून घेऊया. मी मुद्दाम तोंडओळख असा शब्द वापरत आहे. कारण दरवर्षी यात काही ना काहीतरी भर पडत असते.
फाइन आर्ट्स व कमर्शियल आर्ट्स या दोन विभागांत चित्रकलेतील अभ्यासक्रमांचे विभाजन केले जाते. ‘कलेकरता कला’ असा एक शब्दप्रयोग गेली शंभर वर्षे तरी वापरला जातो. माझ्या मनातील भावना, कल्पना, मला एखादी गोष्ट जशी भावली तशीच चित्ररूपाने कागदावर उतरवणे हा याचा एक मूलभूत भाग होय. मग हे केवळ चित्रापुरते न राहता शिल्पकला, म्युरल्स, धातुकला या साऱ्याला वेढून पुढे जाते.
निसर्ग, माणसे, प्राणी, अवकाशातील रंगांची उधळण जशी यात अंतर्भूत होते तशीच काष्ठशिल्प, धातुशिल्प, शिलाखंडातून केलेली निर्मितीसुद्धा यातच मोडते. यातीलच विविध पद्धतीत अगदी जसेच्या तसे चित्र काढले जाते, त्याउलट आपल्याला भावले तसे चित्रही कागदावर उतरते. याचाच पुढचा टप्पा म्हणजे अबोध चित्रकलेचा किंवा अॅबस्ट्रॅक्टचा.
अर्थातच फाइन आर्ट्सच्या अभ्यासात सौंदर्यशास्त्राचा, शरीररचनेचा, रंगसंगतीचा गाढा अभ्यास जसा शिकवला जातो तसाच तो आत्मसात करण्यात अनेकदा पुढची काही वर्षे जावी लागतात. एखादा गवई, नृत्यांगना, वादक ज्या कष्टाने त्याची कला सादर करतो, त्यासाठी तपश्चर्या करतो तसेच काहीसे फाइन आर्ट्स या विषयात करावे लागते. मात्र कला क्षेत्रात स्वत:च्या नावाची मोहोर उमटवणाऱ्या बहुतेक चित्रकारांची सुरुवात फाइन आर्ट्समधूनच होते.
मात्र, या स्वत:ला शोधण्याच्या कालावधीत ही मंडळी सहजपणे उपयोजित किंवा कमर्शियल आर्टमधली छोटी-मोठी कामे सहजपणे करू शकतात. किंबहुना ती करणारी असंख्य नामवंत चित्रकारांची नामावलीच इथे देता येणे शक्य आहे. उपजीविकेसाठी ही कामे करतानाच मनातील कल्पना कागदावर उतरवणारे हळूहळू फक्त मनाजोगती चित्रे काढण्याच्या कामापर्यंत पोहोचतात. मात्र हा रस्ता खडतर आहे, हे नक्की.
शाळेत असताना ज्यांनी इंटरमिजिएट ड्रॉइंगची परीक्षा दिली आहे, त्यांना थेट दहावीनंतरच जी. डी. आर्ट्स या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. चित्रकला परीक्षेत ज्यांना ‘अ श्रेणी’ वा ‘ब श्रेणी’ मिळाली आहे त्यांनी या क्षेत्राचा आवर्जून विचार करावा, असे सुचवेन.
या अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष फाऊंडेशनचे वर्ष म्हणून ओळखले जाते. त्यानंतरच फाइन किंवा कमर्शियल अशी विभागणी होते. एकूण पाच वर्षांचा हा अभ्यासक्रम राज्यातील सर्व प्रमुख शहरी, निमशहरी भागांत उपलब्ध आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फाइनमधला चित्रकार सहजगत्या कमर्शियलकडे वळू शकतो. पण याउलट मात्र क्वचितच घडते. समजा, चित्रकलेची आवड आहे, पण इंटरमिजिएट परीक्षा दिलेलीच नाही तर बारावी पूर्ण करून बॅचलर इन फाइन आर्ट्स (बीएफए)ला आपण प्रवेश घेऊ शकतो. राज्यातील सर्व आर्किटेक्चरच्या संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध असतो. चार वर्षांत चित्रकलेतील पदवी आपल्या हातात येते. जी.डी.आर्ट्स पूर्ण केलेल्यांनासुद्धा कमी कालावधीत हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो.
कमर्शियल आर्ट्सच्या अभ्यासक्रमाची नावे तीच आहेत. जी. डी. आर्ट्सच्या अभ्यासक्रमाची नावे तीच आहेत. जी. डी. आर्ट्स वा बीएफएच्या प्रवेशाची पद्धत तीच आहे. महत्त्वाचा फरक म्हणजे याआधी इंटरमिजिएट परीक्षेतील श्रेणीचा केलेला उल्लेख. ‘अ’ श्रेणी असेल तर तुम्ही सृजनशील कमर्शियल आर्टिस्ट बनाल. ‘ब’ श्रेणी असेल तर उत्तम आर्टिस्ट बनाल तर ‘क’ श्रेणी असली तरीही तुम्ही सराव, उत्तम प्रशिक्षण आणि अनुभवांतून उत्तम आर्टिस्ट बनत जाता. मात्र तिघांच्या कामाच्या पद्धतीत फारसा फरक नसतो. प्रत्येक क्षेत्रात जसे नामवंत, गाजलेले, मागणी असलेले असे प्रकार असतात तसेच काहीसे इथे घडते.
फाऊंडेशनचा अभ्यासक्रम संपला की विविध पद्धतींत चित्रकलेचा वापर जिथे होऊ शकतो, त्याची तोंडओळख या अभ्यासक्रमामध्ये होत जाते. जाहिरात, डिझाइन, लोगो, नेपथ्य, कलादिग्दर्शन, इंटिरिअर अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत ही मंडळी काम करतात. पुस्तकांची मुखपृष्ठे बनवणे, वृत्तपत्रांच्या पानाचा लेआऊट करणे, मासिकांची सजावट करणे अशा अनेक क्षेत्रांत या आर्टिस्टची गरज असते.
आयटी कंपन्यांनासुद्धा वेगाने काम करणारे, कम्प्युटरवर भराभर आर्टिस्टिक बदल करू शकणारे कमर्शियल आर्टिस्ट लागतात. किंबहुना प्रत्येक कंपनीत असा एक विभागच असतो. त्यांचे वेतनसुद्धा त्या विशिष्ट क्षेत्राला साजेसे असतात.
ज्या डिजिटल युगाचा सुरुवातीला उल्लेख केला, त्यातील विविध करिअर पर्याय बीएफए झालेला विद्यार्थी निवडू शकतो. अॅनिमेशन, डिझाइन, इंटिरिअर डिझाइन, इंडस्ट्रियल डिझाइन अशा क्षेत्रांत काम करणारे अनेकजण शिकत शिकतच त्या क्षेत्रात स्थिरावले आहेत.
पदवी घेतानाच कॉम्प्युटरचे फोटोशॉपपासून सुरू होणारे छोटे-मोठे अभ्यासक्रम शिकण्याचा जरूर उपयोग होतो. यानंतरचे टप्पे येतात ते टूडी, थ्रीडी, माया, फ्लॅश, अॅडोब यासारख्या नेमक्या अभ्यासाचे. हे सारे कुशलतेने आणि वेगाने हाताळणारा आर्टिस्ट आज एखाद्या अभियंत्याएवढे कमावू शकतो. त्याला नोकरी, करिअरची प्रतीक्षा करावी लागत नाही. अनेकजण स्वत:चाच स्टुडिओ काढून कामे पूर्ण करतात.
सध्याचे युग दूरचित्रवाणीचे आहे. जे आपल्याला पडद्यावर दिसत असते, त्यात वेगाने बदल करून ते आकर्षक बनवणे हासुद्धा कमर्शियल आर्टिस्टच्या कामाचा भाग आहे. अर्थातच या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी नेमकेपणाने व वेगाने काम शिकणे गरजेचे आहे. विविध सांस्कृतिक आणि मनोरंजरपर कार्यक्रमांचे कलादिग्दर्शन, नेपथ्य, सजावट यातही आर्टिस्टची गरज लागते. अर्थातच इव्हेंट मॅनेजमेंटचाही हा एक अविभाज्य घटक बनू शकतो.
स्वत:ची आकर्षक आणि अद्ययावत वेबसाइट असणे हा व्यवसायाचा एक अविभाज्य भाग आहे. युजर इंटरफेस बनवून प्रॉडक्ट विकण्यासाठीही आर्टिस्ट व्यक्तींची नेहमीच गरज भासते..
आतापर्यंत पाहिलेल्या विविध क्षेत्रांत कमर्शियल आर्टिस्ट लीलया प्रवेश करू शकतो. गरज आहे ती मनातून त्याबद्दलची संदिग्धता काढून टाकण्याची! चित्रे काढून काय पोट भरणार हे वाक्य अनेकदा कानावर पडते. बारावी विज्ञान शाखेत कमी मार्क मिळाल्यानंतर  अभियांत्रिकीऐवजी हा पर्याय सुचवला जातो. कारण ज्यांना चित्रकलेत गती असेल त्यांच्यासाठी यामधील करिअर हाच खरा उन्नती साधण्याचा मार्ग असतो. याला थोडेसे विनोदाने वेगळ्या शब्दात सांगायचे म्हणजे- ‘तुमच्या मुलाच्या हातात दहा तोळ्यांची सोन्याची चीप आहे. तरीही तुम्ही अन्य न झेपणारे मार्ग का शोधत आहात?’
जे पालक आपल्या पाल्याला चित्रकलेत करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देतात, त्या मुलांच्या आयुष्याचे खरोखर सोनेच होते. आनंदाचे झाड त्यांना सापडते. जाणून घ्या, तुमच्या मुला-मुलीच्या हातात अशी काही कला आहे का?

Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप