गेल्या काही वर्षांत जगभरातील अनेक मातब्बर जनसंपर्क संस्थांचे भारतात आगमन झाल्याने आपल्याकडील जनसंपर्क क्षेत्र हे अधिकाधिक समंजस होत आहे.
या क्षेत्रातील कामाच्या वाढत्या संधी आणि मागणी लक्षात घेता जनसंपर्क क्षेत्रात
बौद्धिक कर्तृत्त्वाला विशेष संधी उपलब्ध आहे, हे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांनी ध्यानात घ्यावे.
भोवतालच्या जगाच्या संपर्कात राहावे लागत असल्याने तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांशी कामाकरता संबंध येत असल्याने जनसंपर्क सल्लागार हा पेशा खूपसा माध्यम व्यावसायिकांसारखाच आहे. अनेक दृष्टीने जनसंपर्क हा व्यवसाय म्हणजे ग्राहक, समुदाय, शासन आणि प्रसारमाध्यमे यांसारख्या संस्था आणि बाजारपेठ यांच्यातील दुवा असतो. हा दुवा बनण्याकरता जनसंपर्क व्यावसायिकाला अनेक कौशल्ये आणि ज्ञान अवगत करणे आवश्यक असते, जेणेकरून त्याला संपर्क धोरण आखण्यासाठी योजना तयार करता येते आणि त्या त्या संस्था आणि संबंधित व्यक्ती यांना जोडून देता येते.
जनसंपर्क सल्लागार हे जनसंपर्क संस्था तसेच विविध संस्था, कंपन्या, कार्यालये या ठिकाणी काम करू शकतात. प्रसारमाध्यमांशी संवाद साधणे, प्रकल्प कामाचे नियोजन करणे तसेच प्रकल्प अहवाल बनवणे हे त्यांचे प्रमुख काम आहे. गेल्या काही वर्षांत जगभरातील अनेक मातब्बर जनसंपर्क संस्थांचे आपल्याकडे आगमन झाल्याने या क्षेत्रातील स्पर्धा वाढत आहे, तसेच इथल्या जनसंपर्क क्षेत्रातील कामाचा दर्जा उंचावत आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांनी या क्षेत्रातील कामाच्या वाढत्या संधी आणि मागणी लक्षात घेता मेहनत करणाऱ्यांना कामाची कमतरता नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कामाचे स्वरूप
जनसंपर्क सल्लागारांचे काम विश्लेषणात्मक असते. हे काम सृजनशील तर आहेच, पण कामाचा आराखडा बनवण्यापासून ते पूर्णत्वाला जाईपर्यंत कामाच्या विविध टप्प्यांवर त्यांना सातत्याने लक्ष पुरवावे लागते. जनसंपर्क सल्लागाराकडे संवादकौशल्ये तसेच लोकांशी जुळवून घेण्याचे कौशल्य असावे लागते. कामानिमित्त त्याला वारंवार प्रवास करावा लागतो.
जनसंपर्क अधिकारी हे खासगी संस्था, सरकारी संस्था, प्रसारमाध्यमे, स्वयंसेवी संस्था अशा विविध ठिकाणी कार्यरत असतात. संस्थेच्या जनसंपर्क मोहिमेची जबाबदारी म्हणजेच त्या मोहिमेचे नियोजन, विकसन आणि अंमलबजावणी ही जनसंपर्क सल्लागारांवर अवलंबून असते. त्यांना दोन्ही बाजूंच्या व्यक्तींच्या सतत संपर्कात राहावे लागते. त्याचबरोबर जनसंपर्क प्रकल्पादरम्यान प्रसिद्धी पत्रिका, पत्रके, थेट पाठवली जाणारी ई-मेल्स, प्रमोशनल व्हिडीओज, छायाचित्रे, चित्रपट आणि मल्टिमीडिया प्रोग्राम्स या विविध प्रकारांवर देखरेख ठेवावी लागते.
जनसंपर्क सल्लागारांचे काम केवळ आयोजन आणि व्यवस्थापनाचे नसून त्यासोबत अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्याचे आणि कठोर मेहनतीचे आहे. पत्रकार परिषद, प्रदर्शने, विशेष समारंभ, प्रेस टुर यांचे आयोजन करणे, अद्ययावत माहितीचे आदानप्रदान करणे, जनसंपर्काच्या दृष्टीने तयार राहणे अशा वेगवेगळ्या स्वरूपांचे काम जनसंपर्क सल्लागारांना करावे लागते.
इतर उद्योग क्षेत्रांप्रमाणे जनसंपर्क क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा ठोस असा दिनक्रम नसतो. त्यांच्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाची अखेर ही केवळ माहितीच्या देवाणघेवाणीने होत असते. एखाद्या सर्वसाधारण दिवसाची सुरुवात बातमीच्या अथवा माहितीच्या विश्लेषणाने होते. त्यानंतर कार्यालयीन तसेच बाहेरील कामाचे नियोजन आणि प्रत्यक्ष कामाची सुरुवात होते. त्यानंतर जे काम सोपवले गेले असेल त्यानुसार ग्राहकांना सेवा प्रदान करण्याच्या कामासाठी वेळ द्यावा लागतो. या क्षेत्रात कनिष्ठ ते मध्यम स्तरावर काम करणाऱ्या व्यक्तींचे एक ठरावीक रुटीन असते, ज्यात त्यांना दस्तावेज करणे, माहिती अहवाल बनवणे अशा पद्धतीचे काम करावे लागते.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on pr consultant
First published on: 07-12-2015 at 00:04 IST