13 December 2019

News Flash

चिनी इतिहासाचा साक्षीदार.. पेकिंग विद्यापीठ, चीन

पेकिंग विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हे चार किंवा सहा वर्षांच्या कालावधीचे आहेत.

|| प्रथमेश आडविलकर

विद्यापीठाची ओळख – चीनमधील राष्ट्रीय स्तरावरील पहिले आणि सर्वात जुने असलेले पेकिंग विद्यापीठ हे २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले तिसाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. किंग साम्राज्याच्या राजवटीत या विद्यापीठाची स्थापना १८९८ साली ‘इम्पेरियल युनिव्हर्सिटी ऑफ पेकिंग’ या नावाने करण्यात आली. १९१२ साली विद्यापीठास सध्याचे नाव देण्यात आले. चीनमधील ऐतिहासिक चळवळींमध्ये या विद्यापीठाने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. पेकिंग विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ असून चीनमधील प्रतिष्ठित ‘सी-9 लीग’ या चिनी विद्यापीठांच्या संघटनेचा एक महत्त्वपूर्ण सदस्य आहे. राजधानी बीजिंगच्या पश्चिमेकडे असलेल्या हैदियान जिल्ह्य़ात पेकिंग विद्यापीठाचा ‘यान युआन’ हा मुख्य कॅम्पस वसलेला आहे. विद्यापीठामध्ये सध्या सात हजारपेक्षाही अधिक पूर्णवेळ प्राध्यापक आहेत, तर चाळीस हजारांहूनही जास्त विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेला आहे.

अभ्यासक्रम – पेकिंग विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हे चार किंवा सहा वर्षांच्या कालावधीचे आहेत. विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन किंवा तीन वर्षांच्या कालावधीचे आहेत, तर येथील पीएचडी अभ्यासक्रम हे चार ते सहा वर्षांच्या कालावधीचे आहेत. याशिवाय विद्यापीठाने नॉन-डिग्री कोस्रेसचीसुद्धा रचना केलेली आहे. यामध्ये व्हिजिटिंग, रिसर्च स्कॉलर, प्रि-युनिव्हर्सिटी, को-ऑपरेटिव्ह आणि प्रत्येक विभागातील वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा समावेश होतो. पेकिंग विद्यापीठामधील पदवीपासून ते पीएचडी स्तरावरील सर्व शैक्षणिक अभ्यासक्रम सहा विभागांकडून चालवले जातात. विद्यापीठात ‘सायन्सेस, इन्फॉम्रेशन अ‍ॅण्ड इंजिनीअिरग, ह्य़ुमॅनिटीज, सोशल सायन्सेस, इकोनॉमिक्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, हेल्थ सायन्स सेंटर’ हे प्रमुख सहा विभाग आहेत. या सहा प्रमुख विभागांतर्गत एकूण सत्तर इतर विभाग आणि महाविद्यालये कार्यरत आहेत. जवळपास १२९ पदवी अभ्यासक्रम, २८० पदवी अभ्यासक्रम आणि २५४ डॉक्टरल अभ्यासक्रम या सर्व महाविद्यालये आणि विभागांकडून शिस्तबद्ध रीतीने राबवले जातात. यांपकी बहुतांश अभ्यासक्रम इंग्रजी भाषेमध्ये चालवले जातात. या सर्व विभागांकडून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, संगीत, इंग्रजी, मानसशास्त्र, आरोग्य संशोधन,  जैव-अभियांत्रिकी, पर्यावरण शास्त्र, भूभौतिकी, भौगोलिक शास्त्र,  धातू शास्त्र आणि अभियांत्रिकी, विमान तंत्रज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञान,  बायोइंजिनीअिरग, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य आणि पर्यावरण अभियांत्रिकी,  व्यवस्थापन शास्त्र,  विद्युत अभियांत्रिकी, संगणक शास्त्र,  यंत्र अभियांत्रिकी, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, साहित्य, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र  इत्यादी विषय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध करून दिले जातात.

सुविधा – पेकिंग विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी निवासाची सोय केली गेली आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये राहणे अपेक्षित आहे. विद्यापीठाकडून विविध स्वरूपात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये कपात यांसारख्या पर्यायांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त विद्यापीठाकडून हेल्थ इन्शुरन्स, हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर, करिअर सपोर्ट सेंटर, जिम, लायब्ररी, कम्युनिटीज, क्लब्स, म्युझियम, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा मदत केंद्र यांसारख्या इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या सर्व गोष्टींबद्दल विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे.

वैशिष्टय़

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात चिनी सरकारने एकविसाव्या शतकात जागतिक दर्जाचे विद्यापीठ तयार करण्याच्या हेतूने उच्चशिक्षणाचा प्रचार करण्यासाठी पेकिंग विद्यापीठाला शासकीय विषय पत्रिकेच्या शीर्षस्थानी ठेवले. म्हणूनच सन २००० मध्ये बीजिंग मेडिकल युनिव्हर्सिटी पेकिंग विद्यापीठामध्ये विलीन झाल्यानंतर पेकिंग विद्यापीठाचे शैक्षणिक संरचना आणखी मजबूत झालेली आहे. विद्यापीठातील अध्यापकवर्ग उत्कृष्ट असून संशोधन क्षेत्रात त्यांनी स्वत:ला जागतिक स्तरावर सिद्ध केलेले आहे. पेकिंग विद्यापीठाच्या दाव्यानुसार विद्यापीठाला या गोष्टीचा नेहमीच अभिमान राहिलेला आहे. येथील एकूण प्राध्यापकांपकी ४८ प्राध्यापक ‘चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या प्रथितयश संस्थेचे सदस्य आहेत. याशिवाय नऊ प्राध्यापक ‘चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीयिरग’ तर इतर २१ प्राध्यापक ‘थर्ड वर्ल्ड अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या नामवंत संस्थांचे सदस्य आहेत.

संकेतस्थळ

http://english.pku.edu.cn/index.shtml

itsprathamesh@gmail.com

First Published on July 23, 2019 2:45 am

Web Title: peking university mpg 94
Just Now!
X