18 July 2019

News Flash

करिअर मंत्र

मी मेकॅनिकलच्या शेवटच्या वर्षांत आहे.

डॉ. श्रीराम गीत

मी मेकॅनिकलच्या शेवटच्या वर्षांत आहे. मला राज्यसेवा आयोगाची परीक्षा देऊन आरटीओ व्हायचे आहे. पदवीसोबत त्याचा अभ्यास कसा करावा? शिकवणी लावणे गरजेचे आहे काय?   – पुरुषोत्तम निरगुडे

मी सध्या बीए शेवटच्या वर्षांला आहे. मला एसटीआय पद मिळवायचे आहे. त्यासाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे? कोणती पुस्तके वापरावी? – दीपक वळवी

मी सध्या बीएससीच्या दुसऱ्या वर्षांला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. कोणत्याही खासगी शिकवणीविना मला ते जमेल काय?  – प्रांजली नागरजोगे

वरील तीनही प्रश्नकर्त्यांना माझी मनापासून विनंती आहे की, त्यांनी सगळ्यात आधी संपूर्ण लक्ष पदवीकडे द्यावे. मेकॅनिकल वा बीएससीचा अभ्यास हा कठीणच असतो. त्यातून मिळणारी पदवी व त्याची टक्केवारी हा आपला पाया असतो. समजा त्यामध्ये ७० टक्के मिळाले तर तोच आकडा आयुष्यभर साथ करतो. तिथे कमी टक्के मिळाल्यास त्यावर आधारित संघर्ष आयुष्यभरासाठी कठीण होऊन जातो. बीए शेवटच्या वर्षांचा अभ्यास करताना सामान्य ज्ञान व सामान्य गणित यासाठी फक्त रोज एक तास दिला तरी सध्या पुरे. कारण परीक्षा तोंडावर आली आहे. तिघांचीही परीक्षा उत्तम पार पडल्यावर सलग आठवडाभर तरी बाजारात उपलब्ध असलेली राज्यसेवा पूर्वपरीक्षांची पुस्तके चाळण्यात घालवावा. त्यातून अभ्यासाचा आवाका लक्षात येईल. एखादे पुस्तक विकत घेऊन महिनाभर त्याचा अभ्यास करावा. तो जमला नाही तर भरपूर खासगी वर्ग असतीलच. मात्र ज्यांनी स्व-अभ्यासावर भर देऊन पदवीला सत्तर टक्के मिळवले आहेत ते स्पर्धा परीक्षेतही यश मिळवू शकतात. अशीही अनेक उदाहरणे आहेत.

मी २०१० साली टी.वाय.बी. कॉम पूर्ण केले. दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवले. गेली पाच वर्षे एका रिटेल स्टोअर्समध्ये वेअरहाऊस एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत आहे. सध्या वय ३२ आहे. मला अकौंट्स वा बँकिंगमध्ये जावेसे वाटते. माझ्यासाठी त्यातील जॉबच्या दृष्टीने काय चांगले राहील? त्यासाठी कोणता कोर्स सुचवाल?   – संदीप भुवड

आपले वय पाहता नोकरीच्या स्वरूपात बदल करणे मला फारसे उपयुक्त वाटत नाही. बँकिंगसाठी आपले वय मर्यादा पूर्ण करून पुढे गेलेले आहे. अकौंट्समध्ये आपल्यापेक्षा दहा वर्षे अनुभवी व्यक्ती कामात आहेत. म्हणून नीट विचार करावा.

वेअरहाऊस, सप्लाय चेन, लॉजिस्टिक्स या संदर्भात एक वर्षांचे डिस्टन्स स्वरूपाचे अनेक कोर्सेस जुलैमध्ये सुरू होतात. जीजीडीबीएम या नावाने ते चालतात. एमआयटी, सिंबायोसिस, इंडसर्च

किंवा कोणतीही मॅनेजमेंटमधील मान्यवर संस्था यातून तो आपण पूर्ण करावा. मात्र त्यापूर्वी कोर्सची पुस्तके पाहणे व अभ्यासक्रमाचा आवाका समजून घेणे हे निर्णयाला पूरक ठरेल. त्यातूनच आपली प्रगती होईल.

मी बीएस्सी अ‍ॅग्रीच्या तिसऱ्या वर्षांला आहे. माझी पदवी पूर्ण झाल्यावर त्या आधारावर करिअरच्या संधी कोणत्या?  – शुभम जगताप

अ‍ॅग्रिकल्चरसंदर्भात जेवढे विषय तू शिकलास त्या प्रत्येक क्षेत्रात विविध संधी व नोकऱ्या उपलब्ध आहेत. अन्यथा बी बियाणे, खते, कीटकनाशके याच्या मार्केटिंगचा रस्ता आहेच. कृषी सेवा, वन खाते, स्पर्धा परीक्षा, एमबीए अ‍ॅग्री, बँकांसाठीच्या परीक्षा एवढा सारा पट तुझ्यासाठी वाट पाहात आहे. प्रत्येक परीक्षेचे स्वरूप स्पर्धा, पुस्तके पाहून महिनाभर विचार करून निर्णय घ्यावास. सध्या पूर्ण लक्ष पदवीच्या उत्तम मार्कावर हवे. निकाल लागेपर्यंत माहिती घ्यायला किमान दोन महिने आहेत.

First Published on March 8, 2019 12:30 am

Web Title: loksatta career mantra 30