पार्टीचे आयोजन करताना कामाची यादी वाढत जाते आणि तेव्हा निकड भासते ती पार्टी प्लानरची! सणासुदीच्या दिवसांत पाटर्य़ाची वाढणं तसं साहजिकच. त्यानिमित्त या अनोख्या करिअरचा परिचय-
आपल्या आयुष्यात एखादी चांगली, आनंददायी अशी घटना घडली की, त्या यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी जवळच्या किंवा ओळखीच्या लोकांकडून पार्टीची मागणी होते. अर्थात असे प्रसंग वेळोवेळी प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात नि मग ते सेलिब्रेशन सगळ्यांच्याच आठवणीत राहील, असं व्हावं, असं आपल्यालाही वाटतं. अशा वेळी आपल्याला मोठा आधार वाटतो तो कुटुंबातल्या अशा एखाद्या व्यक्तीचा, जी अशा समारंभाचे वा पार्टीचे नियोजन करण्यात एकदम वाकबगार असते. पार्टीला येणाऱ्या व्यक्तींना या पार्टीमधून नेमके काय अपेक्षित आहे आणि या साऱ्या समारंभाचे व्यवस्थापन कसे व्हायला हवे, याची नेमकी जाण या व्यक्तीला असते. या व्यक्तीवर सर्व जबाबदारी सोपवून आपण अगदी निर्धास्त होतो. अर्थात ही झाली व्यक्तिगत आणि घरगुती सेलिब्रेशनची गोष्ट, पण हाच प्रसंग मोठय़ा वर्तुळात, मोठय़ा स्तरावर करायचा असेल तर त्याचे व्यवस्थापन कोणा एखाद्या व्यक्तीवर सोपवणे आणि त्या व्यक्तीला एवढे मोठे ओझे पेलता येणे अशक्यप्राय असते. अशावेळी भिस्त असते ती पार्टी प्लानर वा पार्टी संयोजकांवर. ही मंडळी पार्टीचे व्यावसायिकदृष्टय़ा नियोजन करतात. करिअरचा एक उत्तम पर्याय म्हणून या क्षेत्राला अलीकडे बरकत येत आहे. दिवाळीपासून सुरू होणाऱ्या पार्टीच्या सीझनच्या निमित्ताने पार्टी प्लानर या करिअरचा धांडोळा घेणं औचित्यपूर्ण राहील.
क्लायंट्सची गरज आणि त्याचे बजेट ध्यानात घेऊन त्या त्या प्रसंगानुरूप पार्टीचे आयोजन करण्याचे काम ही संयोजक मंडळी करीत असतात. यामध्ये कॉर्पोरेट रिसेप्शन, लग्न, बर्थ डे पार्टी, वर्षपूर्ती समारंभासारख्या विविध प्रसंगांचा यात समावेश होत असतो. अशा वेळी एखादी संकल्पना (थीम) लक्षात घेऊन पार्टीचे आयोजन केले जाते. मग त्यानुसार ड्रेसकोड, मेनू या स्वरूपाच्या विविध गोष्टी निश्चित केल्या जातात.
पार्टी संयोजक, जे पार्टी कन्सल्टंट या नावानेदेखील ओळखले जातात, त्यांच्यावर विविध स्वरूपाच्या जबाबदारी पार पाडण्याचे आव्हानात्मक काम असते. प्रसंगानुसार त्यांना ग्राहकांसोबत दोन-तीन मीटिंग्ज घ्याव्या लागतात. पहिल्या वेळी ती पार्टी आयोजन करण्यामागचे नेमके निमित्त, त्यासाठी खर्च करण्याची असलेली ग्राहकाची तयारी याचा विचार लक्षात घेतला जातो. मग या पार्टीविषयी ग्राहकाच्या काही खास कल्पना आहेत का, ते जाणून घेतले जाते. त्यानुसार वेगवेगळे पर्याय पार्टी संयोजक ग्राहकासमोर मांडतो. या सर्व गोष्टींचा विचार झाल्यानंतर पुढच्या भेटीत पार्टीची जागा, त्या जागेचा कसा वापर करायचा म्हणजे डान्स फ्लोअर, जेवण, बसण्यासाठी विशेष स्वरूपाची व्यवस्था या सर्व गोष्टींचा त्यात विचार केला जातो. कारण पार्टीला येणारी मंडळी आपापल्या वेळेनुसार त्या त्या गोष्टींची मजा लुटत असतात. म्हणजे काहींना मनसोक्त नाचायला आवडते तर काहींना वेळेवर जेवण घ्यायची सवय असते. अशा वेळी त्या त्या गोष्टींसाठी आवश्यक ती स्पेस दिल्यास सर्वानाच आपल्या इच्छेनुसार पार्टीचा आनंद लुटता येतो व प्रामुख्याने गरसोय होणे टळले जाते. त्यामुळेच वरवर पाहता या गोष्टी प्राथमिक स्वरूपाच्या वाटत असल्या तरीही त्या प्रथम नेमकेपणाने ठरवणे गरजेचे असते.  

पार्टीसंदर्भातल्या सर्व गोष्टी ठरवल्या म्हणजे पार्टी संयोजकाची जबाबदारी संपली, इतके त्याचे काम सहज, सोपे नसते. तर प्रत्यक्ष पार्टी चालू असताना सर्व गोष्टी आखल्यानुसार होत आहेत की नाही, कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना निमंत्रितांना करावा लागत नाही ना, इथपासून पार्टी संपल्यावर त्या जागेची योग्य
प्रकारे स्वच्छता होईपर्यंत त्या ठिकाणच्या कामावर देखरेख करण्याची जबाबदारी त्याची असते. मग यामध्ये पार्टीच्या आमंत्रणपत्रिकेची रचना, कार पाìकगची व्यवस्था अशा अनेक लहान-सहान, परंतु महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश या जबाबदारीत
होत असतो.  
पार्टी संयोजकांसाठी कोणत्याही प्रकारच्या खास शैक्षणिक पाश्र्वभूमीची गरज नसते, परंतु मोठमोठय़ा हॉटेल्समध्ये किंवा कॅसिनोमध्ये बारावी किंवा पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची निवड पार्टी संयोजक म्हणून केली जाते. जे कला, डिझाइन किंवा मनोरंजन क्षेत्रांत विविध आघाडय़ांवर काम करतात, त्यांचा बऱ्याचदा पार्टी संयोजक होण्याकडे अधिक कल असतो.  
पार्टी संयोजकाकडे उत्तम कल्पनाशक्ती, व्यवसायाचा नेमका अंदाज आणि पार्टीसाठी लागणाऱ्या लहानसहान गोष्टींपासून ते मोठय़ा गोष्टींपर्यंत सर्व गोष्टींचा सूक्ष्मतेने व विस्ताराने विचार करण्याची सवय असायला हवी. त्याचबरोबर निरनिराळ्या प्रकारच्या लोकांबरोबर त्याला वावरता यायला हवे. त्यांच्याबरोबर उत्तम संवाद साधता यायला हवा. या जोडीने सेट डिझाइन, त्याची आखणी, इंटेरिअर डिझाइन, योग्य पेहरावाचे ज्ञान, फ्लोअर व्यवस्था आणि मनोरंजनांचे उत्तम व विविध पर्याय आदींची नेमकी जाण त्यास असावी.
पार्टी संयोजक म्हणून काम करण्यात तुम्हाला विशेष रस वाटत असेल तर मोठमोठाली हॉटेल्स, कॅसिनो किंवा पार्टी नियोजन करण्याचे काम हाती घेणाऱ्या कंपन्यांमध्ये तुम्ही उमेदवारी करून तुमच्या कामाला सुरुवात करू शकता. जर तुमच्याजवळ गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने पुरेसे भांडवल असेल तर तुम्ही स्वतंत्ररीत्या पार्टी संयोजक म्हणून स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकता. अर्थात या भांडवलाच्या जोडीने उत्तम संपर्क आणि अथक मेहनत घ्यावयाची तुमची तयारीदेखील जोडीला असली पाहिजे.  
तसे पाहिले तर जसा काळ बदलतोय, तशा करिअरच्या नव्या वाटा उदयाला येत आहेत. पार्टी संयोजकाच्या बाबतीत विचार करावयाचा झाला तर असे म्हणता येईल की, साधारणपणे १९९० नंतर या व्यवसायाची खरी गरज निर्माण होऊ लागली. तोपर्यत पार्टी ही प्रत्येकाची वैयक्तिक व खासगी स्वरूपाची बाब होती. पण व्यवसायाचे विस्तारीकरण किंवा उत्तम नातेसबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने व्यावसायिकदृष्टय़ा पार्टी आयोजित करण्याला अधिकाधिक महत्त्व प्राप्त होऊ लागले. आता तर हा ट्रेण्ड इतका रुळला आहे की पुढील एक-दोन वर्षांत करिअरचा एक उत्तम पर्याय म्हणून या व्यवसायाचे स्थान अधिक भक्कम होईल. अलीकडे तर आíथक परिस्थितीत चढ-उतार होत असतानादेखील सेलिब्रेशन वा पार्टी आयोजित करण्याचे प्रकार काही कमी होत नाहीत. फार फार तर खर्चिक स्वरूपापेक्षा नेमक्या खर्चात करण्यावर भर दिला जातो.  
पार्टी संयोजकाचे काम हे एकाच वेळी अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे असते. त्यामुळे सगळी कामे त्याला शांत राहून दक्षपणाने पार पाडावी लागतात. मग एकाच वेळी त्याला पार्टीसाठी जागा सजवावी लागते तर त्याच वेळी पुरवठादारांना फोन करून मालाची व्यवस्था करावी लागत असते. शिवाय ही सर्व कामे एका ठराविक वेळेच्या मुदतीत पार पाडावी लागतात. कारण या क्षेत्रात डेडलाइन पाळण्याला प्रचंड महत्त्व आहे. अचानकपणे उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ही सर्व कामे वेळेत पार पाडणे म्हणजे एक आव्हानच असते, हे या व्यवसायात शिरणाऱ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावे.
या व्यवसायात सुसंवादाला अधिक महत्त्व असते. कारण पार्टी संयोजक या नात्याने तुम्हांला अनेक स्वरूपाच्या व्यावसायिकांना हाताळावे लागते. यामध्ये बिल्डरपासून ते रस्त्यावर बसणाऱ्या फुलवाल्यापर्यंतच्या अनेक व्यावसायिकांचा समावेश असतो.  
या व्यवसायात कामाला वेळेचे बंधन नाही. त्यामुळे घडय़ाळाच्या काटय़ाकडे न बघता काम करण्याची तयारी असावी. शिवाय अशा प्रकारचे काम करताना ताण हा जाणवत असतो.
हे क्षेत्र सध्यातरी विकसनशील अवस्थेत असल्याने अजून म्हणावी तशी टोकाची स्पर्धा या क्षेत्रात अद्याप दिसत नाही.
आपली पार्टी नेहमीच शानदार आणि लोकांच्या स्मरणात राहावी, असे प्रत्येकालाच वाटत असते. पण सगळ्याच ग्राहकांना नेमकी आपल्या पार्टीची कल्पना कशी असावी, त्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावा हे नीटपणे स्पष्ट करता येत नाही. अशा वेळी पार्टीसंबंधीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून जेव्हा पार्टी संयोजक पार्टीचे फक्कड आयोजन करतो आणि ‘मला हेच अपेक्षित होते,’ असे जेव्हा ग्राहकाला वाटते, तेव्हा पार्टी संयोजकाला त्याच्या कामाचे समाधान मिळते आणि त्याच्या अथक श्रमाची पावतीही. यातूनच जोमाने काम करण्याची प्रेरणा त्याला मिळत असते.
पार्टी संयोजकाचे काम हे आदरातिथ्य सेवेशी निगडित असल्याने अनेक मंडळींचा आदरातिथ्य क्षेत्रातील किंवा तत्सम स्वरूपाच्या क्षेत्रातील पदवी घेण्याकडे अधिक कल असतो. तर काहींचा पब्लिक रिलेशन, मार्केटिंग, कम्युनिकेशन आणि बिझनेसमधील पदवी घेण्याकडे कल असतो. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या उमेदवारांची निवड करताना अनेक कंपन्या आदरातिथ्य सेवा क्षेत्राची शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देतात आणि ज्या उमेदवारांची शैक्षणिक पाश्र्वभूमी इतर
क्षेत्राशी संबंधित आहे, अशांनी एखाद्या छोटय़ा-मोठय़ा संस्थेत इंटर्नशिप करून पार्टी संयोजकाच्या कामाचा अनुभव घ्यावा आणि मगच या क्षेत्राकडे वळावे. ही शैक्षणिक पाश्र्वभूमी नसल्यामुळे आपण या क्षेत्रात मागे पडत आहोत की काय,

अशी भीती त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात असते. तेव्हा अशा मंडळींनी या स्वरूपाचे व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या खासगी संस्थांचे अथवा विद्यापीठाचे छोटय़ा-मोठय़ा स्वरूपाचे कोर्स पूर्ण करावेत.
पार्टी संयोजक म्हणून जसजसा तुमचा कामाचा अनुभव वाढत जाईल, तसतसा तुमच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल आणि ओळखीही होतील. या क्षेत्रात तुम्ही कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून कामाला सुरुवात झाली की व्यवस्थापकीय संचालकापर्यंत तुम्हाला मजल गाठता येते. तर जे स्वत:चा व्यवसाय म्हणून सुरुवात करतात ते कन्सल्टंट म्हणून किंवा एखाद्या संस्थेसाठी एक्झिक्युटिव्ह संचालक म्हणून कार्यभार सांभाळतात.
थोडक्यात काय तर या क्षेत्रात करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. पण त्याला गरज आहे ती तुमच्या कल्पनाशक्तीची आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी अथक परिश्रमाची.

पार्टी संयोजकाचा
दिनक्रम असा असतो..
पार्टी संयोजकाच्या कामकाजाचा दिवस असतो तरी कसा यावर टाकलेली एक नजर –
* क्लायंट्सची नेमकी गरज आणि अपेक्षित कल्पना काय आहेत हे जाणून घेण्याच्या दृष्टीने त्याच्याबरोबर चर्चा करणे.
* पार्टीसाठी ज्या ज्या निवडक जागांना अग्रक्रम दिला आहे त्या त्या सर्व जागांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणे.
* पार्टीसाठी आवश्यक असणाऱ्या इतर व्यावसायिकांच्या जसे फ्लोरिस्ट, कॅटर्स, मनोरंजन सेवा पुरविणारे व्यावसायिक आदींच्या भेटी घेणे.
* प्रत्यक्ष साइटवर काम करणाऱ्या मंडळींकडून त्या त्या कामाचा आढावा घेऊन काम कोणत्या टप्प्यात पोहोचले आहे, याची माहिती घेणे.
* पार्टीला येणाऱ्या निमंत्रितांची यादी तयार करणे.
* पार्टीला सुरुवात होण्यापूर्वी आणि सुरुवात झाल्यानंतर कोणकोणत्या अडचणी निर्माण होऊ शकतात, याचा एक संभाव्य अंदाज घेऊन त्यादृष्टीने आवश्यक ती सुसज्जता तयार ठेवणे.
* पार्टीसाठी आणल्या गेलेल्या मालाची नीट पाहणी करून त्यानुसार निश्चित केलेली बिलांची रक्कम योग्य आहे की नाही, याची खातरजमा करून त्यांची बिले वेळेत चुकती करणे.