मला सीबीएसईच्या दहावी परीक्षेत ९१ टक्के गुण मिळाले आहेत. मला नॅशनल डिफेन्स एक्झामिनेशन द्यायची आहे. मला त्याबद्दल माहिती मिळेल का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशाल भामरे

नॅशनल डिफेन्स अकॅडेमची परीक्षा बारावीत गेल्यावर किंवा बारावी उत्तीर्ण झाल्यावर देता येऊ शकते. बारावीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय घेतले असतील तर या परीक्षेद्वारे इंडिअन एअर फोर्स, इंडियन नॅव्हल फोर्स आणि इंडियन मिलिटरी फोर्ससाठी असणाऱ्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थी पात्र ठरु शकतो. मात्र बारावीमध्ये हे दोन्ही विषय नसल्यास विद्यार्थी फक्त इंडियन मिलिटरी फोर्ससाठी असणाऱ्या प्रशिक्षणासाठीच पात्र ठरु शकतो. ही बाब ध्यानात ठेऊन तू अकरावीमध्ये प्रवेश घेताना विषयांची निवड करावीस.

नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी आणि नॅव्हल अ‍ॅकॅडमीसाठी दरवर्षी दोनदा संघ लोकसेवा आयोगातर्फे अखिल भारतीय स्तरावर स्पर्धा परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा देशभरातील विविध केंद्रांमध्ये घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूर केंद्राचा समावेश आहे. या परीक्षेला अविवाहित मुलेच बसू शकतात. एनडीएच्या परीक्षेसाठीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा लागतो. हा अर्ज www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरून भरावा लागेल. परीक्षेच्या तीन आठवडे आधी ई-अ‍ॅडमिशन कार्ड पाठविले जातील.  www.upsc.gov.in या संकेतस्थळावरुन अ‍ॅडमिशन कार्ड डाउनलोड करता येते. परीक्षेची फी १०० रुपये. अनुसूचित जाती आणि जमाती सवंर्गातील उमेदवारांना फी लागणार नाही. ही फी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत रोखीने भरता येते किंवा व्हिसा कार्ड, मास्टर कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यांचा वापर करुनही भरता येऊ शकते.

परीक्षा पद्धती – एनडीए परीक्षेसाठी गणित आणि सामान्य क्षमता चाचणी (जनरल अ‍ॅबिलिटी टेस्ट) असे दोन पेपर्स घेण्यात येतात. दोन्ही पेपरचा कालावधी प्रत्येकी अडीच तास आहे. गणिताचा पेपर तीनशे गुणांचा तर अ‍ॅबिलिटी टेस्टचे गुण सहाशे आहेत. ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल. निगेटिव्ह मार्किंग पध्दतीचा अवलंब केला जातो. गणिताचा अभ्यासक्रम हा १२वीच्या अभ्यासक्रमावर आधारित राहील. एनडीएची परीक्षा देऊ  इच्छिणारा विद्यार्थी शारीरिक आणि मानसिकदृष्टया सक्षम असावा. त्याला कोणत्याही स्वरुपाचा गंभीर स्वरुपाचा आजार नसावा. उंचीनुसारच त्याचं वजन असावं. कमी अथवा जास्त वजन नसावं. कानामध्ये मळ नसावा. हायड्रोसील नसावे. टॉन्सिल नसावे. मूळव्याध नसावी. श्वासोच्छासाचा त्रास नसावा. दृष्टी उत्तम असावी. कोणतेही मोठे दोष नसावेत. उत्तम शारीरिक क्षमतेसाठी विशिष्ट स्वरुपाची परिमाणं निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे  केवळ चाळणी परीक्षा उतीर्ण झाल्यावर अ‍ॅकॅडमीमधील प्रवेश सुनिश्चित झाल्याचं गृहित धरण्यात येऊ  नये. अनेक विद्यार्थी पुढे वैद्यकीय चाचणित अपात्र ठरतात. त्यामुळे परीक्षेसाठी अर्ज भरताना आपण शारीरिकदृष्टया पात्र आहोत की नाही याची तपासणी केली असणे अधिक चांगले.

यासाठी १५ मिनिटात २.४  किलोमीटर धावण्याचा सराव सुरु करावा. दोरीवरील उडय़ांचा सराव करावा. ३ ते ४ मीटर दोरावरचा चढ (रोप क्लाइंब ) करता येईल. अर्ज भरल्यानंतर लगेच असा सराव सुरु करावा.

पत्ता – सेक्रेटरी, युनियन पब्लिक सव्‍‌र्हिस कमिशन, धोलपूर, नवी दिल्ली-११००६९. लेखी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व चाचणी घेतली जाते. त्यानंतरच अंतिम निवड केली जाते. जाते.

दूरध्वनी: ०११-२३३८५२७१/ २३३८११२५/२३०९८५४३

करिअरसंबंधीचे प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career guidance
First published on: 04-08-2017 at 00:59 IST