इस्रायलमध्ये मनुष्यबळाच्या होणाऱ्या योग्य वापरासंबंधीचा ‘करिअर वृत्तान्त’मध्ये (२३ सप्टेंबर) प्रा. सुधाकर आगरकर यांचा प्रसिद्ध झालेला लेख विचारांना चालना देणारा आहे. आपल्या देशानेही तिथल्या शैक्षणिक पद्धतीचा अवलंब करावा, असे वाटते. याचे मुख्य कारण असे की, सैनिकी शिक्षण आणि त्यातील शिस्तही आपल्या समाजात रुजणे अत्यावश्यक आहे.
– डॉ. भारती आमटे
भारत-इस्रायल संबंध वृद्धिंगत व्हावे..
१६ सप्टेंबर रोजी ‘लोकसत्ता’त इस्रायलच्या शिक्षणप्रणालीसंबंधात प्रा. आगरकर यांचा प्रसिद्ध झालेला लेख वाचला. गेल्या वर्षभरापासून आम्ही भारत-इस्रायल उच्च शिक्षणातील सहकार्यासाठी प्रयत्न करीत आहोत. इस्रायलने भारत व चीनच्या विद्यार्थ्यांसाठी १०० पोस्ट डॉक्टरल शिष्यवृत्त्या देण्यास सुरुवात केली आहे. तीन वर्षांच्या या कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचमध्ये १०० पैकी ६७ विद्यार्थी भारतीय आहेत. याशिवाय भारत-इस्रायल संयुक्त संशोधन निधी आणि कृषी शिक्षणात भरीव सहकार्य देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. टाटा समूहाने अलीकडेच इस्रायलच्या तेल अवीव विद्यापीठातील मूमेंटम फंडात दीड कोटी डॉलर गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. बहुतांशी इस्रायली विद्यापीठांनी आता इंग्रजी भाषेतील उपक्रम सुरू केले असून भविष्यात भारत-इस्रायलमधील शिक्षण क्षेत्रातले सहकार्य अधिकाधिक वृद्धिंगत होईल, अशी अपेक्षा आहे.
– अनय जोगळेकर,
माध्यम आणि माहिती समन्वयक,
इस्रायल महावाणिज्य दूत.
मनोबल उंचावणारा लेख
‘करिअर वृत्तान्त’मधील (३० सप्टेंबर) सुरेश नाखरे यांचा लेख वाचला. अभियांत्रिकीच्या निकालात सुधार व्हावा, या दृष्टीने काही उपाययोजना अत्यंत प्रभावीपणे त्यांनी या लेखात मांडल्या आहेत. विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचेही मनोबल उंचावणारा असा हा लेख आहे. मी अभ्यासात मागे पडलेल्या मुलांची शैक्षणिक स्थिती सुधारावी, यासाठी खासगी शिकवणी घेतो. या लेखाचे आम्ही वर्गात मोठय़ाने वाचन केले. मुलांच्या आणि माझ्या करिअरच्या उन्नतीसाठी हा लेख मार्गदर्शक ठरला, यात शंका नाही.
– उमेश शिंगाडे
विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन व्हावे..
अभियांत्रिकीच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी नाखरे यांनी लिहिलेला लेख (३० सप्टेंबर) वाचला. त्यावर काही मुद्दे नोंदवावेसे वाटतात. लहानपणापासूनच अमुक एक विषय कळला नाही तरी मार्क मिळायला हवेत, असाच दृष्टिकोन विकसित करण्यात येतो, जो नोकरी लागल्यानंतरही कायम राहतो. माझ्या संस्थेसाठी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेताना याचा अनुभव मी अनेकवार घेतला आहे. पुस्तकांतून ते जे शिकले त्याआधारित सद्यस्थितीबाबत काही प्रश्न विचारले असता, त्याची उत्तरे मुलांना देता येत नाहीत. शिक्षण पूर्ण करणे हे सोपे आहे, मात्र शाळेतल्या मुलांना पाठांतराऐवजी संबंधित विषय समजून घेण्याचा दृष्टिकोन तयार करणे अत्यावश्यक आहे. मराठी-इंग्रजी माध्यमाचा आपण मांडलेल्या मुद्दय़ाशीही मी सहमत आहे. माझ्या मते, एखाद्या विषयाचे आकलन होण्यासाठी भाषा ही आडकाठी होऊ शकत नाही. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम असते. कदाचित एखाद्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अमुक एक भाषेतून झाले नसेल तर त्याच्यासाठी त्या भाषेतून व्यक्त होणे काहीसे अवघड वाटू शकते, मात्र तो विषय समजून घेण्यासाठी ती भाषा अडथळा ठरू शकत नाही.
– अतुल चितळे
परिणामकारक अध्यापनाचे मार्ग
सुरेश नाखरे यांचा लेख वाचला. मी यंदा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झालो आहे. एक शिक्षक म्हणून आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींचे मार्गदर्शन मला या लेखातून मिळाले. त्याबद्दल आभार. माझ्या विद्यार्थ्यांसाठी जे उत्तम ठरेल, अशा परिणामकारक अध्यापनाचे मार्ग या लेखात उत्तम पद्धतीने सांगितले आहेत.
– मंदार जगताप
आठवणींना उजाळा
नाखरे सरांचा लेख वाचला आणि याच बाबतीत माझा अनुभव शेअर करावासा वाटला. मी अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. मी बीई औरंगाबादमधून २०११ साली पूर्ण केले. अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षांत मी इअर डाऊन झालो होतो. अगदीच आडगावातून मी बारावी पूर्ण केलं होतं – तेही घोका आणि ओका या पद्धतीने. त्यामुळे जेव्हा पहिल्याच दिवशी मी अभियांत्रिकी महाविद्यालयात पाऊल ठेवलं तेव्हा माझ्यासाठी ते वेगळ्याच विश्वात आगमन केल्यासारखं होतं. फुटक्या छपराच्या शाळेतून इथल्या भव्य इमारतीत आल्यावर मला हरवून गेल्यासारखं वाटायचं. त्याआधी माझा शहराशी आलेला संबंध अगदीच नगण्य होता. मुलामुलींमधला मोकळेपणा, सगळ्याच गोष्टींतला चकचकीतपणा.. सगळंच माझ्यासाठी भव्य होतं. पण इथल्या वातावरणात माझा न्यूनगंड वाढत गेला आणि मला असुरक्षित वाटू लागलं. मनावर कायम दडपण असायचं. याच दडपणाखाली वर्गात लक्ष लागायचं नाही आणि भीती वाढत गेली.. व्हायचं तेच झालं. पहिल्या सत्रात तीन विषय राहिले आणि दुसऱ्या सत्रात भीती आणि राहिलेल्या तीन विषयांच्या ताणाने मी पुरता नामोहरम झालो. याचा परिणाम म्हणजे इअर डाऊन! नाइलाजाने गावाकडे परतावे लागले.
घरची सर्वात ओढ मी तेव्हा अनुभवली. या प्रचंड जगात इवल्याशा घरटय़ाचा आधार काय असतो, हेही पुरेपूर समजलं. गावाकडचे लोक म्हणजे एक तर डोक्यावर घेऊन नाचतात, नाही तर पायाखाली तुडवतात. कधी विचार केला नव्हता ते ऐकून घ्यावं लागत होतं; पण या सगळ्यात घरच्यांनी मला सांभाळून घेतलं, विश्वास दाखवला. पहिले सहा महिने तर आत्महत्या करण्याचे विचार मनात येत होते; पण लहानपणापासूनची वाचनाची आवड उपयोगी पडली.. विवेकानंद, सावरकर, महात्मा गांधी, दासबोध, पुलं.. या वाचनाने माझे विचार बदलत होते, सकारात्मक होत होते. माझा दृष्टिकोन बदलत गेला..
मी नव्या जोमाने अभ्यासाला लागलो. उत्तीर्ण झालो. त्यानंतर मला कधीही भीती वाटली नाही आणि कशाचं दडपणही आलं नाही. नंतरची तीन वर्षे मी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. या वर्षी गेट उत्तीर्ण झालो. आता चेन्नईमध्ये एका उत्तम विद्यापीठात एम.टेक करतोय. एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, आजही असे काही गुरू आहेत जे मनापासून त्यांच्या विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास घडावा, म्हणून प्रयत्न करतात आणि असे गुरू मला लाभले, हे माझं भाग्य!
राजेश मुळे