स्वाती केतकर- पंडित

श्रीरामपूरच्या डी. डी. काचोळे माध्यमिक विद्यालयात चित्रकार होण्याची, कलाकार होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक विद्यार्थी भेटतात. डॉक्टर-इंजिनीअरच्या पलीकडे करिअर माहिती नसलेल्या या भागात विद्यार्थ्यांमधली कलेची ही चेतना जागवली आहे, त्यांचे कलाशिक्षक राहुल पगारे यांनी. कला-कार्यानुभव हे विषय बहुतेक शाळांत दुर्लक्षितच असतात. फार फार तर नववीपर्यंत त्याला परवानगी मिळते पण दहावीत गेल्यावर मात्र कलेची दारे अनेकांसाठी कायमची बंद होतात. राहुल पगारे सरांच्या वर्गात मात्र असे होत नाही. कारण विद्यार्थ्यांमधील कलेला हुडकून, प्रोत्साहन देऊन ती कला बहरण्यासाठी ते मनापासून प्रयत्न करतात.

लहानपणापासून उत्तम चित्र काढणाऱ्या राहुलना व्हायचे होते चित्रकारच, पण वडील वारल्याने घरची जबाबदारी अंगावर आली आणि आर्ट टीचरचा डिप्लोमा करून २००८साली ते  बनले कलाशिक्षक.

सध्या श्रीरामपूर इथे कार्यरत असलेल्या राहुलची सुरुवात झाली ती, नाशिक जिल्ह्य़ातल्या सिन्नर तालुक्यातल्या ठाणगावमधून. रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय, ठाणगावपासून. राहुल यांनी कलाशिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली. तिथल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलेलाच प्रोत्साहन देत राहुल यांनी त्यांना अलगद शिक्षणाच्या रिंगणात आणले. राहुलच्या लक्षात आले की, कलाशिक्षक म्हणून आपली नेमणूक झाली असली तरी केवळ चित्रकला शिकवून भागणार नाही.  इतरही कला यायला आणि शिकवायला हव्यात. पण चित्रकला सोडल्यास इतर कुठल्याच कलेचे त्यांचे अधिकृत प्रशिक्षण नव्हते. मग स्वत:च स्वत:चे गुरू बनत राहुलनी आधी आपल्या कलाशिक्षणाची सुरुवात केली. त्यांच्या मदतीला आली काही पुस्तके आणि इंटरनेट. शाळेतल्या ढोलकी, पेटीवर सराव करत करत त्यांना संगीताचे सूर गवसले.

या शाळेत प्रसाद नावाचा अतिशय भोळसट मुलगा होता. वर्गात कध्धी बोलायचा नाही. मुले तर चिडवायचीही त्याला पण हा आपला गप्प. मात्र संगीतकक्षातली गाण्याची प्रॅक्टिस मात्र तो कान आणि मन लावून ऐकायचा. हे पाहून राहुल यांनी त्यालाही गाणे गायला बोलावले. सुरुवातीला लाजून पळणारा प्रसाद हळूहळू गीतमंचाचा महत्त्वाचा भाग बनला. प्रसादला सुरांची उपजतच जाण होती. पेटी त्याला फार आवडायची. घरी त्याने एकदा पेटीसाठी हट्ट केला. तेव्हा त्याचे वडील शाळेत आले नि म्हणाले, ‘‘राहुलसर प्रसादला पेटी हवीय  शे-दीडशे रुपयांत येईल का हो जुनी पेटी?’’ एकूणच त्यांना पेटी घेणे शक्य नाही, हे राहुल यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसादला सांगितले, ‘‘तू जर चांगली पेटी वाजवायला शिकलास तर तुला मी पेटी देईन.’’ हे आव्हान प्रसादने भलतेच मनावर घेतले. रोज शाळेत येऊन तो पेटीवर प्रॅक्टिस करू लागला. अनेक नवी गाणी त्याने आत्मसात केली. इकडे राहुल थोडी स्वस्तातली पेटी शोधत होते पण ती काही मिळाली नाही तेव्हा प्रसादची पेटीसाठीची ओढ पाहून राहुलनी चक्क स्वत:ची नवीकोरी पेटी त्याला दिली. या भेटीचे प्रसादने सोने केले. बुजरा, अबोल, भोळसट प्रसाद आज उत्तम कीर्तन करतो. तो डॉक्टर-इंजिनीअर तर होऊ शकला नाही पण पेटी आणि सुरांच्या साथीने तो आज जनसमुदाय खिळवून ठेवतो. असाच आणखी एक विद्यार्थी प्रतीक. प्रतिकला पाचवीपासून तबला हवा होता. पण तो घेणे शक्य नव्हते. तेव्हा दहावीला निरोपसमारंभाच्या दिवशी राहुलनी स्वत: त्याला तबला घेऊन दिला. प्रतीकही संगीताच्या क्षेत्रात आता रमला आहे.

या सोबत ठाणगावच्या विद्यार्थ्यांकडून राहुलनी अनेक पथनाटय़े बसवून घेतली. ठाणगाव हे बाजारपेठेचे गाव. बाजारात दारूचे दुष्परिणाम यावर पथनाटय़ करताना एका मद्यपीने एका मुलाची कॉलर पकडली. पण ना तो मुलगा घाबरला ना सोबत असलेले कलाकार. एकदा गावात अंधश्रद्धा पसरवणारी काही पत्रके कुणी तरी टाकून गेले. शाळेच्या विद्यार्थ्यांना ते कळल्यावर त्यांनी ती पत्रके जमवली आणि त्याची चक्क होळी केली. याचे कारण पथनाटय़ बसवताना हे विषय विद्यार्थ्यांना पुरेपूर समजले आणि पटले होते. त्यामागे होती राहुल यांची ते पटवण्याची हातोटी.

यानंतर २०१७मध्ये राहुलची बदली झाली, अहमदनगर जिल्ह्य़ातील श्रीरामपूर तालुक्यातील डी. डी. काचोळे माध्यमिक विद्यालयामध्ये. या विद्यालयामध्ये राहुलनी कलाविषयक अनेक उपक्रम घेतले आहेत. त्यातील महत्त्वाचा म्हणजे, एक तास एक कला. याअंतर्गत कलेतील विविध पैलूंची ओळख राहुल विद्यार्थ्यांना करून देतात. म्हणजे निसर्गचित्र, व्यक्तिचित्र, वस्तुचित्रण यासोबत दगड रंगवणे, टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी तयार करणे, आकाशकंदील, मोज्यापासून बाहुल्या, शर्टावरील चित्रांत रंग भरणे, कापडावर रंगकाम करणे अशा अनेक गोष्टी त्यांचे विद्यार्थी शिकत असतात. आपल्या विद्यार्थ्यांची चित्रे फक्त वर्गातल्या चित्रकलेच्या वह्य़ांपुरतीच मर्यादित राहू नयेत, यासाठी राहुल अतिशय प्रयत्नशील असतात. अब्दुल्ला हा त्यांच्या शाळेतील एक कर्णबधिर विद्यार्थी. ऐकू येत नाही म्हणून बोलता येत नाही अशी त्याची परिस्थिती. अपंगत्वामुळे शिक्षणात मागास झालेला विद्यार्थी. याला बाकी काही येत नाही, पण चित्र मस्त काढतो, असे वर्गातल्या विद्यार्थ्यांनी सांगितल्यामुळे राहुलनी एकदा त्याची वही पाहिली आणि ते स्तिमीतच झाले. मग स्वत: त्यांनी अब्दुल्लाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्याला चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याच्या भाषेत त्याच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला. त्याची चित्र त्यांनी मुंबईला पाठवली आणि चक्क नेहरू सेंटरच्या गॅलरीत अब्दुल्लाची चित्रे झळकली. आजवर अशा अनेक विद्यार्थ्यांची चित्रप्रदर्शने भरवण्यासाठी राहुलनी खूप प्रयत्न केले आहेत. या चित्रांची उत्तम किमतीसह विक्रीही झाली आहे.

माधुरी ही गतिमंद मुलगीही अशीच. तिला अभ्यासात गती नसली तरी तिची कलेतील गती पाहून राहुलनी तिला प्रोत्साहन दिले आणि आज माधुरीचे आई-वडील गावात माधुरीमुळे ओळखले जातात. तिचीही चित्रे विविध प्रदर्शनातून विकली गेली आहेत. सिऑन गायकवाड हा असाच विद्यार्थी. घरगुती अडचणींमुळे त्याची शाळा बुडायची. पण सिऑनच्या अंगात उत्तम कला होती. राहुलनी शाळेत त्याला प्रोत्साहन देऊन या कलेला जिवंत ठेवले. त्याचीही चित्रे अनेक ठिकाणी प्रदर्शनातून झळकली आहेत. आज राहुलचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या कलाक्षेत्रांत करिअर करत आहेत. जिथे डॉक्टर, इंजिनीअरिंगशिवाय विद्यार्थी-पालकांना दुसरी करिअर्स माहिती नव्हती तिथे राहुलच्या प्रोत्साहनाने आणि समजावण्यामुळे अनेक विद्यार्थी चित्रकार होण्याची स्वप्न पाहत आहेत. अभ्यास बाजूला ठेवूनही प्रसंगी आपल्या कलेसाठी वेळ देत आहेत. स्वत: चित्रकलेच्या क्षेत्रात करिअर करू न शकलेले राहुल पगारे आज मात्र अनेकांसाठी या कलामार्गावरचे मार्गदर्शक होत आहेत.