राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रवेशासाठी

अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावयाचा असून १५ जुलै २०१६ च्या आत अर्ज भरणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथील १३८ व्या एनडीए तुकडी प्रवेशासाठी अर्ज स्वीकृती सुरू झाली असून बारावीत शिकत असलेले अथवा बारावी उत्तीर्ण तरुण अर्ज करण्यास पात्र आहेत. ज्या तरुणांची जन्मतारीख २ जानेवारी १९९८ आणि १ जानेवारी २००१ या तारखांचे मध्ये आहे, असे तरुण अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावयाचा असून १५ जुलै २०१६ च्या आत अर्ज भरणे आवश्यक आहे.
प्रवेश पात्रता- कला, वाणिज्य तथा शास्त्र शाखेतून शिकत असलेले बारावीतील तरुण अर्ज करण्यास पात्र. बारावी पूर्ण केलेले तरुणही अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या तरुणांची जन्मतारीख २ जानेवारी १९९८ नंतरची असणे जरुरी आहे. प्रबोधिनीत प्रवेशाच्या वेळी तरुणाचे वय १९ वर्ष सहा महिन्यांच्या आत असणे जरुरीचे आहे. मुली अर्ज करू शकत नाहीत.
रिक्त जागा- नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी अ‍ॅण्ड नेव्हल अ‍ॅकॅडमी एक्झाम (०२), २०१६ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेद्वारे एकूण ४१० जागा भरल्या जाऊ शकतात. ज्याचा तपशील पुढीलप्रमाणे- एनडीए- ३५५ (आर्मी विंग २०८, नेव्हल विंग- ५५, नेव्हल अ‍ॅकॅडमी- ५५ (१०+२ कॅडेट एन्ट्री स्कीम)
अर्ज भरण्याची प्रक्रिया- लोकसेवा आयोगाने या परीक्षेची सूचना/ निवेदन १८ जून २०१६ रोजी आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या आहेत. अर्जदाराने हे निवेदन  www.upsc.gov.in वर नीट वाचावे व त्यानंतर  www.upsconline.nic.in या संकेतस्थळाचा वापर करून ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०१६ आहे. अर्जदारांना (एस.सी./ एस.टी. उमेदवार सोडून) रु. १००/- (रुपये शंभर फक्त) परीक्षा शुल्क भरावयाचे आहे. परीक्षा शुल्क नेट बॅकिंगद्वारा भरता येते. एससी/ एसटी उमेदवारांना परीक्षा फी माफ आहे.
लेखी परीक्षा- नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी अ‍ॅण्ड नेव्हल अ‍ॅकॅडमी एक्झाम (०२) २०१६ ची परीक्षा लोकसेवा आयोगातर्फे रविवार १८ सप्टेंबर २०१६ रोजी घेण्यात येईल. या अंतर्गत ०२ जुलै २०१७ रोजी सुरू होणाऱ्या एनडीएच्या १३८ व्या तुकडीसाठी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स विंगच्या जागा भरण्यात येतील. त्याचप्रमाणे ०२ जुलै २०१७ रोजी (म्हणजे त्याच दिवशी) सुरू होणाऱ्या इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी कोर्सच्या १०० व्या तुकडीसाठीच्या उमेदवारांचीदेखील निवड करण्यात येईल. महाराष्ट्रात ही लेखी परीक्षा फक्त दोन शहरांमध्ये घेण्यात येते, मुंबई आणि नागपूर. लेखी परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ स्वरूपाचे (MCQ) असते. दोन प्रश्नपत्रिका असतात. एक पेपर गणिताचा ३०० मार्क असलेला आणि दुसरा जनरल अ‍ॅबिलिटी टेस्ट ६०० मार्काचा. दोन्ही पेपर अडीच तास कालावधीचे असतात. चुकीचे उत्तर लिहिल्यास निगेटिव्ह मार्क आहेत.
लेखी परीक्षेचा निकाल – लेखी परीक्षेचा निकाल साधारणपणे डिसेंबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवडय़ात लागण्याची शक्यता असेल. निकाल http://www.upsc.gov.in या संकेतस्थळावर पाहावयास मिळतो.
एस.एस.बी. मुलाखत- लेखी परीक्षेत यशस्वी ठरलेल्या युवकांना जानेवारी/ फेब्रुवारी २०१७ मध्ये एस.एस.बी. मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीच्या तारखा तसेच केंद्रांविषयीची माहिती भूदल/ नौदल/ हवाई दलांच्या संकेतस्थळावर पाहावयास मिळते. तसेच याविषयी लेखी पत्र/ एस. एम.एस.देखील उमेदवारांना पाठविला जातो. एस.एस.बी. मुलाखत दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते. पहिल्या टप्प्यात इंटेलिजन्स टेस्ट व पिक्चर परसेप्शन अ‍ॅण्ड डिस्कशन टेस्ट घेतली जाते. या टप्प्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात पहिल्या दिवशी मानसिक चाचणी व पुढील दोन दिवसांत सामूहिक परीक्षणाला सामोरे जावे लागते. याच तीन दिवसांत एके दिवशी वैयक्तिक मुलाखत घेतली जाते, जी साधारणपणे तासभर चालते. या परीक्षणानंतर चौथ्या दिवशी उमेदवारांना १०-१२ ऑफिसर्सच्या पॅनेलसमोर दोन ते तीन मिनिटांसाठी एका छोटय़ा मुलाखतीला सामोरे जावे लागते, ज्यास कॉन्फरन्स (Conferance) म्हणतात. कॉन्फरन्स झाल्यानंतर दोन- तीन तासांतच मुलाखतीचा निकाल जाहीर करण्यात येतो.
वैद्यकीय तपासणी– एस.एस.बी. मुलाखतीचे दोन्ही टप्पे पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी सैनिकी रुग्णालयात करून घ्यावी लागते. वैद्यकीयदृष्टय़ा पात्र ठरलेले उमेदवार फक्त सैनिकी प्रशिक्षणासाठी पात्र समजले जातात.
गुणवत्ता यादी – लेखी परीक्षा आणि एस. एस. मुलाखतीच्या एकत्र गुणांच्या आधारावर राष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता यादी तयार करण्यात येते. ही यादी मे २०१७/ जून २०१७ (सुरुवात) मध्ये जाहीर करण्यात येते. वैद्यकीय चाचणीत पात्र ठरलेल्या, बारावी उत्तीर्ण तरुणांना गुणवत्ता यादीतील स्थानाप्रमाणे असलेल्या जागांनुसार रुजू होण्याविषयी सूचना देण्यात येतात. जून २०१७ अखेरच्या आठवडय़ात निवड झालेल्या तरुणांना एनडीए/ नेव्हल अ‍ॅकॅडमी येथे रुजू होता येते.
लेफ्ट. कर्नल प्रदीप ब्राह्मणकर (निवृत्त) apexcareers2005@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Admission in national defence academy