मूलभूत विज्ञानाचे क्षेत्र अतिशय आव्हानात्मक आणि विलक्षण बौद्धिक आनंद देणारे आहे.  मूलभूत विज्ञानातील संशोधनाकडे विद्यार्थ्यांनी वळावे यासाठी या क्षेत्रातील कार्यरत संस्थांची आणि महत्त्वाकांक्षी उपक्रमांची माहिती झ्र्
आपल्या देशातले प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ डॉ. सी. एन. आर. राव यांना अलीकडेच ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला. या निमित्ताने आपल्या देशातली मूलभूत विज्ञानाच्या क्षेत्रातली स्थिती काय आहे याची चर्चा सुरू झाली आहे. या क्षेत्रातली आजची स्थिती जाणून घेण्याआधी थोडा इतिहास पाहू या.
सुप्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक चंद्रशेखर वेंकटरमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी एक महत्त्वाचा शोध लावला. त्याला त्यांनी नाव दिले ‘रमण परिणाम’. हा शोध इतका मोलाचा होता, की अवघ्या दोन वर्षांत म्हणजे १९३० मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातल्या नोबेल पारितोषिकाचा सन्मान प्राप्त झाला. रमण यांच्या या प्रेरणादायी संशोधनाचे स्मरण करण्यासाठी १९८७ सालापासून २८ फेब्रुवारी हा दिवस भारतभर ‘राष्ट्रीय विज्ञानदिन’ म्हणून साजरा केला जातो.
लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर जगात भारत आज दुसऱ्या स्थानावर आहे. लवकरच तो चीनला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर येणार आहे. जगातल्या प्रत्येक सहा माणसांपैकी एक भारतीय असतो. एवढी आपली लोकसंख्या अवाढव्य आहे. परंतु खेदाची गोष्ट अशी, की रमण यांच्यानंतर विज्ञानातले नोबेल पारितोषिक एकाही भारतीयाला मिळवता आले नाही. १९३० सालानंतर आजपावेतो अब्जावधी माणसे आपल्या देशात जन्माला आली, पण त्यांच्यापैकी एकही नागरिक या सर्वोच्च सन्मानापर्यंत पोहोचू शकला नाही. ही परिस्थिती अतिशय बोलकी आहे. वैज्ञानिक क्षेत्राकडे झालेल्या भारताच्या दुर्लक्षावर विदारक प्रकाश टाकणारी आहे. मूलभूत विज्ञानाबाबत आपला समाज जी आत्यंतिक अनास्था दाखवत आहे ती ठळकपणे अधोरेखित करणारी आहे.
शाळेत/महाविद्यालयात शिकणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांला ‘तुला मोठेपणी कोण व्हावंसं वाटतं’ असा प्रश्न विचारला तर हमखास मिळणारे उत्तर म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनिअर. या दोन व्यवसायांपलीकडे काही करीअर असू शकते असे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनाही अजिबात वाटत नाही. ही दोन किंवा त्यासारखी इतर (उदा., एमबीए, सीए, सीएस) करीअर निवडण्यामागे असणारे कारण अगदी स्पष्ट आहे. हे व्यवसाय भरपूर पैसा देतात. पण ही गोष्ट उघडपणे मान्य न करता ‘या व्यवसायाला खूप वाव आहे’ असे सांगितले जाते. अशा रीतीने हुशार विद्यार्थी या व्यवसायाकडे वळतात. १९८२च्या सुमारास आपल्या महाराष्ट्रात ‘विनाअनुदान संस्कृती’ (विकृती?) सुरू झाली आणि महाराष्ट्रात विनाअनुदान तत्त्वावर चालणाऱ्या इंजिनिअरिंग महाविद्यालयांचे पेवच फुटले. लठ्ठ देणग्या देऊन मठ्ठ विद्यार्थ्यांनाही तेथे प्रवेश मिळू लागला. मग हुशार विद्यार्थ्यांचा तर प्रश्नच नाही. पूर्वी इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणे अवघड होते. आता प्रवेश न मिळणे अवघड झाले आहे. या महाविद्यालयांच्या अनैसर्गिक वाढीमुळे जागा जास्त आणि प्रवेश घेणाऱ्या इच्छुकांची संख्या कमी अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. २०१३-१४ या शैक्षणिक वर्षांत इंजिनिअरिंगच्या सुमारे ५५ हजार जागा शिल्लक राहिल्या. तीच गत एमबीएच्या जागांची झाली.
सरकारच्या या ‘विनाअनुदान’ धोरणाचा जबरदस्त फटका १९८२ सालापासून जवळपास सर्वच विज्ञान महाविद्यालयांना बसला, कारण त्यांची विद्यार्थिसंख्या झपाटय़ाने कमी झाली. दुसरा फटका गुणवत्तेच्या संदर्भात बसला. अगदी सामान्य वकुबाच्या विद्यार्थ्यांलाही इंजिनिअरिंगला प्रवेश मिळू लागला. त्यामुळे त्याच्यापेक्षाही सुमार विद्यार्थी विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेऊ लागले. अशा विद्यार्थ्यांमधून चांगले वैज्ञानिक, चांगले शिक्षक/ प्राध्यापक निर्माण होण्याची अपेक्षा करणेच चूक. गंमत म्हणजे पालक मंडळी स्वत:च्या मुलांना डॉक्टर/ इंजिनिअर बनवतात आणि आजकाल चांगले शिक्षक/प्राध्यापक राहिले नाहीत, अशी टीका करतात. म्हणजे केवळ शिवाजीच दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा अशी परिस्थिती नसून चांगला शिक्षक/ प्राध्यापकही दुसऱ्याच्याच घरात जन्माला यायला हवा, अशी समाजाची धारणा बनली आहे. म्हणजे आमच्या मुलाने आय.टी. क्षेत्रात जाऊन खोऱ्याने पैसा ओढावा, पण दुसऱ्याच्या मुलाने तुलनेने कमी पगाराच्या वैज्ञानिक/ शिक्षक या नोकऱ्या पूर्ण समर्पणवृत्तीने कराव्यात अशी आपल्या समाजाची दुटप्पी वृत्ती बनली आहे.
या दृष्टीने लग्नविषयक जाहिरातीही वाचण्यासारख्या असतात. वराबद्दलच्या अपेक्षा लिहिताना कोणतीही मुलगी वैज्ञानिक/ शिक्षक/ प्राध्यापक नवरा हवा असे लिहित नाही. (फार काय, अशा व्यवसायातला नवरा ‘चालेल’ असेही म्हणत नाही!) ही घटना फार बोलकी आहे, कारण या व्यवसायाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन त्यातून लख्खपणे स्पष्ट होतो. प्रसिद्ध नाटककार वि. वा. शिरवाडकरांनी आपल्या ‘नटसम्राट’ या अतिशय गाजलेल्या नाटकात एक मार्मिक वाक्य लिहून ठेवले आहे. ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही, ती रुपयाच्या नाण्याभोवती फिरते’ या वस्तुस्थितीची प्रचिती या संदर्भात वारंवार येते.
या सगळय़ा परिस्थितीमुळे आपल्या देशात मूलभूत विज्ञानाची फार मोठी परवड चालू आहे. देशातल्या अनेक प्रयोगशाळांना चांगले वैज्ञानिक उपलब्ध होत नाहीत. सामान्य शाळा/ महाविद्यालयांना चांगले अध्यापक मिळत नाहीतच, पण आयआयटीसारख्या नामवंत शिक्षण संस्थांतही चांगल्या अध्यापकांचा विलक्षण तुटवडा जाणवतो आहे. याचा गंभीर परिणाम अर्थातच त्या संस्थांच्या दर्जावर होणार आहे. त्यामुळे जीवाचा आटापिटा करून आपल्या देशातले अतिशय बुद्धिमान विद्यार्थी प्रवेश मिळवतील खरे, पण त्यांना कदाचित तेवढे बुद्धिमान अध्यापक तेथे मिळणार नाहीत अशी परिस्थिती भविष्यकाळात उद्भवण्याची मोठी शक्यता आहे.
वस्तुत: मूलभूत विज्ञानाचे क्षेत्र अतिशय आव्हानात्मक आहे. विलक्षण बौद्धिक आनंद देणारे आहे. खासगी क्षेत्रात असलेली नोकरीची अनिश्चितता, कामाचे अनिश्चित तास यापासून मूलभूत विज्ञानाचे क्षेत्र मुक्त आहे. आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी येथे फार मोठा वाव आहे. त्यासाठी सरकारने कोटय़वधी रुपयांची तरतूद केलेली आहे, अनेक नवीन संस्था/ योजना गेल्या काही वर्षांत सुरू केलेल्या आहेत.
मूलभूत विज्ञानात पीएच.डी. करण्यासाठी सरकार दरमहा १६ हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती देते. शिवाय अनुषंगिक खर्चासाठी प्रत्येक वर्षांला २० हजार रुपयांचे अनुदान देते. ही शिष्यवृत्ती पीएच.डी.च्या पहिल्या दोन वर्षांसाठी असते. पुढच्या तीन वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती दरमहा १८ हजार रुपये एवढी वाढू शकते. ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी त्या विद्यार्थ्यांने नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट (NET)  उत्तीर्ण होणे आवश्यक असते.
हुशार विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच हेरून त्यांच्यात संशोधनाची आवड निर्माण व्हावी (कॅच देम यंग!) यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे INSPIRE नावाची योजना सुरू करण्यात आली आहे. या शब्दाचे पूर्णरूप असे आहे- इनोव्हेशन इन सायन्स परस्युट फॉर इन्स्पायर्ड रीसर्च. इयत्ता सहावी ते दहावीचे विद्यार्थी या योजनेसाठी निवडले जातात. त्यांच्यासाठी खास शिबिराचे आयोजन केले जाते. त्यांचा सर्व खर्च सरकार करते. इयत्ता १२ वीच्या परीक्षेत पहिल्या एक टक्क्यात स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला वर्षांला ८० हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र त्यासाठी त्याने एफ.वाय.बी.एस्सी.साठी म्हणजे मूलभूत विज्ञानासाठी असलेल्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला पाहिजे अशी अट असते. सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येतो.
याशिवाय शालेय/ कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना, नॅशनल टॅलेन्ट सर्च, सायन्स ऑलिम्पियाड  अशा अनेक स्पर्धात्मक परीक्षा होतात. त्यात यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक संस्थांमध्ये थेट प्रवेश मिळतो.
वैज्ञानिक संशोधनाकडे हुशार विद्यार्थी आकर्षित व्हावेत यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने काही वर्षांपूर्वी ५ केंद्रांची स्थापना केली. ‘भोपाळ, कोलकाता, मोहाली, पुणे आणि त्रिवेंद्रम या ठिकाणी स्थापन झालेल्या या केंद्राचे नाव इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्टिफिक एज्युकेशन अ‍ॅण्ड रीसर्च (IISER) असे आहे. विद्यार्थ्यांना या ठिकाणी इयत्ता १२वीनंतर प्रवेश मिळतो. अशाच प्रकारची एक संस्था भुवनेश्वर येथे नॅशनल इन्स्टिटय़ूट अफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रीसर्च या नावाने अणुऊर्जा विभागातर्फे सुरू करण्यात आली आहे.
आपल्या देशाने अंतराळ विज्ञानात फार मोठी भरारी घेतलेली आहे. या क्षेत्रात मनुष्यबळ विकसित करण्यासाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी (IIST) नावाची संस्था त्रिवेंद्रम येथे स्थापन करण्यात आली आहे. तेथेही बारावीनंतर प्रवेश घेता येतो.
याशिवाय मूलभूत विज्ञानात संशोधन करण्यासाठी वाव देणाऱ्या अनेक संस्था आपल्या देशात पूर्वीपासून आहेतच. अणुऊर्जा आणि अंतराळ विज्ञान या दोन क्षेत्रांत आपल्या देशाने आजपावेतो केलेली कामगिरी नेत्रदीपक म्हणावी अशीच आहे. या आणि इतरही क्षेत्रात बुद्धिमान विद्यार्थ्यांची फार आवश्यकता आहे. अनेक मोठमोठय़ा संधी, सन्मान, पुरस्कार अशा विद्यार्थ्यांची वाट पाहात आहेत.
या लेखात उल्लेख केलेल्या काही संस्थांची अधिक माहिती पुढील वेबसाइट्सवर मिळू शकेल.
http://www.iiserpune.in
http://www.iiser-admission.in
http://www.inspire-dst.gov.in
http://www.niser.ac.in
http://www.csirhrdg.res.in
http://www.iist.ac.in

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Basic scinece opportunity and affordness
First published on: 09-12-2013 at 07:41 IST