वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृतींत वाढलेल्या मुलांना एकत्रितपणे शिकवणे हे इस्रायलच्या शिक्षण विभागासमोरील मोठे आव्हान होते. ते त्यांनी कसे पेलले, याचा इस्रायलच्या शाळा आणि महाविद्यालयांना भेटी देऊन घेतलेला धांडोळा –
बेन गुरिअन विद्यापीठाच्या निमंत्रणावरून नुकताच इस्रायलला जाण्याचा योग आला. या भेटीत इलाट, तेल अवीव, जेरुसलेम या शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील शिक्षणप्रणाली बघता आली.
दुसरे महायुद्ध अनेक कारणाने गाजले. त्यात लाखो लोकांना आपले जीव गमवावे लागले. या युद्धात युद्धभूमीवर तर लोक मरण पावलेच, त्याखेरीज कँपमध्ये लाखो लोकांचे जीव गेले. ज्यू धर्माच्या लोकांना अशा कँपमध्ये एकत्र करून यमसदनाला पाठविण्यात आले. त्यात अनेक संसार उद्ध्वस्त झाले. प्रौढांबरोबरच बालकांचादेखील शिरच्छेद करण्यात आला. त्यामुळे ज्यू धर्मीय लोकांमध्ये एक प्रकाराचे नराश्य पसरले. या पाश्र्वभूमीवर इस्रायलदेशाची स्थापना झाली. आपली अस्मिता जागी करणे त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होते. त्याची गरज ओळखून त्यावेळच्या विचारवंतांनी हिब्रू भाषेतून शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. हिब्रू ही ज्यू लोकांची भाषा असली तरी ती भाषा अवगत असलेल्या लोकांची संख्या मर्यादित होती. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हिब्रू ही बोलीभाषा जास्त आणि ज्ञानभाषा कमी असेच त्याचे स्वरूप होते. या भाषेत शिक्षण देण्याची फारशी सोय उपलब्ध नव्हती. शालेय स्तरावरील सर्व विषय हिब्रू भाषेत शिकवायचे तर त्यासाठी पाठय़पुस्तके तयार करावी लागणार होती. ते काम त्यांनी युद्धपातळीवर हाती घेतले. हिब्रू भाषेत शिक्षण देऊ शकतील असे शिक्षक तयार केले. त्याचबरोबर मोठय़ा प्रमाणावर हिब्रू भाषेत शैक्षणिक साहित्य तयार केले. त्याचा परिणाम असा झाला की, सर्वत्र हिब्रू भाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू झाल्या.
आपल्याकडे प्रादेशिक भाषेतून शिक्षण द्यायचे म्हटले की पारिभाषिक शब्दांचा प्रश्न निर्माण होतो. हा प्रश्न त्यांनी कसा सोडवला, हे जाणून घेण्याची माझी उत्सुकता होती. म्हणून मी शाळेतील एका विज्ञान शिक्षकाला विचारले. त्यावर त्याने दिलेले उत्तर मोठे मार्मिक होते. तो म्हणाला ‘‘हिब्रू भाषेत पर्यायी पारिभाषिक शब्द उपलब्ध असतील तर ते आम्ही घेतो. नसतील तर मात्र नवीन शब्द निर्माण करण्याच्या भानगडीत आम्ही पडत नाही. इंग्रजी भाषेतील शब्द जसेच्या तसे आम्ही घेतो. फक्त त्याचा उच्चार हिब्रू भाषेप्रमाणे करतो.’’
मला वाटते नवनवीन बोजड पारिभाषिक शब्द तयार करीत बसण्यापेक्षा हा मार्ग चांगला आहे. नाहीतरी इंग्रजी भाषेने लॅटिन आणि ग्रीक भाषेतून जसेच्या तसे शब्द घेऊन आपली भाषा अधिक समृद्ध केलीच ना?   
सहा ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा आपण कायदा केला. परंतु तो कागदावरच राहिला. सरकारला नवीन शाळा काढणे शक्य नाही, हे कारण देऊन विनाअनुदानित शाळांना आपल्या देशात परवानगी दिली जात आहे. इस्रायलमध्ये मात्र शालेय शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी सरकारने उचलली आहे. उत्तम इमारती अणि सुविधा असलेल्या शाळा सर्वत्र सुरू केल्या आहेत. एवढेच नव्हे तर, इतर व्यवसायातील व्यक्तींना शाळेत जाऊन शिकवायला उत्तेजन दिले जाते. इलाट शहरातील एका शाळेत मी गेलो तर तिथे मला सनिकी गणवेशातील एक व्यक्ती भेटली. त्याने आपली ओळख त्या शाळेतील विज्ञान शिक्षक अशी करून दिली. चौकशी केली असता असे कळले की, तो सन्यात नोकरीला आहे. सनिकी पेशाबरोबरच त्याला शाळेत शिकवायला आवडते. म्हणून त्याने सरकारला विनंती केली. त्याची विनंती मान्य करून पूर्णवेळ शिक्षक म्हणून काम करण्याची त्याला परवानगी देण्यात आली. तो त्या शाळेत रसायनशास्त्र शिकविण्याचे काम करतो. शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये तो चांगलाच रुळला आहे. तो काम करतो शाळेत; परंतु, त्याचे वेतन मात्र येते सनिकी खात्यातून!
दुसऱ्या एका शाळेत गेलो तर तिथे मला विद्यापीठात शिकविणारे प्राध्यापक भेटले. ते विद्यापीठात सूक्ष्मजीवशास्त्र शिकवितात. त्या शहरातील शाळेला जीवशास्त्र शिकविणाऱ्या एका अनुभवी व्यक्तीची गरज होती. शाळेने विद्यापीठाकडे विचारणा केली आणि विद्यापीठाने जीवशास्त्र विभागातील एका प्राध्यापकाला अर्धवेळ शाळेत काम करण्याची सूचना केली. महत्त्वाचे हे की, विद्यापीठाची ही सूचना त्या प्राध्यापकाने आनंदाने स्वीकारली. शाळेत जाऊन शिकवणे हे त्यांना कमीपणाचे मुळीच वाटले नाही. विद्यापीठातील शिक्षण आणि संशोधनाबरोबरच शालेय शिक्षणदेखील ते तेवढय़ाच गांभीर्याने घेतात. त्यांना मी विद्यापीठात भेटलो. त्याचबरोबर त्यांचा शाळेतला पाठदेखील पाहिला. एका शार्क माशाचे डिसेक्शन त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना करून दाखविले. विशेष हे की, त्यांचे पूर्ण वेतन विद्यापीठच देते. ‘तू शाळेत काम करतोस तर अर्धा पगार त्यांच्याकडून घे,’ असे त्याला सांगितले जात नाही. यावरूनच या देशात शालेय शिक्षणाला किती महत्त्व देतात, ते दिसून येते.
ज्यू लोकांचा एक वेगळा देश असावा म्हणून इस्रायलची स्थापना करण्यात आली. देशाच्या निर्मितीनंतर जगाच्या वेगवेगळ्या भागांत राहात असलेल्या ज्यू वंशाच्या लोकांना नव्या देशात पाचारण करण्यात आले. १९४८ पासून बाहेरून लोक यायला लागले. ती प्रक्रिया अजूनही सुरू आहे. भारतात राहात असलेले अनेक ज्यू वंशाचे लोक इस्रायलमध्ये गेले. मूळची पुण्याची असलेली एक व्यक्ती मला इलाट शहरात भेटली. त्यामुळे महाराष्ट्रापासून एवढय़ा लांब अंतरावर मला मराठीत बोलता आले. त्या लहानशा गावात शंभरहून अधिक मराठी भाषिक कुटुंबे आहेत असे मला त्यांनी सांगितले. भारताखेरीज युरोप, आशिया, अमेरिका, आफ्रिका अशा वेगवेगळ्या खंडांतून लोक तेथे आले. प्रत्येकजण येताना आपली भाषा आणि आपली संस्कृती सोबत आणतो. अशा वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या मुलांना एकत्रितपणे शिकवणे हे एक आव्हानच असते. इस्रायल देशाच्या शिक्षण विभागाने हे आव्हान लीलया पेलले आहे. सर्वसमावेशक अशी शिक्षण प्रणाली त्यांनी विकसित केली. त्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. वेगळ्या पाश्र्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळेत विशेष कार्यक्रम राबवले गेले. याचा परिणाम असा झाला की, प्रत्येकजण तिथे रुळला आणि आपापल्या क्षमतेनुसार प्रगती करू शकला.
इस्रायल देशात काही मोजकीच शहरे आहेत. बराचसा भाग वाळवंटाने व्यापलेला आहे. त्यामुळे शहरी शाळा आणि ग्रामीण शाळा अशी तफावत आढळते. ही तफावत दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न केला जात आहे. यासाठी ग्रामीण शाळांना अद्ययावत सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्याचबरोबर प्रशिक्षित शिक्षकांनी ग्रामीण भागात जाऊन अध्यापनाचे काम करावे, यासाठी त्यांना विशेष उत्तेजन दिले जात आहे. ग्रामीण, शहरी याचबरोबर ज्यू, अरब असे भेददेखील तेथे पाहायला मिळतात. इस्रायल देशाची स्थापना झाली तेव्हा जे अरब लोक तेथे राहात होते त्या सर्वाना त्या देशाचे नागरिकत्व बहाल करण्यात आले. शाळेत ज्यू-अरब असा भेदभाव होणार नाही, असा प्रयत्न करण्यात आला. तरीही मूळचे अरब रहिवासी शिक्षणात मागे पडतात असे आढळते. या समस्येवर मात करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी अरबी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शाळा काढण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर अरबी लोकांना नवीन शाळा सुरू करण्यासाठी उत्तेजन देण्यात येत आहे. िलगभेद तिथे फारसा जाणवत नाही. मुलांबरोबरच मुलींनादेखील समान शिक्षणाची संधी उपलब्ध आहे. याचा तेथील महिलांनी चांगला लाभ घेतला आहे. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियादेखील वेगवेगळ्या क्षेत्रांत आगेकूच करीत असल्याचे दृश्य इथे पाहायला मिळते. 
(पूर्वार्ध)
sudhakar.agarkar@gmail.com
( समन्वयक : हेमंत लागवणकर)