अझिम प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या विशेष व पूर्णकालीन स्वरूपाच्या असणाऱ्या खालील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या २०१४-२०१६ या शैक्षणिक सत्रांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
या अभ्यासक्रमांचे स्वरूप व तपशील पुढीलप्रमाणे आहेत-
एमए-एज्युकेशन : या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने शिक्षण, शैक्षणिक अभ्यासक्रम, बाल शिक्षा, शालेय शिक्षा, शालेय शैक्षणिक व्यवस्थापन व संचालन इ.चा प्रामुख्याने समावेश असेल.
विकास व्यवस्थापन : या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने आरोग्य, ग्रामीण आरोग्य, पोषण व्यवस्था, विकासविषयक कायदे व पद्धती, विकास प्रकाशन-व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य व स्थायी विकास यांसारख्या विषयांचा प्रामुख्याने समावेश असेल.
आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा पदवी परीक्षेच्या अंतिम पात्रता वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. संबंधित क्षेत्रातील काम करण्याचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा १६ फेब्रुवारी २०१४ रोजी देशांतर्गत निवडक ३४ शहरांमधील परीक्षा केंद्रावर एकाच वेळी घेण्यात येईल.
अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी आणि निवड परीक्षेतील गुणांकांच्या आधारे त्यांची संबंधित अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येऊन त्यामध्ये प्रवेश देण्यात येईल.
शिष्यवृत्ती व आर्थिक साहाय्य : निवड झालेल्या ज्या उमेदवारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असेल अशांना त्यांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल. याशिवाय निवडक गरजू विद्यार्थ्यांना विशेष शुल्क-सवलत व आर्थिक साहाय्य देण्यात येईल.
अभ्यासक्रमानंतरच्या रोजगार संधी : वरील अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार संधीविषयक मार्गदर्शन करण्यात येते व गेल्या वर्षी हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या १०० टक्के विद्यार्थ्यांना रोजगार संधी प्राप्त झाल्या होत्या हे या संदर्भात उल्लेखनीय आहे.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहितीसाठी अझिम प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या http://www.azimpremjiuniversity.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे प्रवेश अर्ज अझिम प्रेमजी युनिव्हर्सिटी, पीईएस आयटी  होसूर मार्ग, बंगळुरू ५६० १०० या पत्त्यावर ७ फेब्रुवारी २०१४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
कंपन्यांमध्ये केवळ सामाजिक जाणिवेच्या दृष्टीनेच नव्हे, तर आता कायदेशीर तरतुदींद्वारापण सामाजिक जबाबदारीचे स्वरूप आणि आवाका वाढत्या प्रमाणात होण्याच्या पाश्र्वभूमीवर ज्या पदवीधरांना वरील अभ्यासक्रमांसह या वाढत्या व आगळ्यावेगळ्या क्षेत्रात करिअर करायचे असेल अशांनी या अभ्यासक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा.