अभ्यासासंबंधित मुद्दय़ांकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन विकसित होण्यासाठी तसेच त्या विषयावरील सद्य चर्चेचे भान येण्याकरता यूपीएससी परीक्षेच्या तयारीत संदर्भपुस्तकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
अभ्यासाच्या प्रारंभिक टप्प्यात प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि ‘एनसीईआरटी’च्या क्रमिक पुस्तकांचे वाचन याविषयी मागील काही लेखांमध्ये चर्चा केलेली होती. आजच्या लेखात अभ्यास पक्का व्हावा म्हणून संदर्भपुस्तकांची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. मुख्य परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न विषयाच्या उपयोजनावर (application) तसेच चालू घडामोडींवर आधारित असतील तर वर्तमानपत्रे आणि नियतकालिके सोडून संदर्भपुस्तकांची गरज असते का, असा प्रश्न यूपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकाला सतावत असतो. दुसऱ्या बाजूला संदर्भपुस्तके वाचण्यापेक्षा अभ्यासक्रमाला धरून असलेल्या बाजारातील मार्गदíशकांचे वाचन का करू नये, असाही प्रश्न उपस्थित केला जातो. कोणत्याही विषयावरील संदर्भपुस्तकाची रचना, आशय आणि व्याप्ती लक्षात घेता पुढील फायदे अधोरेखित करता येतील. संदर्भ पुस्तकांमुळे  कळीच्या विविध मुद्दय़ांविषयी चालणारी सद्य चर्चा समजू शकते. संबंधित मुद्दय़ांकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन, त्याविषयक वाद याची कल्पना येते. मुख्यत: वरील प्रश्नांची उत्तरे शोधण्यातूनच त्यांचे महत्त्व कळून येते. अभ्यासक्रमातील विविध विषयांवरील संदर्भग्रंथांमुळे त्या त्या विषयांची व्याप्ती लक्षात येते. तसेच विषयांशी संबंधित घडामोडींवर प्रक्रिया करून आपले विश्लेषणात्मक मत तयार करण्यासाठी संदर्भग्रंथ साहाय्यभूत ठरतात. खरेतर संदर्भग्रंथ म्हणजे त्या त्या काळातील चालू घडामोडींना दिलेला प्रतिसादच असतो.
वास्तविक पाहता ‘एनसीईआरटी’ पुस्तकांद्वारे संपूर्ण अभ्यासक्रमाचे आकलन होत नाही, तर विषयाची निव्वळ तोंडओळख होत असते. अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या विषयांच्या कक्षा रुंदावण्यासाठी, विषयाचा परिप्रेक्ष्य (approach) आत्मसात होण्यासाठी तसेच महत्त्वाचे म्हणजे विषयाचे मूल्यांकन आणि प्रस्तुतता (relevance) या बाबींचा शोध घेण्यासाठी प्रमाणित, अस्सल संदर्भग्रंथांची आवश्यकता भासते. मात्र संदर्भ निवडताना ते विशिष्ट  प्रकारातील न निवडता सर्वसामान्य पद्धतीचे व समावेशक असावेत.
बाजारातील मार्गदíशकांचा (गाइड्स) विचार करता अभ्यासक्रमाला समोर ठेवूनच त्यांची निर्मिती केलेली असते. गाइड्सद्वारे विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील कच्चे दुवे शोधून तिथे आपला अवकाश शोधण्याचा प्रयत्न केला जातो. खरे पाहता टाळी एका हाताने वाजत नाही. विद्यार्थ्यांचीही मागणी कॅप्सूलप्रमाणे असेल तर बाजार त्यासाठी तयारच असतो. कोणत्या ठिकाणी दुखते त्याप्रमाणे विद्यार्थ्यांला कॅप्सूल पुरविल्या जातात. त्यातूनच आकर्षक बुलेटफॉर्म गाइड्सचा उदय होतो. त्यामुळे अस्सल संदर्भ परिघाबाहेर फेकले जातात. मात्र मुख्य परीक्षेचा प्रत्यक्षात अनुभव घेतल्यानंतरच असे करण्यातील तोटा व चूक लक्षात येते.
संदर्भ कसे आणि किती वाचावेत किंवा काय वगळावे याविषयीचा दृष्टिकोन प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामुळे आलेला असतो. मात्र, विद्यार्थ्यांनी प्रश्नांचे विश्लेषण केलेले नसेल, त्यांना विश्लेषणात्मक वाचनाची सवय जडलेली नसेल मात्र, पूर्वपरीक्षा देण्याची अधिक घाई असेल, अशा ‘नेमक्या’ वेळी गाइड्स शिरकाव करतात आणि वेळ कमी उरला असल्याचे कारण पुढे करून गाइड्स विद्यार्थ्यांच्या माथी मारली जातात. परिणामी, अभ्यासाच्या अशा शॉर्टकट प्रक्रियेचे लोण सर्वत्र
पसरत जाते.
संदर्भग्रंथांचा विचार करता, मागील प्रश्न समजून घेण्यास, त्यातील विषयाचे उपयोजन बारकाईने पाहून विचारलेल्या प्रश्नांची विश्लेषणात्मक चौकट आणि दृष्टिकोन  समजून घेण्यासाठी संदर्भग्रंथांचे वाचन गांभीर्याने करणे फायद्याचे ठरू शकते. निव्वळ माहितीप्रधान पद्धतीने चालू घडामोडींचे वाचन करण्याच्या नादात संदर्भग्रंथांकडे दुर्लक्ष झाले असता, चालू घडामोडींना आपला चेहरा देता येत नाही. त्याउलट, आपली मतेही उसनवारीवर बेतलेली असतात. परिणामी,  आपली दृष्टी विश्लेषणात्मक न बनता वरवरची, पोकळ आणि वर्णनात्मक वाटू लागते.  
मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाचा विचार करता इंग्रजी माध्यमासाठी पेपर १ : ‘मॉडर्न इंडिया’- ग्रोवर आणि ग्रोवर, ‘इंडिया सिन्स इन्डिपेंडन्स’ -बिपनचंद्रा, ‘मॉडर्न वर्ल्ड हिस्टरी’- अर्जुन देव, ‘इंडियन जिऑग्राफी’ – माजीद हुसन, ‘इकॉनॉमिक जिऑग्राफी’- एच. एम. सक्सेना, पेपर २ – ‘इंडियन गव्हर्नमेंट आणि पॉलिटिक्स’- फादिया अ‍ॅण्ड फादिया, ‘इंडियाज फॉरेन पॉलिसी’- व्ही. पी. दत्ता, ‘वर्ल्ड फोकस’ पेपर ३ : ‘इंडियन इकॉनॉमी’- रमेशसिंग, उमा कपिला किंवा धीरेंद्रकुमार, ‘सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’- विमलकुमार सिंग हे संदर्भग्रंथ अभ्यासावेत.
मराठी माध्यमासाठी पेपर १ मधील भारतीय इतिहासासाठी वर नमूद केलेल्या इंग्रजी पुस्तकांचे मराठीतील अनुवाद उपलब्ध आहेत. ‘मॉडर्न वर्ल्ड हिस्टरी’साठी मराठीत अनुवाद झालेले जैन-माथुर उपयोगात आणायला हरकत नाही. भारत आणि जागतिक भूगोलासाठी माजीद हुसनची अनुवादित पुस्तके उपलब्ध आहेत.
सारांश केवळ एनसीईआरटी किंवा गाइड्स या आधारे यूपीएससी परीक्षेचा चक्रव्यूह भेदता येत नाही. त्यासाठी त्या त्या विषयांवरील एखादे प्रमाणित संदर्भपुस्तक वाचणे अत्यावश्यक ठरते. बदलता अभ्यासक्रम, वाढणारी विषयांची व्याप्ती आणि वरचेवर प्रश्नांचे बदलत चाललेले आणि आव्हानात्मक बनणारे स्वरूप या बाबी लक्षात घेता यूपीएससीच्या तयारीत संदर्भपुस्तकांना पर्याय नाही, हे लक्षात ठेवायला हवे.
admin@theuniqueacademy.com