21 September 2020

News Flash

पर्यावरणातील उदंड संधी

अनेक क्षेत्रांमध्ये पर्यावरणसंबंधातील स्वतंत्र शाखा निर्माण झाल्या आहेत. या कार्यशाखांचा आणि त्यातील करिअर संधींचा परिचय करून देणारा लेख-

| December 1, 2014 01:01 am

अनेक क्षेत्रांमध्ये पर्यावरणसंबंधातील स्वतंत्र शाखा निर्माण झाल्या आहेत. या कार्यशाखांचा आणि त्यातील करिअर संधींचा परिचय करून देणारा लेख-
अलीकडे अनेक क्षेत्रांमध्ये पर्यावरणाशी संबंधित कामाचा स्वतंत्र विभाग निर्माण होऊ लागला आहे.  आजही करिअरच्या दृष्टीने पर्यावरण या क्षेत्राचा प्राधान्याने विचार करणाऱ्यांची संख्या कमी जरी असली तरीही प्रत्येक क्षेत्रातील पर्यावरणाशी संबंधित अशा या नव्या करिअर संधींमुळे या क्षेत्रांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण गेल्या चार-पाच वर्षांमध्ये सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.

कायदा
गेल्या २० वर्षांत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने कायदा क्षेत्रात मोठे बदल घडून आले. आज आपल्या देशात पर्यावरण कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी
‘ग्रीन ट्रिब्युनल’ स्थापन करण्यात आले आहे. आज नागरिकांना पर्यावरणविषयक हक्कांचे भान आले आहे. त्यामुळे पर्यावरणविषयक तंटे आणि दाव्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि त्यामुळे अर्थातच पर्यावरण विषयावर काम करणाऱ्या वकिलांना मोठय़ा संधी उपलब्ध आहेत. सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील पर्यावरणविषयक तंटे तसेच पर्यावरणाशी संबंधित सर्वसामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायांविरोधात लढण्यासाठी आज पर्यावरण विषयावर काम करणाऱ्या वकिलांची गरज आहे. देशात विविध ठिकाणी विकास प्रकल्पांमध्ये होणारी पर्यावरणाची हानी तसेच कायद्यांचे उल्लंघन याला वेसण घालण्यासाठी स्थानिक नागरिकांना वेळोवेळी पर्यावरण कायद्याची शास्त्रशुद्ध माहिती असलेल्या वकिलांची गरज भासते. नवी दिल्लीतील लीगल इनिशिएटिव्ह फॉर फॉरेस्ट अॅण्ड एन्व्हायर्नमेंट (छकाए) ही संस्था म्हणजे विकास प्रकल्पांची झळ लागलेल्या पीडित नागरिकांना कायदाविषयक सल्ला पुरवणारे व्यासपीठ आहे. अशा प्रकरणांमध्ये काम करताना तक्रारींची शहानिशा करणे, दाव्यांची सत्यासत्यता पडताळणे त्याचप्रमाणे विकास प्रकल्पांचे पर्यावरणावर होणारे अनिष्ट परिणाम तपासणे यासाठी सखोल संशोधनाची आवश्यकता असते. त्यासाठी भरपूर वेळ, सविस्तर वाचन, अचूक तांत्रिक माहिती संपादन करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची नितांत गरज असते. मात्र, हे प्रयत्न सफल झाल्यास त्यातून हजारो, लाखो व्यक्तींच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.. त्यातून मिळणारे समाधान अनमोल असते.
या पेशात प्रवेश करण्यासाठी कायदा क्षेत्रातील पदवी संपादन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जोडीला पर्यावरणविषयक तांत्रिक शिक्षण असल्यास उत्तम.
पर्यावरण विषयावर काम करणाऱ्या वकिलांना कायदा कंपन्या, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट्स तसेच सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या विविध सरकारी कार्यालयांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. त्याचप्रमाणे अनेक विधी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणूनही ते पदभार सांभाळू शकतात.

आर्किटेक्चर
आपल्या देशात ‘ग्रीन बिल्डिंग’ ही चळवळ साधारणपणे २००० साली सुरू झाली आणि गेल्या काही वर्षांत या क्षेत्राने लक्षणीय प्रगती केल्याचे सुस्पष्ट आहे. आज भारतातील ‘ग्रीन इंडस्ट्री’ने २ अब्ज चौरस फूट इतक्या जागेवर नोंदणीकृत प्रकल्प उभारले आहेत. जगभरात ‘लीडरशिप इन एनर्जी अॅण्ड एन्व्हायर्नमेंटल डिझाइन’ (LEED)चे प्रमाणपत्र संपादन केलेल्या इमारतींमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो. या दोन्ही गोष्टींमधून वास्तुशास्त्रामध्ये पर्यावरणाचे राखले जाणारे भान आणि त्या अनुषंगाने या क्षेत्रात निर्माण झालेल्या मोठय़ा संधी या गोष्टी स्पष्ट होतात.
या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आर्किटेक्चर विद्याशाखेच्या पदवीसोबत नैसर्गिक संसाधन आणि पर्यावरणविषयक पदव्युत्तर पदवी प्राप्त असणे श्रेयस्कर. भारतात ‘ग्रीन कन्सल्टन्सी’चा व्यवसाय करण्यासाठी ‘लीड (LEED) अॅक्रिडिटेशन’ प्राप्त असणे अनिवार्य असते.
विविध पर्यावरणविषयक कन्सल्टन्सीजमध्ये ‘ग्रीन’ मानांकन प्राप्त केलेल्या संस्थांमध्ये तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ‘ग्रीन आर्किटेक्ट्स’ काम करू शकतात. त्याचप्रमाणे विविध सरकारी संस्थांमध्ये तसेच शिक्षण संस्थांमध्येही ‘ग्रीन आर्किटेक्ट्स’ना कामाच्या संधी उपलब्ध असतात.

कचरा व्यवस्थापन
आज कचरा हा पैसे मिळवण्याचे साधन आहे, असे मानले जाते. दर दिवशी लक्षावधी टन कचरा भारतामध्ये तयार होतो. या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे ही जशी पर्यावरणीय गरज आहे, त्याचप्रमाणे हे एक उत्तम करिअरही आहे, हे ध्यानात घ्यायला हवे. कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात काम करणारा व्यावसायिक वेगवेगळ्या भूमिका निभावू शकतो. कचऱ्याचे सॅम्पलिंग, देखरेख, कामाची रचना, व्यवस्था, सामग्रीची जमवाजमव अशा वेगवेगळ्या पातळींवरील विश्लेषणात्मक काम करणारी काही मंडळी असतात. अर्हतेनुसार वेगवेगळी कामे करणारे व्यावसायिक या क्षेत्रामध्ये कार्यरत असतात. कचरा व्यवस्थापनाच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग क्षेत्रातही कामाच्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील कामाचे स्वरूप बहुआयामी असून आंतरशाखीय स्वरूपाचे आहे. या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांना विविध प्रक्रिया समजून, शिकून घेण्याची इच्छा असावी लागते.
या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करणे अपेक्षित आहे. त्यासोबत पर्यावरण व्यवस्थापनासंदर्भातील एखादी पदव्युत्तर पदवी गाठीशी असणे उत्तम. काही विद्यापीठांमध्ये वैशिष्टय़पूर्ण असे कचरा व्यवस्थापनाचे पदविका-पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
या विषयासंबंधित प्रकल्प योजना बनविणाऱ्या कंपन्या, पालिकांचे कचरा व्यवस्थापन विभाग, या विषयावर काम करणाऱ्या सरकारी, स्वयंसेवी संस्थांमध्ये कामाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. विद्यापीठांमध्ये संबंधित विषय शिकवण्याची संधीही मिळू शकते.  

पत्रकारिता
आपल्या देशात पर्यावरण ऱ्हासाच्या भारंभार घटना आजही आढळून येतात. त्यामुळे हे गैरप्रकार उघडकीला आणण्यासाठी पत्रकारिता हे उत्तम माध्यम आहे. आज गांभीर्यपूर्वक आणि संशोधनात्मक पद्धतीने केल्या जाणाऱ्या पर्यावरणीय पत्रकारितेची आवश्यकता आहे आणि यात उदंड संधीही आहेत. अनेक आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये, मासिकांमध्ये, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरही पर्यावरणीय बातम्यांना विशेष महत्त्व दिलेलं आपल्याला आढळून येतं. अशा पर्यावरणीय बातम्यांवर काम करणाऱ्या पत्रकारांमध्ये निरीक्षणक्षमता, संशोधनवृत्ती, सादरीकरणाची क्लृप्ती, अचूक शास्त्रीय संकल्पना, दूरदृष्टी असणे आवश्यक आहे. अत्यंत गुंतागुंतीचा विषय अत्यंत सोप्या भाषेत वाचकांसमोर पेश करण्यासाठी भाषेवर उत्तम पकड असणेही आवश्यक आहे. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाविषयी आस्था असणे आणि भ्रष्ट कारभाराला चव्हाटय़ावर आणण्याचे धाडसही अंगी असणे आवश्यक आहे.
या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी मास कम्युनिकेशनमधील डिग्रीसोबत पर्यावरणविषयक तंत्रशिक्षण असणे जमेची बाब ठरते.
पर्यावरणीय पत्रकारांना विविध वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच ऑनलाइन मीडियामध्ये कामाच्या संधी उपलब्ध असतात. पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्या देशी-विदेशी स्वयंसेवी संस्थांच्या प्रकाशन संस्थांसाठीची कामाची संधी मिळू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 1:01 am

Web Title: opportunities in environment
Next Stories
1 कॉम्बॅट इंजिनीअरिंग
2 एम.फिल्. आणि पीएच.डीसाठी अधिछात्रवृत्ती
3 उत्तर-मध्य रेल्वेत खेळाडूंसाठी ४९ जागा
Just Now!
X