क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी विविध अभ्यासक्रमांची आणि करिअर संधींची माहिती
आपल्या प्रचंड देशाला ‘एशियन टायगर’ची उपमा दिली जाते खरे, मात्र क्रीडा क्षेत्रात जागतिक पातळीवर, नव्हे आशिया खंडातही आपली झेप फारशी पल्याड जात नाही. आपल्यासारखीच प्रचंड लोकसंख्या असलेल्या चीननं गेल्या १० वर्षांत खेळांमध्ये केलेली प्रगती विस्मयकारक ठरतेय. अमेरिकेसारख्या बलाढय़ सत्तेला खेळात आव्हान देण्याइतपत चीनची मजल गेलीय. भारताचा आकार आणि लोकसंख्येच्या तुलनेत टीचभर असलेला जपानही आपल्यापेक्षा १०० पट समोर आहे. आशिया खंडात आपण कसंबसं पहिल्या दहांमध्ये येतो. खेळ आणि खेळाडूंकडे बघण्याची आपली अनास्था जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत अशीच दुरावस्था होणार. यावर काहीच उपाय नाहीत का?
केंद्र सरकार आणि काही राज्य सरकारे या दृष्टीने थोडेफार प्रयत्न करीत असतात. महाराष्ट्रानेही खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांमध्ये पाच टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेऊन खेळाडूंच्या गुणवत्तेचं चीज करण्याचं ठरवलं आहे. या निर्णयाचा फायदा साधारणत: ५० क्रीडाप्रकारांना होणार आहे. हे सर्व खेळ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघ व राष्ट्रीय ऑलिम्पिक संघ व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघाने मान्य केले आहेत. या क्रीडाप्रकारांमध्ये कबड्डी, खोखो, आटय़ापाटय़ा, हॉकी, मल्लखांब, बुद्धिबळ, कॅरम, योग, अ‍ॅथलेटिक्स, कराटे, शरीरसौष्ठव, क्रिकेट, वेटलििफ्टग, बॉिक्सग, सायकिलग, व्हॉलिबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, बॅडिमटन, टेबलटेनिस, बेसबॉल, रायफल शूटिंग, जिमनॅस्टिक, पोलो, पॉवरलििफ्टग, ब्रिज, तायक्वांदो, स्केटिंग, सॉफ्टबॉल, टेनिक्वाइट, बॉल बॅडिमटन, ब्लाइंड स्पोर्ट, थ्रोबॉल, बिलियर्ड अँड स्नूकर, रोइंग, रोलर स्केटिंग, आइस आर्चरी, स्क्वॉश, माउंटेनीअिरग, स्कूल गेम, सॉफ्ट टेनिस, टग ऑफ वार यांसारख्या क्रीडाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या खेळांमधील व्यक्तिगत आणि सांघिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये विशेष कामगिरी बजावणाऱ्या महिला आणि पुरुष खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील नोकऱ्यांमधील शासनाच्या अ, ब, क आणि ड या संवर्गात पाच टक्के आरक्षणाचा फायदा मिळू शकेल. यासाठी संबंधित खेळाडूंचं राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश आणि प्रत्येक पदासाठी आवश्यक असणारी किमान अर्हता आवश्यक राहील. अतिशय उच्च दर्जाचं यश प्राप्त करणाऱ्या खेळाडूंबाबत शासन सर्व प्रकारच्या अटी व नियम शिथिल करू शकेल. या विषयीच्या विस्तृत अटी व नियमांची माहिती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे मिळू शकेल. हा निर्णय गुणवंत खेळाडूंसाठी उपयुक्त ठरणारा आहे. त्यांना आपला बहुतेक वेळ खेळाच्या सरावावर केंद्रित करता येईल.
या निर्णयामुळे महाराष्ट्रात क्रीडाविषयक संस्कृतीचं संवर्धन होण्यास साहाय्य होऊ शकेल. पूर्वप्राथमिक स्तरापासून पुढे मुलांचा कल आणि कौशल्य एखाद्या  आवडीच्या खेळांमध्ये दिसून आले तर त्यांना सतत प्रोत्साहन देणं, त्याला खेळासाठी साधनं आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मात्र पालक, शाळा आणि समाजानेही आपला वाटा उचलायला हवा. या निर्णयाचा लाभ केवळ गुणवत्तेनुसार म्हणजेच प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक संपादन करणाऱ्या खेळाडूंनाच मिळेल, हेही लक्षात ठेवायला हवे. त्यासाठी क्रीडाप्रकारांकडे फावल्या वेळात मन रिझवण्यासाठीचा टाइमपास म्हणून न बघता त्याकडे एक पॅशन म्हणून बघायला हवे.
इतकं सविस्तरानं सांगायचं कारण की, मुलांना खरोखरच खेळामध्ये स्वारस्य दिसून आलं तर त्या विशिष्ट खेळाचं रीतसर शिक्षण-प्रशिक्षण घ्यायला हवं. असं शिक्षण देणाऱ्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत-
स्कूल ऑफ स्पोर्ट्स
आपल्या देशात खेळ शिकवणारी एक स्वतंत्र शाळा आहे. ती मोतिलाल नेहरू स्कूल ऑफ स्पोर्ट्स या नावानं ओळखली जाते. ही निवासी शाळा हरियाणा सरकारच्या वतीनं सोनपत जिल्ह्य़ातील राय या ठिकाणी चालवली जाते. ही शाळा ३०० एकर परिसरात वसली असून दिल्लीच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन- सीबीएसई) संलग्न आहे. या शाळेत सहाव्या वर्गापासून प्रवेश दिला जातो. एकूण १०० मुलांची निवड केली जाते. यातील ८० टक्केमुले ही हरियाणा राज्यातील असतात, तर इतर ठिकाणच्या२० टक्के मुलांना प्रवेश मिळतो.
या संस्थेतील मुलांच्या निवडीसाठी शारीरिक क्षमता चाचणी आणि क्रीडा कल चाचणी (स्पोर्ट्स अ‍ॅॅप्टिटय़ूड टेस्ट) घेतली जाते. १० ते १२ वर्ष वयाच्या मुलांना ही प्रवेश परीक्षा देता येते. सहावीतील या थेट प्रवेशाशिवाय सातवी ते अकरावीपर्यंतच्या वर्गात शिल्लक राहिलेल्या जागांसाठी याच प्रकारची प्रवेश चाचणी (लॅटरल एन्ट्री अ‍ॅडमिशन) घेतली जाते. यामध्ये लेखी परीक्षेचाही समावेश केला जातो. खेळात प्रावीण्य मिळविलेल्या प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्गात प्रवेश दिला जातो. या मुलांचं वय १० ते १७ वर्षे या दरम्यान असावं. या मुलांनी कनिष्ठ वा वरिष्ठ राष्ट्रीय खेळांमध्ये सहभाग घेतलेला असावा किंवा राज्य खेळ स्पर्धामध्ये प्रथम, द्वितीय वा तृतीय क्रमांक संपादन केलेला असावा. पत्ता : मोतिलाल नेहरू स्कूल ऑफ स्पोर्ट्स, राय (जिल्हा-सोनपत)१३१०२९,
वेबसाइट- http://www.mnssrai.com.
ई-मेल-mnssrai@rediffmail.com
डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग
तामीळनाडू फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीने खेळ, कोचिंग, फिटनेस, योग या विषयांमध्ये विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यामध्ये-
* डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग (अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी- एक वर्ष)
* पोस्ट गॅ्रज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स फिजिओथेरेपी (अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी- एक वर्ष)
* मास्टर ऑफ सायन्स इन स्पोर्ट्स बायोमेकॅनिक्स (अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी- दोन वर्षे)
* मास्टर ऑफ सायन्स इन स्पोर्ट्स सायकॉलॉजी अँड सोशिओलॉजी (अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी- दोन वर्षे)
* मास्टर ऑफ सायन्स इन स्पोर्ट्स कोचिंग (अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी- दोन वर्षे)
* मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी (अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी- दोन वर्षे),
* मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट (अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी- दोन वर्षे)
वरील सर्व विषयांमध्ये एम. फिलसुद्धा करण्याची सुविधा या विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष.
पत्ता- एटथ् फ्लोर, इव्हीके संपथ मालीगाय, कॉलेज रोड, चेन्नई ६, तामीळनाडू.
 मेल-enquiry@tnpesu.org
वेबसाइट-www.tnpesu.org,  http://www.tn.gov.in
 मास्टर ऑफ सायन्स इन स्पोर्ट्स कोचिंग
स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेनं खेळ-प्रशिक्षणासंदर्भातील तीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
* मास्टर ऑफ सायन्स इन स्पोर्ट्स कोचिंग. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे. हा अभ्यासक्रम पतियाळा येथील केंद्रात चालवला जातो.  यामध्ये अ‍ॅथलेटिक्स, बास्केटबॉल, फुटबॉल, जिमनॅस्टिक्स, हॉकी, स्वीिमग, व्हॉलिबॉल, वेटलििफ्टग आणि कुस्ती या खेळांच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे.
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स मेडिसीन. पतियाळा येथे या अभ्यासक्रमाची सुविधा उपलब्ध असून अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे आहे.
* डिप्लोमा इन स्पोर्ट्स, कालावधी एक वर्ष, अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी आणि मान्यताप्राप्त खेळातील प्रावीण्य. या तीनही अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो.  
पत्ता – स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया, नेताजी सुभाष नॅशनल इस्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्स, ओल्ड मोतीबाग, पतियाळा -१४७००१.  
मेल-mail@nsnis.org, वेबसाइट-www.nsnis.org

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट
इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट या संस्थेनं हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी – एक वर्ष, अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. हा अभ्यासक्रम केल्यानंतर ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ युनिव्हर्सटिीच्या मास्टर्स कोर्स इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.
पत्ता- इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट, जयिहद कॉलेज, ए रोड, चर्चगेट, मुंबई- ४०००२०  
मेल-  info@iismworld.com वेबसाइट- http://www.iismworld.com