यूपीएससी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीकांत जाधव

परीक्षा कोणतीही असो, एकदा त्यातल्या प्रश्नांचा अदमास घेण्याची कला जमली, की ती सोपी होऊन जाते. यूपीएससी, एमपीएससी या दोन्ही परीक्षांच्या अभ्यासाची रणनीती, विषयांची उकल तर आपण करिअर वृत्तांतमधून करत असतोच. परंतु अनेक वाचकमित्र-मैत्रिणींच्या विनंतीवरून, सूचनेवरून या स्पर्धापरीक्षांतील प्रश्नांच्या अधिक सरावासाठी ‘प्रश्नवेध’ हे खास सदर सुरू करत आहोत. यूपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही परीक्षांकरता सराव प्रश्न आणि त्यांची उकल या सदरात दिली जाईल.

मुख्य परीक्षा

सामान्य अध्ययन पेपर पहिला –

उत्तर लेखन कौशल्य

विषय- भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास

प्रस्तुत लेखामध्ये आपण यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षामधील सामान्य अध्ययन पेपर पहिलामधील भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास या घटकावर विचारण्यात येणारे प्रश्न, या प्रश्नांची योग्य उकल करण्यासाठीचे निकष पाहणार आहोत.

यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर पहिला यामध्ये तीन घटकांचा अभ्यास करावा लागतो.

१. भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास

२. समाज (भारतीय समाज आणि जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम)

३. जगाचा भूगोल (यामध्ये भारताचा भूगोलदेखील समाविष्ट आहे)

परीक्षेमध्ये एखाद्या प्रश्नाचे उत्तर निबंधात्मक पद्धतीने लिहावे की मुद्दे पद्धतीने हे प्रश्नाच्या स्वरूपानुसार ठरवावे लागते. काही प्रश्नांची उत्तरे हे संकीर्ण आणि विश्लेषणात्मक अशा दोन्ही माहितीचा वापर करून लिहावी लागतात तर काही प्रश्नांची उत्तरे  ही संकीर्ण माहितीवर आधारित लिहिता येऊ शकतात. यानुसार आत्ता आपण उदाहरणे पाहू. पुढील प्रश्न हा  २०१८ मधील मुख्य परीक्षेत भारतीय वारसा आणि संस्कृती या विषयावर विचारण्यात आलेला आहे आणि हा १० गुण आणि १५० शब्दांसाठी होता.

 प्र. २ – भारतीय कलेचा वारसा याचे संरक्षण ही सद्यस्थितीमधील गरज आहे. टिपण्णी करा (Safeguarding the Indian art heritage is the need of the moment. Comment).

उत्तर – या प्रश्नाचे आकलन करण्याचे निकष

या प्रश्नामध्ये Safeguarding (संरक्षण करणे) हा शब्द महत्त्वाचा आहे आणि हा शब्द भारतीय कलेचा वारसा याचे संरक्षण करणे या संदर्भात आहे आणि हे संरक्षण अथवा संवर्धन हे सद्यस्थितीत गरजेची आहे. हा एक महत्त्वाचा पलू या प्रश्नामध्ये अंतर्भूत आहे व हे दोन्ही पलू समजून घेऊन यावर टिपण्णी करायची आहे.

पहिला भाग – गरज का आहे या दृष्टिकोनातून. 

असा प्रश्न का विचारण्यात आलेला आहे. याला वर्तमान काळातील काही घडामोडींचा संदर्भ आहे का तर याचे उत्तर ‘होय’ आहे. कारण सद्यस्थितीत देशात विकासात्मक कार्य मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत आणि यामुळे भारतीय संस्कृतीचा कलात्मक वारसा असणारी ठिकाणे यावर होणारे संभाव्य अतिक्रमण, त्याच बरोबर जागतिक तापमानवाढ यामुळे असणारा संभाव्य धोका तसेच वारसा म्हणून जतन केल्या जाणाऱ्या वस्तूची चोरी, पर्यटनामध्ये योग्य निगा राखता न येणे इत्यादी काही महत्त्वाचे उदाहरणे उत्तरात देणे गरजेचे आहे. (संक्षिप्त स्पष्टीकरणासह जास्तीतजास्त ८० ते ९० शब्द).

भाग दुसरा – सद्यस्थितीत संरक्षण करणे का गरजेचे आहे, यावर टिपण्णी करणे.

पहिल्या भागातील माहितीचा धागा पकडून भारत सरकारद्वारे आखण्यात आलेल्या विविध योजना, वारसा जतन करण्यासाठी करण्यात आलेले कायदे तसेच स्थापन करण्यात आलेल्या संस्था इत्यादी नमूद करून यामध्ये आणखीन कशाप्रकारे सुधारणा करून अधिक योग्य पद्धतीने संरक्षण करता येऊ शकते हे दाखवणे गरजेचे आहे.

शेवटी पुढील वाक्य लिहून उत्तराचा समारोप करावा. – यातून जगाला भारतीय सांस्कृतिक वारसा याची उपलब्धी दिसून येते. तसेच यामुळे देशातील पर्यटनाला अधिक चालना मिळते व भारतीय सांस्कृतिक वारशाची प्रसिद्धी संपूर्ण जगामध्ये होऊ शकते.

(संक्षिप्त स्पष्टीकरणासह जास्तीतजास्त ६० ते ७० शब्द)

साधारणत: उपरोक्त प्रश्न आकलन पद्धती परीक्षेत चांगले गुण प्राप्त करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. उपरोक्त प्रश्नाचे उत्तर हे मुद्दे पद्धतीनुसार लिहिणे अधिक श्रेयस्कर ठरते आणि याच बरोबर शब्द मर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे. म्हणून यासाठी जास्तीतजास्त वेळा उत्तर लिहिण्याचा सराव करावा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about search for indian heritage and culture
First published on: 05-01-2019 at 01:24 IST