माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणप्रक्रियेत अधिकाधिक उपयोग केल्यास ज्ञानाचा प्रसार अधिक सहज आणि दर्जेदार कसा होऊ शकतो, हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ‘शिक्षण विकास मंच’ने अलीकडेच आयोजित केलेल्या राज्यस्तरीय परिषदेत स्पष्ट दिसून आले. या परिषदेत राज्याच्या विविध ठिकाणांहून आलेल्या आणि माहिती तंत्रज्ञानासंबंधी शिक्षणप्रक्रियेत अभिनव प्रयोग करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींनी आपल्या प्रकल्पासंबंधी सादरीकरण केले. त्यातील काही उल्लेखनीय प्रकल्प पुढीलप्रमाणे आहेत –
शालेय व्यवस्थापनात ज्या ज्या गोष्टी लागतात, त्या सर्व इंटरनेटच्या साह्य़ाने करण्याची सुविधा देणारी inmyschool.in  ही वेबसाइट राजेंद्र बाबर या अधिकाऱ्याने विकसित केली आहे. तिचे सादरीकरण अवधूत चेनके यांनी केले. शाळेतील सूचना, परिपत्रके, जमाखर्च, निकाल, घडामोडी, संशोधन या सर्व गोष्टी या वेबसाइटमुळे सोप्या होत असून राज्यातील कितीतरी शाळा आज ही वेबसाइट वापरत आहेत, असे त्यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या शाळांतील मुलांसाठी ‘व्हच्र्युअल क्लासरूम’ हा उपक्रम राबवला जातो. दादरला त्यासाठी स्टुडिओ उभारला गेला आहे. यामुळे चार माध्यमांच्या सुमारे ४८० शाळांतील पाचवी ते दहावीच्या मुलांना उत्तम शिक्षणाचा लाभ होत आहे. या प्रकल्पाची माहिती कैलास आर्य या बीट ऑफिसरने दिली.
रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा. गायकवाड यांनी त्यांच्या समूहातील सर्व शाळांमध्ये शिक्षणप्रक्रियेत आणि शाळा-प्रशासनात वेबसाइटचा अत्यंत प्रभावी वापर कसा केला आहे, हे विशद केले.  
भाऊसाहेब चासकर या अकोले (बहिरवाडी) येथील शिक्षकाने http://www.sahyagiri.com  ही वेबसाइट तयार केली आहे. यात एका तालुक्याचा स्थानिक इतिहास व भूगोल सचित्र दाखवला आहे. त्यांच्या तालुक्यातील पिके, दुर्ग, वनसंपदा, नद्या, धरणे सर्व काही माहिती असल्याने ते एक लìनग टूल बनले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
सातारा जिल्ह्य़ातील मार्डी येथील प्राथमिक शिक्षक राम सालगुडे एक  ब्लॉग चालवतात. त्यात शिक्षण विभागासाठी उपयुक्त अशी प्रशासकीय माहिती तर आहेच, शिवाय सुविचारांपासून ते शिक्षकांसाठी उपयोगी संदर्भापर्यंत बरेच काही आहे, असे त्यांनी एकदम खुसखुशीत शैलीत सांगितले.
अंजुमन इस्लाम शाळेच्या मुख्याध्यापिका सबा पटेल यांनी मुंबईच्या एच. वार्डमधील सर्व शाळांना जोडणारी, प्रशासनाला उपयोगी ठरणारी, तसेच वर्गातील अभ्यास रंजक करणारी प्रणाली विकसित केली आहे.
अशी अनेक सादरीकरणे आज दिवसभरात झाली. यात सर्वात लक्षणीय सादरीकरण ठरले ते या परिषदेच्या शुभारंभाला झालेले- त्याचे नाव होते- माझी डिजिटल शाळा. शहापूर तालुक्यातील पाष्टेपाडा हे चिमुकले गाव. ५० घरांचे. तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील तरुण शिक्षक संदीप गुंड यांनी इंटरनेटचा भन्नाट वापर करून त्या शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता फारच सुधारून दाखवली आहे. मुलांचे शिकणे, अभ्यास, सराव, मूल्यमापन, करमणूक सारे काही हाय-टेक रीतीने होते. संदीप गुंड यांनी महत्त्वाकांक्षेने ही कल्पना राबवली. हे तंत्र मिळवण्यासाठी त्यानी शिक्षक, पालक, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी सर्वाची मदत घेतली. आज ही शाळा अन्य जिल्हा परिषद शाळांसाठी रोल मॉडेल ठरत आहे.
 या परिषदेचा समारोप केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या भाषणाने झाला. त्यावेळी ते म्हणाले की, माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणात अधिकाधिक वापर झाल्यास ज्ञानाचा प्रसार सहज आणि दर्जेदार होऊ शकणार आहे. त्या दृष्टीने या तंत्राचा प्रभावी वापर शिक्षणात करणाऱ्या राज्यभरातील लोकांना एकत्र आणण्याचा हा कार्यक्रम फार महत्त्वाचा आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी सदैव आग्रही असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी हा कार्यक्रम होणे हे फार सयुक्तिक आहे, असे उद्गार त्यांनी काढले.
‘शिक्षण विकास मंच’तर्फे दर दोन महिन्यांतून एकदा महत्त्वाच्या शैक्षणिक विषयवार चर्चा करणारा ‘शिक्षण कट्टा’ हा उपक्रम चालवला जातो. शिक्षणतज्ज्ञ कै. कुमुद बन्सल यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांपूर्वी सुरू झालेला हा उपक्रम आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ निवृत्त प्रशासकीय अधिकारी डॉ. वसंत काळपांडे हे ‘शिक्षण विकास मंच’चे मुख्य संयोजक आहेत.
११ नोव्हेंबर हा दिवस देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ‘शिक्षण विकास मंच’तर्फे दर वर्षी या दरम्यान दिवसभराची राज्यस्तरीय परिषद आयोजित केली जाते. गेली पाच वष्रे हा उपक्रम नेमाने सुरू आहे. यंदाच्या परिषदेचा विषय होता- शालेय शिक्षणात माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान याबाबतचे राष्ट्रीय धोरण. राज्यभरातून सुमारे ३०० शिक्षणप्रेमी या परिषदेला आले होते.
सकाळी या परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ‘शिक्षण विकास मंच’च्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘शिक्षण कट्टा’ उपक्रमाचे तसेच या वार्षकि परिषदेचे महत्त्व विशद केले. शिक्षण कट्टय़ावर आणि वार्षकि परिषदेला शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ आणि अभ्यासक येतात आणि एकेक विषय घेऊन त्याची सांगोपांग चर्चा करतात. त्यातून पुढे आलेल्या अभ्यासू सूचना आम्ही शिक्षणमंत्र्याना देतो. शिक्षणातील गुणवत्तावाढीसाठी आम्ही दूताची भूमिका बजावत आहोत. असे शिक्षण कट्टे राज्यातील प्रत्येक महानगरात सुरू करण्याचा मनोदय खा. सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलून दाखवला. शालेय शिक्षणाचा दर्जा उंचवावा, त्याला सखोलता यावी, ते अधिक अचूक व्हावे, मुलांमध्ये विश्लेषक वृत्ती भिनावी, शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा दर्जा वाढावा, यासाठी शालेय शिक्षणात माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान वापरले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
परिषदेचे उद्घाटन शालेय शिक्षण राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान यांनी केले. शिक्षणातील गुणवत्तावाढ हे शासनाचे ध्येय असून तंत्रज्ञानाची कास धरणे, आय. आय. टी., ब्रिटिश कौन्सिल अशा नामवंत संस्थांशी हात मिळवणे, कौशल्य विकास कार्यक्रम राबवणे, शिक्षण प्रशिक्षणाची व्याप्ती व दर्जा वाढवणे-अशा सर्व आघाडय़ांवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. मनोज किल्लेदार यांचे बीजभाषण यावेळी झाले. त्यानी यावेळी ई-लìनग म्हणजे काय, ते का व कसे प्रभावी होऊ शकते, त्याचा शिक्षणात उपयोग कसा होतो, हे सविस्तरपणे विषद केले.
यानंतर काही तज्ज्ञांची सादरीकरणे झाली. महाराष्ट्राच्या माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ. सुनील मगर यांनी महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाची सद्यस्थिती विशद केली. राज्यात शालेय शिक्षणात माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा समावेश करण्यामागची उद्दिष्टय़े, आव्हाने आणि प्रयत्न यांचा आढावा त्यांनी घेतला.
माध्यमतज्ज्ञ डॉ. केशव साठे यांनी मल्टीमीडियाचा वापर करून शालेय शिक्षण कसे दर्जेदार, रंजक, कल्पक, प्रोत्साहक आणि सर्वसमावेशक होऊ शकते हे विशद केले. मात्र तंत्रज्ञान हाताशी असले तरी शिक्षणाच्या प्रक्रियेवर वर्चस्व कायम शिक्षकांचेच असले पाहिजे. आपण तंत्रज्ञानाचे गुलाम होऊ नये, तर तंत्रज्ञानाला आपले गुलाम करता आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
‘जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी’चे प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांनी त्यांच्या संस्थेत ई-लìनगद्वारे शिक्षण-प्रशिक्षण कसे होते, ते विषद केले. एकंदरीत या संपूर्ण परिषदेतून महाराष्ट्रातील काही शाळांमध्ये तरुण, उत्साही शिक्षक, प्रशासक यांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर किती विविधतेने करत आहेत, याचे वेगवेगळे दाखले पाहायला मिळाले. या परिषदेला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि आज झालेली गर्दी बघता यापुढे दर वर्षी ही परिषद २५ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मोठय़ा सभागृहात आयोजित केली जाईल, असे ‘शिक्षण विकास मंच’चे संयोजक दत्ता बाळसराफ यांनी जाहीर केले.