तयारी सीमॅटची!
डॉ. नचिकेत वेचलेकर
* सहयोगी अधिष्ठाता, इंडसर्च, पुणे
व्यवस्थापनातील पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणजेच एम.बी.ए. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी सीमॅट प्रवेशपरीक्षेचे अग्निदिव्य पार पाडावे लागते. या प्रवेशपरीक्षेची तयारी कशी कराल, याविषयीची लेखमाला

तज्ज्ञ व्यवस्थापकांची गरज ही प्रत्येक क्षेत्राला नेहमीच भासत असते. नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या खासगी क्षेत्रातील संस्थांना स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी, तसेच स्पर्धकांपेक्षा पुढे जाण्यासाठी चांगल्या व्यवस्थापकांची नितांत गरज असते, मग ते औद्योगिक क्षेत्र असो किंवा सेवा क्षेत्र असो. याप्रमाणे सरकारी व निमसरकारी क्षेत्रातील कंपन्यांनासुद्धा, अधिक चांगल्या प्रकारे उत्पादन करण्यासाठी व अधिक कार्यक्षम सेवा देण्यासाठी व्यवस्थापन तज्ज्ञांची आवश्यकता असते. याशिवाय सहकारी संस्था, नगरपालिका, सार्वजनिक वाहतूक संस्था, शिक्षण संस्था, रुग्णालये इ. अनेक संस्थांना चांगल्या व्यवस्थापनाची जोड दिल्यास त्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देता येतील. देशातील वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने चालल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर वाढून वेगाने प्रगती करणे शक्य होईल. चांगले व्यवस्थापक केवळ खासगी क्षेत्रातच नव्हे तर इतर क्षेत्रांतही आपले कौशल्य दाखवून देऊ शकतात. याच कारणाने आपल्या देशात तज्ज्ञ व्यवस्थापकांची मागणी दिवसेंदिवस वाढत जाणार याबद्दल कोणतेही दुमत होणार नाही. मात्र यासाठी व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या विभागांचे सखोल ज्ञान, मेहनत करण्याची तयारी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असणारे इतर गुण या गोष्टींची आवश्यकता असते.
व्यवस्थापनाच्या विविध विभागांचे सखोल ज्ञान मिळविण्याची पहिली पायरी म्हणजे व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमाची निवड करणे व त्यासाठी लागणाऱ्या प्रवेश परीक्षेची तयारी करणे. परंतु, तत्पूर्वी व्यवस्थापनाच्या कोणत्या अभ्यासक्रमास आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे, हे ठरवले पाहिजे.
आपल्या देशामध्ये व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. यामध्ये इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आय.आय.एम.) सारख्या संस्था, खासगी विद्यापीठे तसेच पुणे, मुंबईसारख्या विद्यापीठांशी संलग्न असणाऱ्या अनेक संस्था यांचा समावेश होतो. तसेच, विद्यापीठांशी संलग्न परंतु अंतर्गत स्वायत्तता असलेल्या संस्थांचाही समावेश होतो. या स्वायत्त संस्थांना अभ्यासक्रम ठरवणे तसेच त्यामध्ये वेळोवेळी बदल करणे, परीक्षा घेऊन निकाल लावणे असे अधिकार प्रदान केलेले असतात. मात्र अंतिम पदवी देण्याचा अधिकार हा संबंधित विद्यापीठाकडेच राहतो. अशा प्रकारे वेगवेगळे पर्याय असलेले अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
विद्यापीठ पातळीवर उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमापैकी सर्वात जास्त मागणी असलेला अभ्यासक्रम म्हणजे व्यवस्थापनातील पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणजेच एम.बी.ए. याच अभ्यासक्रमाला काही विद्यापीठांमध्ये एम.एम.एस. असेही म्हटले जाते. एम.बी.ए./ एम.एम.एस. हा दोन वर्षांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम असून सर्वसाधारणपणे पहिल्या वर्षी सर्व विषय अनिवार्य असतात. दुसऱ्या वर्षी विशेषीकरण (स्पेशलायझेशन) निवडायचे असते. यामध्ये विपणन (मार्केटिंग), वित्तीय व्यवस्थापन (फायनान्शियल मॅनेजमेंट), मनुष्यबळ व्यवस्थापन  (ह्य़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट), माल व उत्पादन व्यवस्थापन (मटेरिअल्स आणि प्रॉडक्शन मॅनेजमेंट), संगणक व्यवस्थापन (कॉम्प्युटर मॅनेजमेंट), आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन (इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट) आदींपैकी एका विषयाची निवड करायची असते. काही विद्यापीठांमध्ये एका वेळी दोन विशेषीकरणाची सोय असते, तसेच काही संस्थांमध्ये पहिल्या वर्षांपासूनच विशेषीकरण सुरू होते. उदा. एम.बी.ए. (ह्य़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट) किंवा एम.बी.ए. (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमांमध्ये पहिल्या दिवसापासूनच विशेषीकरणाची सुरुवात होते.
एकदा एम.बी.ए. अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचे निश्चित केल्यानंतर प्रवेश परीक्षेसंबंधी जाणून घेणे आवश्यक ठरते. याविषयी अत्यंत महत्त्वाची व लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे वर्ष २०१३-१४ पासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (ए.आय.सी.टी.ई) या तंत्रविषयक शिक्षणाच्या शिखर संस्थेने घेतलेली ‘सीमॅट’ ही परीक्षा, सर्व ए.आय.सी.टी.ई. मान्यताप्राप्त संस्थेतील एम.बी.ए. प्रवेशासाठी अनिवार्य केलेली आहे. या परीक्षेची तारीख तसेच परीक्षेचे स्वरूप जाणून घेऊन योग्य ती तयारी करणे हे एम.बी.ए.ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांस आवश्यक आहे.
सीमॅट परीक्षेविषयी, प्रत्येक प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढील माहितीची नोंद करून घेणे आवश्यक आहे.
 *   एम.बी.ए./एम.एम.एस. या अभ्यासक्रमाच्या, सर्व ए.आय.सी.टी.ई. मान्यताप्राप्त आणि वेगवेगळ्या विद्यापीठांशी संलग्न असणाऱ्या संस्थेतील प्रवेशासाठी, वर्ष २०१३-१४ पासून फक्त सीमॅट परीक्षेतील गुणच ग्राह्य़ धरण्यात येतील. यामुळे महाराष्ट्रात, तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे होणारी प्रवेश परीक्षा (एम.एच.सी.ई.टी.) येथून पुढे घेतली जाणार नाही. एम.बी.ए.चे. प्रवेश केंद्रीय पद्धतीने सीमॅटमधील गुण व गटचर्चा आणि वैयक्तिक मुलाखत यातील गुणांवर अवलंबून राहतील.
  *  सीमॅट परीक्षा वर्षांतून दोन वेळा घेण्यात येते. यापैकी पहिली परीक्षा सप्टेंबर २०१२ मध्ये झाली. दुसरी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०१३ या कालावधीमध्ये घेण्यात येईल. १३ मार्च २०१३ रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. परीक्षेची वेळ सकाळच्या सत्रामध्ये सकाळी ९.३० ते १२.३० व दुपारच्या सत्रामध्ये २.३० ते ५.३० या वेळामध्ये घेण्यात येईल.
  *  संपूर्ण देशातील एकूण ६२ शहरांमध्ये ही परीक्षा होईल. यामध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या शहरांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे शहर व वेळ मिळू शकेल. मात्र त्यासाठी वेळेत नोंदणी करणे आवश्यक राहील.
  *  या परीक्षेसाठी मान्यतापात्र विद्यापीठाचे कोणत्याही शाखेचे पदवीधर पात्र आहेत. यासाठी पदवी परीक्षेत खुल्या गटासाठी किमान ५० टक्के आणि मागासवर्गीयांसाठी किमान ४५ टक्के गुणांची अट आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेस बसणारे विद्यार्थीसुद्धा सीमॅट परीक्षेला बसण्यास पात्र आहेत.
  *  सीमॅट परीक्षा संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने आहे. प्रत्येकाला एक कॉम्प्युटर टर्मिनल दिले जाईल. परीक्षेसाठी कॅलक्युलेटर वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच उत्तर काढण्यासाठी काही आकडेमोड करायची असल्यास त्यासाठी लागणारे कागद परीक्षा केंद्रातच दिले जातील व परीक्षा संपताच परत द्यावे लागतील.
  *  सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षेचे स्वरूप समजून घेऊन त्याप्रमाणे तयारी करणे.
सीमॅट ही एकूण ४०० गुणांची परीक्षा असून संपूर्णपणे वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असणारी आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण १०० प्रश्न असून त्यासाठी तीन तासांचा वेळ देण्यात आला आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण चार विभाग असतील. यामध्ये पहिला विभाग मुख्यत: अंकगणित, बीजगणित, भूमिती आदी गणितीय संकल्पना यावर आधारित आहे. दुसरा विभाग लॉजिकल रिझनिंग म्हणजेच तर्कशास्त्रीय संकल्पनांवर आधारित आहे. तिसरा विभाग भाषाविषयक (उदा. समानार्थी शब्द) प्रश्नांचा असून चौथा विभाग सामान्यज्ञानाचा आहे. प्रत्येक विभागामध्ये २५ प्रश्न असे एकूण १०० प्रश्न आहेत. प्रत्येक बिनचूक उत्तराला चार गुण मिळतील व चुकीच्या उत्तरामागे एक गुण वजा होईल. म्हणजेच चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह गुण असल्यामुळे, प्रत्येक उत्तर काळजीपूर्वक द्यावे लागेल.
 *   सीमॅटमध्ये उत्तीर्ण/अनुत्तीर्ण असे प्रकार नसून प्रत्येकाला त्याचे गुण कळविले जातील. या गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीप्रमाणे प्रवेश दिले जातील.
  *  या परीक्षेसाठी वयाची मर्यादा नाही. जे विद्यार्थी/ विद्यार्थिनी सप्टेंबर २०१२ मध्ये झालेल्या परीक्षेस बसले आहेत त्यांना पुन्हा फेब्रुवारी २०१३ मधील परीक्षेस बसण्याची गरज नाही. मात्र दोन्ही परीक्षा म्हणजे सप्टेंबर २०१२ व फेब्रुवारी २०१३ दिल्यास, दोन्ही परीक्षेतील जास्तीत जास्त गुण धरले जातील.
याप्रमाणे सीमॅट परीक्षेची संपूर्ण माहिती आपल्याकडे असणे आवश्यक आहे. या परीक्षेचे स्वरूप लक्षात घेता, तयारी कशी करावी याचा विचार पुढील लेखात करू.