रोजच्या जीवनात अनुभवायला मिळणाऱ्या शोधांचे जनक, त्या शोधांची जन्मकथा आणि त्यांचे व्यवहारातले उपयोजन याबद्दल माहिती देणारं आणि प्रकल्प कार्याला उपयुक्त ठरणारं कृतीप्रधान पाक्षिक सदर..
कालपरवापर्यंत हसत खेळत, बागडत असलेलं लहान मूल अचानक तापाने फणफणतं. घरगुती उपायांना ताप दाद देत नाही आणि मग डॉक्टरांकडे जायची वेळ येते. तोपर्यंत दोन-तीन दिवसांत ते मूल पार लुळंपांगळं होतं. आई-वडिलांना कळतही नाही, तोपर्यंत त्या तापाने आपलं काम उरकलेलं असतं. अवघ्या तीन दिवसांमध्येच ते हसतंखेळतं मूल पोलिओची शिकार झालेलं असतं. पन्नासएक वर्षांपूर्वी आपल्या देशात अशी परिस्थिती असायची. तेव्हा पोलिओचा विळखा असा भयानक होता, पण आता परिस्थिती बदलली आहे. लहानपणी पोलिओची शिकार झालेला एखाददुसरा माणूस आपल्या दृष्टीस पडतो पण तो चाळिशीच्या वयोगटातला असतो.
पोलिओचं अस्तित्व जगभरात कित्येक वर्षांपासून होतं, असं सांगितलं जातं. इजिप्तमध्ये साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या एका म्युरलमध्येही एक लुळा पडलेला म्हातारा दाखवला होता आणि तो पोलिओचा रुग्ण असावा, असं संशोधक सांगतात. अर्थात, वैद्यकीय जगतात पोलिओचा विषाणू १९०८ साली सापडला. तेव्हापासून त्यावर संशोधन सुरू झालं आणि त्याला हद्दपार करण्याचे उपायही शोधायला सुरुवात झाली. आज पोलिओवर मात करण्यासाठी हमखास अशी लस उपलब्ध आहे.
रोगांवर दिली जाणारी लस म्हणजे चक्क त्या त्या रोगाचे मृत किंवा दुर्बल जंतू अथवा जंतूंचा अंश असतो. ही लस शरीरात गेली की, जणू काही त्या रोगाची रंगीत तालीम सुरू होते. लसीमध्ये असलेले जंतू सबळ नसल्याने शरीरात रोगाचा प्रादुर्भाव होत नाही; पण शरीराला त्या रोगजंतूंशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो आणि शरीरामध्ये त्या रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते.
पोलिओच्या लसीचे श्रेय जोनास साल्क आणि अल्बर्ट सॅबिन या दोन समवयस्क संशोधकांकडे जातं. विशेष म्हणजे दोघांनीही १९३९ सालीच वैद्यकीय पदवी संपादन केली. १९३९ साली ज्या वर्षी सॅबिनने वैद्यकीय पदवी संपादन केली, त्याच वर्षी न्यूयॉर्क शहरात पोलिओच्या साथीने धुमाकूळ घातला होता. त्याच वेळी दुसऱ्या महायुद्धाचाही भडका उडाला होता. राष्ट्रकार्य म्हणून सॅबिन लष्करात भरती झाले आणि युद्ध संपल्यावर पुन्हा आपल्या संशोधन कार्यात स्वत:ला वाहून घेतले. त्यांच्या संशोधनाची दिशा ठरली होती. आज अमेरिका पोलिओमुक्त असली तरी १९५०च्या दशकात अमेरिकेतसुद्धा पोलिओची दहशत होती. १९५२ साली आलेल्या पोलिओच्या साथीने हजारो मुलांना कायमचं पांगळं केलं होतं. त्यामुळे सॅबिन यांनी ठरवलं होतं की, पोलिओला कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंपकी दुबळे विषाणू शोधायचे आणि त्यांच्यापासून रोगाला प्रतिकार करेल अशी लस शोधून काढायची. पण, सॅबिन यांची पोलिओवरची लस शोधण्याआधीच जोनास साल्क यांनी पोलिओवर लस तयार करण्यात यश मिळवलं.
१९५४च्या सुमारास तयार केलेल्या लसीमध्ये जोनास साल्क यांनी पोलिओच्या मृत विषाणूंचा वापर केला. त्वचेखाली तीन इंजेक्शनच्या स्वरूपात ही लस द्यावी लागत असे. सात वर्षांच्या खडतर संशोधनानंतर पोलिओचे विषाणू फॉम्रेलिनच्या मदतीने दुर्बल करून त्यापासून लस तयार करण्यात साल्क यांना यश आले. विशेष म्हणजे, या लसीचे प्रयोग साल्क यांनी केवळ माकडांवर केले नाहीत तर त्यांनी ही लस सर्वप्रथम स्वत:ला, पत्नीला आणि आपल्या मुलांना टोचली. स्वत:वर प्रयोग करून खात्री केल्याशिवाय इतरांवर प्रयोग करू नका, असा त्यांचा आग्रह होता.
जोनास साल्क यांनी तयार केलेल्या लसीनंतर दोनच वर्षांत म्हणजे १९५६ साली अल्बर्ट सॅबिन यांना पोलिओवरची लस तयार करण्यात यश आलं. १९६०-६१ साली योग्य त्या परवानग्या मिळाल्यावर ही लस सगळीकडे उपलब्ध होऊ लागली. सॅबिन यांनी तयार केलेली लस साल्क यांनी तयार केलेल्या लसीपेक्षा वेगळी होती. या लसीमध्ये असलेले पोलिओचे विषाणू जिवंत होते आणि विशेष म्हणजे ही लस इंजेक्शनच्या मदतीने त्वचेखाली न टोचता तोंडाने घ्यायची होती. त्यामुळे ही लस देण्यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्याची गरज नव्हती. आजही याच लसीचे दोन थेंब पाच वर्षांखालील बाळांना दिले जातात.
सॅबिन यांनी जपान – बी या विषाणूजन्य काविळीवर, तसेच डेंग्यू आणि सँडफ्लाय तापावरही लस शोधली.
देवीच्या रोगाप्रमाणेच पोलिओचेसुद्धा जगातून उच्चाटन होण्यासाठी साल्क आणि सॅबिन यांनी शोधलेल्या लसी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. अजूनही दक्षिण आशियाई देश आणि अफ्रिका येथे पोलिओचे प्रमाण जास्त आहे. पण १९८८ सालापासून वर्ल्ड हेल्थ  ऑर्गनायझेशन, युनीसेफ आणि रोटरी इंटरनॅशनल या संस्थांनी संपूर्ण जगभरात केलेल्या प्रयत्नांमुळे पोलिओच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.  
लसीकरणामुळे १९७०च्या सुमारास जगभरातून देवीच्या रोगाचं उच्चाटन झालं, पण लसीकरणाचा शोध लागण्यापूर्वी कित्येक वष्रे देवीच्या रोगावर मात करण्यासाठी लसीकरणाची संकल्पना प्राथमिक अवस्थेत वापरली जात होती. देवीच्या रोगाची सौम्य लागण एखाद्याला घडवून आणायची म्हणजे पुढील आयुष्यात त्याला देवीचा रोग होणार नाही, हे लसीकरणाचा शोध लागण्यापूर्वी मानवाला माहीत झालं होतं. देवीच्या रोगाची सौम्य लागण होण्यासाठी त्याकाळी देवी झालेल्या रोग्याच्या कपडय़ांमध्ये लहान मुलांना गुंडाळून ठेवणे, रोग्यांच्या शरीरावरील फोडांच्या खपल्या जमा करून त्याची पूड निरोगी माणसाच्या नाकात फुंकणे, अशा प्रकारच्या निरनिराळ्या युक्त्यांचा वापर केला जायचा. पण, या उपायांना शास्त्रीय आधार नव्हता. १८व्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा एडवर्ड जेन्नर याने लसीकरणाचा शोध लावला तेव्हा या संकल्पनेला शास्त्रीय बठक प्राप्त झाली. एडवर्ड जेन्नरने लावलेल्या लसीकरणाच्या शोधाची कथा मनोरंजक आहे. जेन्नरने लसीकरणाचा शोध कसा लावला, याविषयी माहिती मिळवा.
लसीकरणाबद्दल दिलेल्या पुढील प्रश्नांची उत्तरे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांच्या मुलाखती घेऊन मिळवा आणि या माहितीचे संकलन करा.      
*    लसीकरणाची उपयुक्तता आता सगळ्यांना माहिती झाली आहे आणि पटलीही आहे. जन्माला आल्यावर त्याच दिवसापासून बाळांना वेगवेगळ्या रोगांवर प्रतिबंध करण्याची लसीकरणाचे डोस द्यायला सुरुवात होते. हे लसीकरण करण्याचं विशिष्ट वेळापत्रक असतं. पोलिओप्रमाणेच इतर कोणकोणत्या रोगांवर मात करण्यासाठी लसीकरण केलं जातं? या लसी कधी दिल्या जातात आणि कशा प्रकारे दिल्या जातात? किती कालावधीनंतर त्या लसींचे पुढचे डोस घ्यावे लागतात? याविषयीची माहिती मिळवा.
*    वेगवेगळ्या रोगांवर एकत्रितपणे एकच लस दिली जाते, असे रोग कोणते आहेत? वेगवेगळ्या रोगांवर एकत्रितपणे एकच लस देणं कसं शक्य होतं?
*    सरकारी आरोग्य केंद्रांमधून मोफत लसीकरण करण्याची सुविधा आहे. जवळच्या सरकारी आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथे केल्या जाणाऱ्याा लसीकरणाची माहिती करून घ्या.
*    राष्ट्रीय पल्स पोलिओ मिशनविषयी माहिती मिळवा. संपूर्ण देशभरातील ० ते पाच वष्रे वयोगटातील बालकांना एकाच दिवशी पोलिओ डोस देण्यामागचा कोणता विशिष्ट हेतू आहे?
*    औषध विक्रेत्याकडून घेतलेली लस किती प्रभावी आहे, ती प्रभावी आहे की नाही, हे पाहण्यासाठी त्यावर एक व्हायल मॉनिटर असतो. या व्हायल मॉनिटरचे कार्य समजून घ्या.  
*    कोणत्या रोगांवर अजून लस शोधली गेलेली नाही? त्यामागची कारणे काय असावीत?
*    विशिष्ट रोगावर लस तयार करण्यासाठी त्या रोगाचे जंतू सुरक्षितपणे जतन करावे लागतात. हे जंतू सुरक्षितपणे जतन कसे केले जातात, याविषयी माहिती मिळवा.  
*    माणसांप्रमाणेच पाळीव प्राणी व पक्ष्यांना लसीकरण केले जाते का? हे लसीकरण कोणत्या रोगांसाठी केलं जातं आणि लसीकरण करण्याची पद्धत काय असते?
*    त्रिगुणी (ट्रिपल) लसीमधून धनुर्वाताला प्रतिबंध करण्यासाठी दिली जाणारी लस आणि लोखंडी खिळा लागून जखम झाल्यावर धनुर्वात होऊ नये म्हणून दिलं जाणारं इंजेक्शन यामध्ये काही फरक असतो का? असल्यास कोणता?
*    वेगवेगळी फळं आणि फळभाज्यांमध्ये प्रतिजैविके निर्माण करून या फळांचा उपयोग लसीकरणासारखा होऊ शकेल अशाप्रकारचं संशोधन सध्या केलं जात आहे. काही प्रमाणात त्याला यशही येत आहे. या भविष्यवेधी संशोधनाबद्दल माहिती मिळवा.     

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…