भूदल, नौदल आणि हवाई अशा तीनही संरक्षण दलांतील प्रवेशासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या ‘कंबाइन्ड डिफेन्स सव्‍‌र्हिसेस एग्झामिनेशन’चे अग्निदिव्य पार करणे अत्यावश्यक आहे. येत्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या या परीक्षेसाठी १० डिसेंबपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. या परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम याविषयीचे मार्गदर्शन –
देशाच्या तीनही सैन्यदलांमध्ये प्रवेश करण्याचा राजमार्ग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी कंबाइण्ड डिफेन्स सव्‍‌र्हिसेस एग्झामिनेशन. वर्षांतून दोनदा होणाऱ्या या परीक्षेची वाट पाहणारा मोठा युवावर्ग आपल्या देशभरात आहे. येत्या १७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या परीक्षेचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० डिसेंबर आहे.
या परीक्षेचे विविध टप्पे यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर पुरुष उमेदवारांना भारतीय भूदल, हवाईदल व नौदलात अधिकारीचा आणि महिला उमेदवारांना भूदलात अधिकारीपदाचा मार्ग खुला होतो. या परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना इंडियन मिलिटरी अकॅडमी (देहरादून), इंडियन नेव्हल अकॅडमी (एझिमाला, केरळ), एअर फोर्स अकॅडमी (हैदराबाद) व ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (चेन्नई) येथे प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळतो.
सी.डी.एस. परीक्षेकरिता अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालीलप्रमाणे-
पात्रता –
पदवीच्या शेवटच्या वर्षांला असलेले युवक व युवती अर्ज करण्यासाठी पात्र आहेत, याची नोंद घ्यावी.
१)    इंडियन मिलिटरी अकॅडमी : कुठल्याही शाखेचे पुरुष पदवीधर, वय १८ ते २३ वर्षे दरम्यान असावे. उपलब्ध जागा- २५०
२)    इंडियन नेव्हल अकॅडमी : अभियांत्रिकी शाखेचे पुरुष पदवीधर, वय १८ ते २१ वर्षे दरम्यान असावे. (एन. सी. सी. नेव्हल विंग ‘सी’ सर्टिफिकेट धारकांसाठी वय १८ ते २३ वर्षे दरम्यान असावे.) उपलब्ध जागा- ४०
३)    एअर फोर्स अकॅडमी (वैमानिक): कुठल्याही शाखेचे पुरुष पदवीधर मात्र १२वीला गणित व भौतिकशास्त्र हे विषय आवश्यक. वय १८ ते २२ वर्षे दरम्यान असावे. उपलब्ध जागा- ३२
४)    ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (पुरुष  व महिला): कुठल्याही शाखेचे पुरुष व महिला पदवीधर, वय १८ ते २४ वर्षे दरम्यान असावे. उपलब्ध जागा (पुरुष)- १७५ व (महिला)- १२.
अर्ज कधी करावे? – सी.डी.एस. परीक्षेची जाहिरात वर्षांतून दोनदा म्हणजेच साधारणत: मे व डिसेंबर या महिन्यात ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’मध्ये प्रकाशित होते. ही परीक्षा वर्षांतून दोन वेळेस म्हणजेच फेब्रुवारी व सप्टेंबर या महिन्यात घेतली जाते. नुकतीच फेब्रुवारीच्या परीक्षेसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या वेळी विद्यार्थ्यांना १० डिसेंबर २०१२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ही परीक्षा दिनांक १७ फेब्रुवारी २०१३ रोजी घेण्यात येणार आहे. ही माहिती http://www.upsc.gov.in    या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहे.
अर्ज करण्याची पद्धत – परीक्षेसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने http://www.upsconline.nic.in  या संकेतस्थळावर दि. १० डिसेंबर २०१२ पर्यंत करावयाचे आहेत.
परीक्षा शुल्क – सर्व महिला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सर्व उमेदवार यांना अर्ज करताना शुल्क भरावे लागत नाही. इतर उमेदवारांसाठी  रु. २००/- (रु. दोनशे फक्त) शुल्क स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत रोख किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ बिकानेर व जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावनकोरची नेट बँकिंग सुविधा वापरून किंवा व्हिसा/ मास्टर / क्रेडिट/ डेबिट कार्ड वापरून भरायची आहे.
परीक्षेचे टप्पे –
१) लेखी परीक्षा (कंबाइण्ड डिफेन्स सव्‍‌र्हिसेस एग्झामिनेशन) सामान्य ज्ञान, इंग्रजी व गणित या तीनही प्रश्नपत्रिकांचा दर्जा दहावीच्या दर्जासमान असतो. सामान्य ज्ञान या पेपरमध्ये खालील विषय समाविष्ट असतात.
  सामान्य ज्ञान या विषयाच्या अभ्यासासाठी एन.सी.ई.आर.टी.ची पाठय़पुस्तके उपयुक्त ठरतात. चालू घडामोडीच्या अभ्यासासाठी नियमितपणे वर्तमानपत्र वाचणे. दूरदर्शन व आकाशवाणीच्या बातम्या ऐकणे उपयुक्त ठरू शकते. विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास त्यांना प्रश्नांचे नेमके स्वरूप कळू शकते. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत उतारे वाचून प्रश्न सोडवणे, वाक्यातील शब्दांचा क्रम योग्य रीतीने लावणे, छोटय़ा उताऱ्यातील वाक्यांचा क्रम योग्य रीतीने लावणे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द व वाक्यातील व्याकरणातील चूक ओळखणे इ. प्रकारचे प्रश्न असतात. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या इंग्रजीचा शब्दसाठा वाढवायला हवा तसेच व्याकरणाचाही बारकाईने अभ्यास करायला हवा. गणिताच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेतून भरपूर सराव करावा.
निगेटिव्ह मार्किंग – तीनही प्रश्नपत्रिकेतील प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाला असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खात्रीशीर माहीत असलेले उत्तरच अंकित करावे.
परीक्षा केंद्र – या परीक्षेसाठी महाराष्ट्रात मुंबई व नागपूर ही दोन केंद्रे आहेत. २०१२मध्ये पदवीधर झालेल्या व पदवीच्या शेवटच्या वर्षांला गेलेल्या युवावर्गाला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व अभ्यास कसा करावा, हे समजावून घेऊन आतापासून तयारी सुरू केल्यास पहिल्याच प्रयत्नात लेखी परीक्षा उत्तीर्ण होणे सहजशक्य आहे.
२)  सव्‍‌र्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखत
लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना ‘सव्‍‌र्हिसेस सिलेक्शन बोर्ड’ (एस.एस.बी.) मार्फत मुलाखतीसाठी बोलावण्यात येते. मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांची मेडिकल बोर्डमार्फत वैद्यकीय चाचणी घेण्यात येते.
या दोन्ही टप्प्यांत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना संबंधित अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो.
प्रशिक्षण कालावधी –
इंडियन मिलिटरी अकॅडमीचा प्रशिक्षण कालावधी १८ महिने, एअर फोर्स अकॅडमीचा ७४ आठवडे व ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीचा ११ महिने तर इंडियन नेव्हल अकॅडमीसाठी नेव्हल ओरिएंटेशन कोर्स ४४ आठवडे, कॅडेट ट्रेनिंग ६ महिने, मिडशिपमन ट्रेनिंग ६ महिने व सब-लेफ्टनंट (टेक्निकल कोर्स) ३२ आठवडे असतो. प्रशिक्षण पूर्ण केलेले कॅडेट्स आर्मीत लेफ्टनंट किंवा नौदलात सब-लेफ्टनंट किंवा वायुदलात फ्लाइंग ऑफिसर या पदावर रुजू होतात.
देशसेवेचा राजमार्ग असणाऱ्या भूदल, नौदल आणि हवाईदलात रुजू होण्याची इच्छा असलेल्या सळसळत्या रक्ताच्या तरुणाईसाठी ‘सीडीएस’च्या मांडवाखालून जाणे भाग आहे. हे लक्षात घेऊनच गांभीर्याने परीक्षेची तयारी करणे आवश्यक ठरते.