|| योगेश बोराटे

संस्थेची ओळख

आसाममधील उच्चशिक्षणाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या स्वतंत्र संस्थेची मागणी विचारात घेत, २६ जानेवारी, १९४८, रोजी या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्यापूर्वीच्या काळामध्ये पूर्वेकडील राज्यांसाठी कोलकाता विद्यापीठ ही उच्चशिक्षणाच्या सुविधा पुरविणारी एकमेव संस्था अस्तित्वात होती. पूर्वेकडील राज्यांसोबतच मध्य भारतातील काही राज्यांमधील विद्यार्थ्यांचाही त्याकडे ओढा असे. त्यामुळे स्वाभाविकच पूर्वेकडील राज्यांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना तीव्र स्पध्रेला सामोरे जावे लागत होते. पर्यायाने आसामसारख्या राज्यामधील गुणवंत विद्यार्थ्यांनाही उच्चशिक्षण घेण्यामध्ये मर्यादा येत होत्या. या पाश्र्वभूमीवर आसामसाठीच्या स्वतंत्र विद्यापीठाची मागणी जोर धरू लागली होती. या मागणीचे रूपांतर एका जनचळवळीमध्ये झाले होते. त्याचाच परिणाम म्हणून की काय, आसामी जनतेच्या छोटय़ा-मोठय़ा देणग्यांमधून या विद्यापीठाची पायाभरणी होत गेली. १८ संलग्न महाविद्यालये आणि ८ पदव्युत्तर विभागांच्या आधाराने सुरू झालेल्या या विद्यापीठामध्ये सध्या जवळपास ४५ विभाग चालतात. त्याशिवाय जवळपास साडेतीनशे महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत. सुरुवातीपासूनच एक निवासी विद्यापीठ अशी ओळख राहिलेल्या या विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून आवश्यक त्या सुविधांचाही टप्प्याटप्प्याने विस्तार केला. स्थानिक गरजा आणि ज्ञानपरंपरा विचारात घेत, अलीकडच्याच काळात या विद्यापीठाने सेंटर फॉर ब्रह्मपुत्रा स्टडीजची उभारणी सुरू केली आहे.

विभाग आणि अभ्यासक्रम

या विद्यापीठामध्ये एकूण ४५ शैक्षणिक विभाग चालतात. या विभागांमध्ये चालणाऱ्या एकूण ५५ अभ्यासक्रमांपकी आंतरविद्याशाखीय गटामध्ये मोडणारे २६ अभ्यासक्रम हे या विद्यापीठाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ ठरते. त्याशिवाय, दूरशिक्षणाच्या विस्तारासाठी विद्यापीठाने इन्स्टिटय़ूट ऑफ डिस्टन्स अँड ओपन लìनगचीही स्थापना केली आहे. या मूलभूत शैक्षणिक सुविधांच्या आधाराने विद्यापीठामध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी, एम. फिल., पीएच.डी., पदव्युत्तर प्रमाणपत्र आणि पदव्युत्तर पदविका अशा वेगवेगळ्या गटांमधील शैक्षणिक अभ्यासक्रम चालविले जातात. कला विद्याशाखेंतर्गत एकूण २३ विभाग चालतात. त्यामध्ये नेहमीच्या पारंपरिक विभागांसह आसामीज, बोडो, बंगाली, डिसॅबिलिटी स्टडीज, इंग्लिश लँग्वेज टिचिंग, पíशयन या विषयांना वाहिलेले स्वतंत्र विभाग चालतात. ललित कला विद्याशाखेंतर्गत दोन विभाग, वाणिज्य आणि व्यवस्थापनाविषयीचा प्रत्येकी एक स्वतंत्र विभाग, विज्ञानाच्या मूलभूत विषयांना वाहिलेले एकूण १० विभाग, तंत्रज्ञानाच्या विविध विषयांना वाहिलेले एकूण आठ विभाग अशा स्वरूपामध्ये या विद्यापीठातील विद्याशाखांचे कामकाज चालते. विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ मॉडर्न इंडियन लँग्वेजेसमध्ये एम.ए. लँग्वेज स्टडीज या अभ्यासक्रमासह आसामी, ओडिया, तामिळ आणि नेपाळी भाषांमधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम चालतात. डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्समध्ये साउथ ईस्ट एशियन स्टडीजचा विशेष अभ्यास करण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे.

डिपार्टमेंट ऑफ बायोइंजिनीअिरग अँड टेक्नॉलॉजीमध्ये फूड सायन्स विषयामधील इंटिग्रेटेड एम. एस्सी.- पीएच.डी.चा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांसाठीचा एक चांगला पर्याय म्हणून पुढे आला आहे. आसामीज, अरेबिक, बोडोसाठीच्या स्वतंत्र विभागांमधून नियमित पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जोडीने एम. फिल. आणि पीएच.डी.साठीचे संशोधनपर अभ्यासक्रमही चालतात. डिसॅबिलिटी स्टडीज विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी सहा महिने कालावधीचा पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम, विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी कॉम्प्युटर प्रशिक्षण, प्रज्ञाचक्षू उमेदवारांसाठी विज्ञान विषय शिकविण्याचे विशेष प्रशिक्षण घेणे शक्य आहे. इकोनॉमिक्स विभागांतर्गत एम. ए. किंवा एम. एस्सी. इकॉनॉमिक्स हा अभ्यासक्रम शिकता येतो. तसेच बिझनेस इकोनॉमिक्स विषयातील एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधीही या विभागामध्ये उपलब्ध आहे. मानसशास्त्र विभागामध्ये नियमित पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जोडीने मानसशास्त्रीय समुपदेशन विषयामधील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकता येतो. कॉमर्स विभागांतर्गत नियमित एम. कॉमच्याच जोडीने विद्यार्थ्यांना पाच वष्रे कालावधीचा इंटिग्रेटेड एम. कॉम. पीएच.डी. अभ्यासक्रमही करणे शक्य आहे. विद्यापीठाच्या फिजिक्स विभागामधून विद्यार्थ्यांना फिजिक्स व रेडिओलॉजिकल फिजिक्स या दोन विषयांमधील एम. एस्सीचे अभ्यासक्रम शिकण्याचे पर्याय या विद्यापीठाने खुले केले आहेत.

सुविधा

निवासी विद्यापीठ अशी ओळख असलेल्या या विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी २३ वसतीगृहे उभारली आहेत. त्यामध्ये संशोधक विद्यार्थी-विद्याíथनींसाठीच्या दोन स्वतंत्र वसतीगृहांचाही समावेश आहे. विद्याíथनींसाठीच्या एकूण १२, तर विद्यार्थ्यांसाठीच्या ११ वसतीगृहांमध्ये विद्यापीठाने भोजनगृहांच्या स्वतंत्र सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. कला, विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, विधी आणि ललित कला आदी विद्याशाखांमधून विभागलेल्या या सर्व विभागांमधून संशोधक विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पीएच.डी.साठीच्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे विद्यापीठ पीएच.डी.साठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा आणि समुपदेशनाची फेरी राबविते. त्याआधारे संशोधक विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यातून पीएच.डी.साठी निवड होणाऱ्या संशोधकांसाठी स्वतंत्रपणे विद्यावेतनाच्या सुविधाही काही विभागांमधून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाचे स्वत:चे असे एक स्वतंत्र सामुदायिक रेडिओ केंद्रही आहे. १८ जानेवारी, २०११ रोजी या रेडिओ केंद्राच्या कामाची सुरुवात झाली. ईशान्येकडील राज्यांमधील या प्रकारचे हे पहिलेच रेडिओ केंद्र ठरते. विद्यापीठाशी संबंधित सर्व घटक, स्थानिक नागरिक यांच्या परस्पर सहकार्यामधून हे केंद्र चालते. विद्यापीठाच्याच परिसरामध्ये दोन मॉडेल स्कूल्सही चालविल्या जात आहेत. या माध्यमातून स्थानिक नागरिकांनाही विद्यापीठाने आपल्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले आहे.

borateys@gmail.com