01 March 2021

News Flash

उत्पादक कामावर आधारित शिक्षण हवे!

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळायला हवे आणि त्यासाठी त्यांना हाताने काम करण्याची संधी मिळायला हवी, याकडे जगभरात सुरू असलेल्या शिक्षणविषयक संशोधनांचा रोख आहे. कार्यकेंद्री शिक्षण

| December 3, 2012 01:26 am

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळायला हवे आणि त्यासाठी त्यांना हाताने काम करण्याची संधी मिळायला हवी, याकडे जगभरात सुरू असलेल्या शिक्षणविषयक संशोधनांचा रोख आहे. कार्यकेंद्री शिक्षण म्हणजे नेमके काय, त्याचा समावेश शालेय शिक्षणात कसा करता येईल आणि त्याची उपयुक्तता याचे सविस्तर विश्लेषण करणारी ही लेखमालिका-
सतराव्या शतकापासून ते १९५० या काळात शास्त्रीय ज्ञानात दर १५ वर्षांनी दुप्पट या वेगाने ज्ञाननिर्मिती झाली. मात्र संगणक क्रांतीमुळे वर्षांकाठी ६६ टक्के या वेगाने नवीन ज्ञान वाढत आहे. सध्या शालेय परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची गणितीक्षमता आणि स्मरणशक्तीची परीक्षा घेतली जाते. या दोन्ही गोष्टी संगणक आपल्यापेक्षा खूप चांगल्या रीतीने करू शकतो. म्हणूनच केवळ माहिती असणे पुरेसे होणार नाही तर माहितीचे उपयोजन कसे करायचे, उपलब्ध माहितीचा सृजनात्मक रीतीने प्रश्न सोडविण्यासाठी कसा उपयोग करायचा, ही नवीन कौशल्ये आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवावी लागणार आहेत. प्रत्यक्ष जीवनातील आव्हाने हे कधीही विज्ञानाचा प्रश्न, गणिताचा प्रश्न, भूगोल किंवा सामाजिक शास्त्राचा प्रश्न असे स्वतंत्रपणे आपल्यासमोर येत नाहीत. प्रश्न सोडवताना विविध विषयांतील संकल्पनांचा एकत्र विचार करावा लागतो. उदाहरणार्थ घराला रंग देताना त्याचे रसायनशास्त्र, गणित, घराच्या भिंती व त्यांची रचना त्या भागातील पावसाचे प्रमाण, रंगाची आवड, सौंदर्यदृष्टी, आíथक तरतूद या सर्वाचा विचार करून रंगांची निवड करावी लागते. इंटरनेटवर यातील प्रत्येक घटकावर भरपूर माहिती उपलब्ध आहे. मात्र त्यातील योग्य माहिती मिळवून तिचा अचूक निर्णय घेण्यासाठी उपयोग करण्याचे कौशल्य आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांना शाळेतून ‘उत्पादक कामात’ भाग घेण्याची संधी मिळाली तर अशा कामाला केंद्रस्थानी ठेवून विविध विषयांतील संकल्पना समजून घेणे शक्य होईल. या पद्धतीमुळे प्रत्यक्ष व्यवहारात ‘काम’ करण्यासाठी माहिती कशी मिळवायची व तिचा उपयोग विद्यार्थी शिकू शकतील. या शिकण्याच्या पद्धतीला ‘कार्यकेंद्री शिक्षण पद्धत’ म्हणतात.
जगभरातील शिक्षणावरील प्रयोग
एकविसाव्या शतकातील शिक्षण कसे असावे, यासाठी वेगवेगळ्या नावाने जगभर प्रयोग चालू आहेत. त्या सगळ्याचा रोख शाळेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळाले पाहिजे व त्यासाठी हाताने काम करण्याची संधी मिळायला हवी, याकडे आहे. उदा. fablab@school या प्रकल्पाअंतर्गत अमेरिका, मलेशिया, रशिया, ब्राझील अशा देशांतील अनेक शाळांत विद्यार्थी शास्त्र विषयाचे शिक्षण प्रत्यक्ष जीवनातील खऱ्या प्रश्नांवर प्रकल्प करत शिकतात. ‘फॅब लॅब’ म्हणजे अशी कार्यशाळा जेथे आवश्यक अत्याधुनिक साधने व यंत्रं असतात. या साधनांचा वापर करून विद्यार्थी उपयोगी वस्तू फॅब लॅबमध्ये तयार करतात. त्याचप्रमाणे अमेरिकेत Design Thinking कार्यक्रमाअंतर्गत आठवीपर्यंतचे विद्यार्थी NUEVA Innovation Lab मध्ये विविध विषयातील ज्ञानाचा समावेश असलेले प्रकल्प तयार करतात. एकत्र गटाने काम करून संशोधन समस्येवर उत्तर शोधणे व त्यासाठी आवश्यक ज्ञान आत्मसात करणे हे यातून साध्य केले जाते. विद्यार्थ्यांनी हाताने काम करणे व ते करताना ज्ञान मिळवणे हा विचार आता मान्य होत आहे. हाताने काम करत शिकणे ही तर शिकण्याची नसíगक पद्धत आहे. चाकाचा शोध लावणाऱ्या व्यक्तीपासून ते कुतुबमिनार -ताजमहाल बनविणाऱ्यांपर्यंत, एडिसन राईट बंधूंपासून ते बिल गेटस्पर्यंत अनेक संशोधक व उद्योजक हे या पद्धतीनेच शिकले आहे. प्रत्येकजण आपली मातृभाषा याच पद्धतीने शिकतो. या नसíगक कार्यकेंद्री शिक्षण पद्धतीची ओळख करून देणे व साकारताना येणाऱ्या अडचणींची ओळख हा या लेखाचा उद्देश आहे.
मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख
महाराष्ट्रातील अनेक माध्यमिक शाळांमध्ये IBT हा पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम राबविला जातो. यात शाळेमध्ये अभियांत्रिकी कार्यशाळा, विद्युत कामाचे साहित्य, खाद्यपदार्थनिर्मिती व शेतीसाठी आवश्यक अशी साधने उपलब्ध असतात. IBT मध्ये आठवडय़ातील एक दिवस विद्यार्थी प्रत्यक्ष हाताने काम करत शिकतात व ते करताना लोकांना विविध सेवा देतात. उदा. सिन्नर तालुक्यातील बारगाव पिंपरी शाळेतील विद्यार्थ्यांनी वस्तू/सामान वाहून नेण्यासाठी एक हातगाडी तयार केली. गाडीचे डिझाइन, फॅब्रिकेशन, वेल्डिंग, सामान खरेदी, मटेरियलचे कटिंग, चाके बसवणे इत्यादी सर्व कामे विद्यार्थ्यांनी केलीत. सर्वात शेवटी खर्च काढून वस्तूची किंमत काढली. हे केवळ व्यवसाय शिक्षण नव्हते तर सामान वाहून नेण्याच्या प्रश्नावर त्यांनी अभ्यासपूर्वक शोधलेले उत्तर होते. ते उत्तर केवळ शाब्दिक नव्हते तर कृतिशील होते.
मदानावर खेळण्यासाठी फक्की मारताना हात खराब होतात व रेषा सरळ पडत नाहीत, या समस्येवर मात करण्यासाठी याच शाळेतील विद्याíथनींनी फक्की मारण्याचे मशीन तयार केले. यासाठी त्यांना शारीरिक श्रमाबरोबर बौद्धिक श्रमही करावे लागले. अशा प्रकारचे प्रत्यक्ष उत्पादक काम करत ज्ञान मिळविल्यानेच  विद्यार्थ्यांमध्ये कृतिशीलता, सृजनशीलता, ताíकक क्षमता वाढू शकते. एकत्र काम केल्याने संघभावना वाढू शकते. अशा उत्पादक कामावर आधारलेल्या शिक्षणाचा आग्रह धरला जायला हवा.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2012 1:26 am

Web Title: production related work eduction needed
टॅग : Experience,Production
Next Stories
1 मुंबईतील डबेवाल्यांची द्विधा परिस्थिती
2 पुस्तकाचा कोपरा:व्यावसायिकता रुजावी म्हणून..
3 रोजगार संधी
Just Now!
X