जसजसं नवनवीन तंत्रज्ञान बाजारात येतं तसतसं अर्थातच वापरात असलेलं तंत्रज्ञान ‘जुनं’ होत जातं. आपल्या हातातल्या मोबाइल फोनच्या हँडसेटचंच उदाहरण पाहा. हा हँडसेट जेव्हा तुम्ही विकत घेतलात तेव्हा वापरात असलेल्या हँडसेटविषयी तुम्हाला काय वाटलं होतं? आणि आता हा हँडसेट काही महिने वापरून झाल्यावर बाजारात नव्याने दाखल झालेले हँडसेट पाहून काय वाटतं?
अर्थातच, जी गोष्ट मोबाइल हँडसेटची तीच टी.व्ही.ची आणि तीच कम्प्युटरची. दुकानातला एलसीडी टी. व्ही. सेट पाहिल्यावर आपल्याला आपल्या घरात असलेला कॅथोड रे टय़ूबवर चालणारा टी. व्ही. नकोसा वाटतो आणि काही महिन्यांमध्ये हाय डेफिनिशन एलईडी टी. व्ही. शेजाऱ्याकडे पाहिला की घरातल्या एलसीडीपेक्षा तो एलईडी टी. व्ही. हवाहवासा वाटतो.
नवीन तंत्रज्ञानाची ओढ सगळ्यांनाच असल्यामुळे जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मागणी नाही. काही वेळा स्वस्तातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याकडे काही लोकांचा कल असतो. या वस्तू बेभरवशाच्या असतात. म्हणजे, त्या चालू असल्या तर खूप दिवस आपल्याला साथ देतात. पण, काही वेळा फारशा चालत नाहीत. इलेक्ट्रॉनिक घडय़ाळे, कॅल्क्युलेटर्स, खेळणी अशा प्रकारच्या या वस्तू मग चक्क फेकून दिल्या जातात.
बाजारपेठेमधील वाढत्या मागणीमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीसुद्धा झपाटय़ाने कमी झाल्या आहेत. त्यामुळे बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करून घेण्याऐवजी तेवढय़ाच किमतीमध्ये नवी वस्तू बाजारात मिळते. पण या सगळ्यांमुळे घनकचरा वाढत जातो, हे आपल्या लक्षात येत नाही.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याला ‘ई-कचरा’ असं सोपं नाव दिलं आहे.
टाकाऊ दूरदर्शन संच, म्युझिक सिस्टीम्स, रेडिओ, मोबाइल हँडसेट, संगणक, बिघडलेले माऊस, की-बोर्ड, िपट्रर, मोबाइल आणि लॅपटॉपच्या बॅटऱ्या इत्यादी वस्तूंचा समावेश इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामध्ये होतो. या प्रकारचा कचरा धोकादायक असतो. कारण त्यामध्ये शिसे, बेरिलिअम, पारा, कॅडमिअम अशा अपायकारक जड धातूंचा समावेश असतो. या कचऱ्याची हाताळणी आणि विल्हेवाट करणे ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. भारतात दिवसाला सरासरी पाच टन ई-कचरा तयार होतो. २०१२ या वर्षी आठ लाख टन ‘ई-कचरा’ निर्माण होईल, असे सरकारी आकडेवारी सांगते. हा ई-कचरा जमिनीत गाडणे किंवा जाळून टाकणे पर्यावरणाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरते. उदाहरणच द्यायचं तर, विजेच्या उपकरणांसाठी वापरलेल्या तारांमधून तांबे मिळवण्यासाठी या तारा जाळल्या जातात. जाळल्यामुळे तारांवर असलेलं पॉलिथिनचं विद्युतरोधक आवरण जळतं आणि तांब्याची तार मिळते. तारांमधून तांबे मिळवण्यासाठी ही पद्धत सर्रास वापरली जाते, पण त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर हवाप्रदूषण होतं.
ई-कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी उत्पादनकर्त्यांवर आणि या वस्तू वापरणाऱ्याने करण्याची गरज आहे! भारतात काही कंपन्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने ई-कचरा व्यवस्थापन करण्यास सुरुवात केली आहे! पण तरीसुद्धा ई-कचरा समस्या गंभीर बनत चालली आहे आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर जनजागृती होण्याची गरज आहे! ही जनजागृती आपल्या विज्ञान प्रकल्पाच्या माध्यमातून करता येईल!
हा प्रकल्प करण्यासाठी तुम्ही तुमच्या घरापासूनच सुरुवात करा! तुम्ही स्वत: वापरत असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या
ई-कचऱ्यासंदर्भात सर्वेक्षण करा! सर्वेक्षण करण्यासाठी पुढे दिलेल्या मुद्दय़ांची
मदत घ्या.
१. तुमच्या घरात वापरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू कोणत्या आहेत?
२. त्यापकी गेल्या तीन वर्षांमध्ये नवीन आणलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू कोणत्या?
३. गेल्या तीन वर्षांमध्ये निकामी झालेल्या किंवा घरातून काढून टाकलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू कोणत्या?
४. निकामी झाल्याने किंवा त्याच प्रकारच्या वस्तू आणल्याने घरातून काढून टाकलेल्या जुन्या वस्तूंचे काय केले?
५. निकामी झालेली किंवा फेकून दिलेली इलेक्ट्रॉनिक वस्तू किती महिने / वर्षे वापरलीत?
६. भंगारवाल्याला दिलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे तो काय करतो? या वस्तूंमधील कोणत्या पदार्थाचे पुनर्चक्रीकरण केले जाते?
७. फेकून दिलेल्या ई-कचऱ्याचे पुढे काय होते, याविषयी माहिती मिळवा.
८. ई-कचरा व्यवस्थापन, पुनर्चक्रीकरण करणाऱ्या कोणकोणत्या कंपन्या आहेत याविषयी माहिती मिळवा.
९. काही कंपन्या ई-कचरा आटोक्यात आणण्यासाठी जुनी उपकरणे स्वत:च विकत घेऊन तशाच प्रकारच्या नवीन उपकरणांवर सवलत देतात. अशा प्रकारचे उपाय किंवा नावीन्यपूर्ण योजना ई-कचरा आटोक्यात येण्यासाठी केल्या जातात का? अशा कोणत्या योजना राबविता येऊ शकतात, असे तुम्हाला वाटते?
१०. ई-कचरा व्यवस्थापनासंदर्भात जे कायदे केले आहेत, त्यांच्याबद्दल माहिती मिळवा.
याच मुद्दय़ांच्या आधारे तुम्ही तुमच्या परिसरात राहत असलेल्या लोकांचे सर्वेक्षण करू शकता. या सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण सोबत दिलेल्या तक्त्यानुसार करता येईल.
सोबत दिलेल्या विश्लेषण तक्त्यावरून मिळालेली सांख्यिक माहिती आलेख किंवा वृत्तालेखाच्या मदतीने सादर करता येईल.
या विश्लेषणावरून ई-कचऱ्याला व्यवस्थापनासंदर्भात योग्य ते निष्कर्ष काढा.
तंत्रज्ञानाच्या या युगात आपण काळाप्रमाणे चाललो नाही तर मागे पडू. तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येकाने केला पाहिजे, यात दुमत नाही! पण हा वापर अधिक डोळसपणे आणि जागरूकतेने करण्याची गरज आहे, हे नक्की. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या संदर्भात Reduce, Reuse आणि Recycle (R) च्या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे.
यापुढे कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करताना काय विचार कराल? जसे, ‘आवश्यक असेल तरच ती इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू, अन्यथा नाही.’ तुमचे विचार आम्हाला नक्की लिहून कळवा.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Dec 2012 रोजी प्रकाशित
प्रोजेक्ट फंडा : ई-कचऱ्याचं काय करायचं?
जसजसं नवनवीन तंत्रज्ञान बाजारात येतं तसतसं अर्थातच वापरात असलेलं तंत्रज्ञान 'जुनं' होत जातं. आपल्या हातातल्या मोबाइल फोनच्या हँडसेटचंच उदाहरण पाहा. हा हँडसेट जेव्हा तुम्ही विकत घेतलात तेव्हा वापरात असलेल्या हँडसेटविषयी तुम्हाला काय वाटलं होतं? आणि आता हा हँडसेट काही महिने …

First published on: 03-12-2012 at 01:13 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Project funda what to do of e waste