सायबर लॉ या विषयासंबंधी कोणते अभ्यासक्रम आहेत? या क्षेत्रात पुढे करिअरच्या संधी किती आहेत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संकेत लाभाडे

सगळे जग आता डिजिटल होत चालले आहे. या डिजिटल विश्वात अनेक अपप्रवृत्तीही फैलावत आहेत.

त्यांना आळा घालण्यासाठी आणि आपल्या सुरक्षेसाठी सायबर लॉची गरज आहे. पुढील संस्थांनी सायबर लॉशी संबंधित अभ्यासक्रम सुरू केले आहेत-

(१) इंडियन लॉ इन्स्टिटय़ूट – सर्टिफिकेट कोर्स इन सायबर लॉ/ हा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने करता येतो.

कालावधी- तीन महिने. संगणकाचे उत्तम ज्ञान असलेली कोणतीही व्यक्ती हा अभ्यासक्रम करू शकते.

संपर्क – http://www.ili.ac.in

(२) सिम्बॉयसीस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निग- सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन सायबर लॉ. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी/ कालावधी- सहा महिने. संपर्क- http://www.scdl.net

(३) एशिअन स्कूल ऑफ सायबर लॉ-

डिप्लोमा इन सायबर लॉ. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी. कालावधी- सहा महिने

अ‍ॅडव्हान्स्ड प्रोग्रॅम इन सायबर लॉ. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी- सहा महिने

संपर्क- http://www.asianlaws.org/

(४) मुंबई विद्यापीठ- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर लॉ अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी. कालावधी – एक वर्ष. अर्हता- पदवी.

संपर्क –  http://mu.ac.in/portal/department-of-law/

(५) आयएफएस एज्युकेशन डिपार्टमेंट-

शॉर्ट टर्म सर्टिफिकेट इन सायबर लॉ.  अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी. कालावधी- दोन महिने.

अ‍ॅडव्हान्स्ड सर्टिफिकेशन इन सायबर लॉ. अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी. कालावधी- सहा महिने,

पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेशन इन सायबर लॉ. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी/कालावधी- बारा महिने.

संपर्क – http://www.ifs.edu.in

सायबर लॉसंबंधित अभ्यासक्रम  केल्यानंतर सायबर लॉ एक्स्पर्ट, लिगल अ‍ॅडव्हायजर, सायबर असिस्टंट, इन हाऊस काऊन्सेलर, रिसर्च असिस्टंट अशा उत्तमोत्तम संधी  मिळू शकतात.

या संधी माहिती तंत्रज्ञान कंपनी, पोलीस विभाग, ई- कॉमर्स कंपनी, बँक, वेब डेव्हलपर्स, सायबर सिक्युरिटी कंपनी, सिक्युरिटी ऑडिटर्स, नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, कार्पोरेट हाऊसेस, सार्वजनिक आणि खासगी संस्था इत्यादी ठिकाणी मिळू शकतात.

मी सध्या नववीत आहे. मला भविष्यात मळलेल्या वाटांवरील करिअर करण्यात रस नाही. मला काही तरी वेगळे करायचे आहे. जागतिक शांततेसारख्या विषयांमध्ये मला काम करण्याची इच्छा आहे. मला विज्ञान व व्यवस्थापन या विषयांतही आवड आहे. मला लोकांशी संपर्क साधायला त्यांच्यात मिळून-मिसळून वागायला आवडते. मी कोणते करिअर निवडावे?

हेरंब पाटील

तुझ्या प्रश्नावरून तुला भविष्यात खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत, असे दिसते. मात्र एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याऐवजी तू नीट विचार करून एक किंवा दोन बाबींवर लक्ष केंद्रित केलेले अधिक उत्तम. तुला व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करायचे असेल तर आधी पदवी, नंतर एमबीए ही पदव्युत्तर पदवी घ्यावी लागेल. हा अभ्यासक्रम चांगल्या संस्थेतून करणे गरजेचे आहे. विज्ञान विषयातसुद्धा पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधन अभ्यासक्रम केल्यास उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. जागतिक शांतता हा अतिशय व्यापक विषय आहे. त्यासाठी कोणताही खास वेगळा असा अभ्यासक्रम नाही. तथापि संयुक्त राष्ट्र संघटनेत विविध पदांवर काम करून या क्षेत्रात योगदान देता येऊ शकेल. मानव्यशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी घेतल्यावरही तुला अपेक्षित संधी मिळू शकतात. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, या सर्व संधी तुला पदवी आणि पदव्युत्तर पदवी चांगल्या पद्धतीने प्राप्त केल्यावरच मिळतील. म्हणूनच मनापासून अभ्यास करणे आवश्यक आहे. तुला संवादकौशल्य वाढवावे लागेल. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवावे लागेल. सध्या तरी अभ्यासावर लक्ष दे. शिवाय व्यक्तिमत्त्वाचा चौफेर विकास होण्यावर लक्ष केंद्रित कर.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career opportunities career issue
First published on: 05-10-2017 at 02:49 IST