एमपीएससी मंत्र : रोहिणी शहा

Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर दोनमधील आकलन कौशल्य घटकाच्या तयारीबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये बद्धिमत्ता चाचणी घटकातील प्रश्नांचे स्वरूप व त्याबाबतचे विश्लेषण याबाबत चर्चा करण्यात येत आहे.

राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर दोनमधील उताऱ्यावरील प्रश्नांनंतर गुणांच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा विस्तार या घटकाचा आहे. एकूण ६२.५ गुणांसाठी २५ प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे असतात. बारकाईने अभ्यास व सराव केल्यास २५ ते ३५ गुण निश्चितपणे मिळवता येतात. प्रश्नपत्रिकेतील बुद्धिमत्ता चाचणी घटकाचे प्रश्न अभ्यासक्रमाच्या पुढील तीन घटकांवर आधारित असतात.

  • तार्किक विचार आणि विश्लेषणात्मक क्षमता
  • सामान्य बुद्धिमत्ता चाचणी
  • मूलभूत अंकगणितीय कौशल्य व सामग्री विश्लेषण

या तीन घटकांमधील प्रश्नांचे पुन्हा खूप वेगवेगळे प्रकार आहेत. या वैविध्यामुळे आणि काही प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा वेळ पाहता हा घटक काही अंशी आव्हानात्मक वाटतो. पण जास्तीत जास्त आणि शक्यतो सगळ्याच प्रकारचे प्रश्न सोडविण्याचा सराव करत राहिल्यास आपोआप रस वाटू लागतो. एकदा या प्रश्नांसाठीची सूत्रे, युक्त्या, प्रयुक्त्या समजल्या की त्या सरावाने लक्षात ठेवणेही सोपे होते. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पाहिले तर या भागामध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे सर्वसाधारण प्रकार पुढीलप्रमाणे आहेत:

तार्किक विचार आणि विश्लेषणात्मक क्षमता (Logical Reasoning and Analytical Ability)

विधानांवर आधारित निष्कर्षपद्धती (Syllogism) 

सर्वसाधारणपणे अवास्तव वाटणारी काही विधाने देऊन त्यांच्या आधारे काढण्यात आलेल्या निष्कर्षांची योग्यायोग्यता तपासायची असते.  तीन वा त्यापेक्षा जास्त व्यक्ती खरे वा खोटे बोलत असल्याचे गृहीतक देऊन त्यांनी सांगितलेल्या माहितीवरून निष्कर्ष काढणे.

सहसंबंध – दिलेल्या पदांमधील / आकृत्यांमधील सहसंबंध ओळखून पुढील पद शोधणे

नातेसंबंध -दिलेल्या वर्णनावरून गटातील व्यक्तींचे नातेसंबंध प्रस्थापित करून प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. मागील काही वर्षांपासून दिलेली माहिती नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी पर्याप्त आहे किंवा कसे अशा प्रकारचे प्रश्नही विचारण्यात आले आहेत.

बैठक व्यवस्था – एका सरळ रेषेत किंवा वर्तुळाकार बसलेल्या व्यक्तींचा क्रम शोधणे, एखाद्या निकषाच्या आधारे एका गटातील व्यक्ती / वस्तूंची तुलना किंवा क्रम शोधणे. दिशा, घड्याळ व कॅलेंडर

सामान्य बुद्धिमत्ता चाचणी (General mental Ability)

व्यक्तींच्या माहितीचे संयोजन – गटातील व्यक्तींचे छंद/ व्यवसाय/ शिक्षण/ वय, वजन, उंची/ खेळ/ रहिवासाची ठिकाणे यांची कॉम्बिनेशन्स देऊन ठरावीक व्यक्तीशी संबंधित माहिती विचारण्यात येते.

सांकेतिक भाषा/ संकेत, अंकाक्षर सांकेतिक भाषा – यावरील प्रश्नांचे दोन ठळक प्रकार पडतात. शब्द किंवा अक्षरांना संकेत देऊन तयार केलेली वाक्ये किंवा पदे देण्यात येतात. त्या नियमांच्या आधारे एखाद्या शब्द / अक्षराचा संकेत शोधणे हा एक प्रकार. तर गटातील अक्षरांना संकेत देऊन त्या खाली दिलेल्या नियमांच्या आधारे तयार होणाऱ्या सांकेतिक पदांवर प्रश्न विचारण्यात येतात. हा प्रकार दुय्यम सेवेमध्ये जास्त विचारण्यात येतो.

ठोकळे – ठोकळ्यांच्या पृष्ठभागांवरील चिन्हे, आकडे किंवा रंग यांबाबतचे प्रश्न

इनपुट आऊट्पुट काऊंटिंग – ठरावीक शब्द किंवा संख्या यांच्या क्रमामध्ये होणाऱ्या बदलांचे नियम समजून घेऊन त्या आधारे दुसऱ्या गटातील शब्द किंवा संख्यांच्या संयोजनावर आधारित प्रश्न.

आकृतिमालिका, आकृत्यांवर आधारित प्रश्न – आकृतीमध्ये समाविष्ट तुकडे किंवा तुकड्यांनी तयार होणारी आकृती; कागदाला घडी घालून छिद्र केल्यास तयार होणारी अंतिम आकृति, पारदर्शक कागदाच्या घडीनंतर दिसणारी आकृती, एका आकृतीवर प्रक्रिया केल्यानंतर मिळणाऱ्या आकृतीबाबतचे नियम समजून घेऊन अशा प्रक्रियांच्या संयोजनावरील प्रश्न, ठरावीक नियमांनी बनलेल्या आकृत्यांच्या मालिकेतील गहाळ किंवा चुकीची आकृती शोधणे.

ठरावीक चिन्हांनंतर आकृतीमध्ये किंवा संख्या / वर्ण यांमध्ये होणारे बदल

वर्णाक्षर मालिका सांकेतिक प्रक्रिया आकृती किंवा संख्या/अक्षर यांचा समूह यांवर वेगवेगळ्या सांकेतिक चिन्ह / खुणा आल्यावर होणारे बदल/प्रक्रिया समजून घेऊन उत्तर शोधणे.

मूलभूत अंकगणितीय कौशल्य व सामग्री विश्लेषण (Basic Numeracy & Data Interpretation)संख्यामालिका यामध्ये एखादी संख्या आधाराशी घेऊन तिच्यावर ठरावीक गणिती सूत्रे किंवा प्रक्रिया वापरून पुढील संख्या काढली जाते व त्याच प्रक्रियेने त्यापुढील संख्या. अशा प्रकारे तयार केलेल्या मालिकेतील गहाळ किंवा चुकीची संख्या शोधायची असते. किंवा दिलेल्या संख्या या ठरावीक गणिती प्रक्रियेचे मूल्य असलेल्या असतात. उदा. क्रमाने मूळ संख्यांचे वर्ग अथवा घन अधिक / उणे ठरावीक संख्या.

काळ-काम/ अंतर -वेग

मजूरांच्या कामाचे वेग व होणारे काम किंवा गाडी / ट्रेनच्या वेगावरून कापलेले अंतर यावर आधारित प्रश्न असतात. यामध्ये वेगवेगळ्या घटकांच्या वेगाची कॉम्बिनेशन्स वापरून काठिण्य पातळी वाढविण्यात येते.

गुणोत्तर आणि प्रमाण, टक्केवारी व भागीदारी (नफा -तोटा)

मिश्रणांमधील घटकांचे गुणोत्तर किंवा टक्केवारी देऊन त्यावर ठरावीक प्रक्रिया केल्यास तयार होणारे नवीन प्रमाण शोधणे, वेगवेगळ्या वेळी भागीदारी स्वीकारणारे भागीदार व त्यांच्या भांडवलांचे एकमेकांशी असलेले प्रमाण देऊन अंतिम नफा तोटा मोजणे अशा प्रकारचे प्रश्न.

त्रिकोणमिती, क्षेत्रमिती

त्रिकोणमिती व क्षेत्रमितीच्या सूत्रांच्या आधारे कमी जास्त होणारे क्षेत्रफळ किंवा त्याच्या देखभाल/ दुरुस्ती/ रंगरंगोटीचा खर्च अशा प्रकारचे उपयोजित प्रश्न. तसेच त्रिकोणमितीच्या आधारे दिशाज्ञानाचे प्रश्न.

आकृतीमधील गणिती प्रक्रिया

एकाच आकृतीमध्ये समाविष्ट संख्यांमधील संबंध समजून घेऊन गहाळ संख्या शोधणे; एका आकृतीमधील संख्यांचा संबंध समजून घेऊन दुसऱ्या आकृतिमधील संख्या शोधणे;

माहितीचे आकलन,    data interpretation

स्तंभ, रेषा यांचे आलेख किंवा पाय चार्ट, वेन आकृत्या यांमध्ये दिलेल्या आकडेवारी किंवा टक्केवारीवर आधारित प्रश्न. मागील काही वर्षांमध्ये हे प्रश्न विचारलेले दिसून येत नसले तरी अजूनही अभ्यासक्रमामध्ये या घटकाचा उल्लेख असल्याने त्याची तयारी करणे व्यवहार्य ठरते.

डेटा सफिशिएन्सी

दिलेल्या माहितीमधील कोणती माहिती एखादे विधान सिद्ध करण्यास आवश्यक किंवा पुरेशी आहे हे शोधणे; दिलेल्या संकेतांच्या आधारे माहितीवर प्रक्रिया करून उत्तर शोधणे अशा प्रकारचे प्रश्न.

अभ्यासक्रमात तीन उपघटकांचा स्वतंत्रपणे उल्लेख असला तरी बऱ्याच अंशी प्रश्नांमध्ये यांचा एकत्रित वापर केलेला असतो. तर्कक्षमतेच्या प्रश्नांमध्ये गणितीय कौशल्याचा आधार घ्यावा लागतो किंवा इनपुट आऊटपुट काउंटिंगमध्ये अंकगणित आणि तर्कक्षमता या दोन्हींचा वापर आवश्यक ठरतो. अंकाक्षर मालिका किंवा आकृत्यांवरील प्रश्नांमध्ये गणितीय कौशल्यांचा वापर करावा लागतो. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या प्रकारांची काम्बिनेशन्ससुद्धा विचारली जातात. त्यामुळे या मूलभूत प्रकारांचा सराव झाला की गुंतागुंतीचे प्रश्न सोडविण्याचाही आत्मविश्वास येतो.