डॉ. बशीर आज थोडे लवकरच ऑफिसात पोहोचले. त्यांनी गृहीतच धरलं की त्या दिवशीचा डिमांड सप्लायचा डेली रिपोर्ट इतक्या सकाळी काही मिळणार नाही. त्यांनी मग ईमेल्समध्ये डोकं घातलं. थोडय़ा वेळानं त्यांची नजर टेबलावर पडली आणि त्यांना आश्चर्यच वाटलं. आजचा रिपोर्ट चक्क टेबलावर हजर होता! त्यांनी पवनला हाक मारली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तुषार दिसत नाही जागेवर. आजचा रिपोर्ट तूच बनवलास की काय?”

“नाही सर. माझा आता तेवढा टच राहिलेला नाही. तुषार आज रजेवर आहे. रिपोर्ट प्रथमेशनं बनवलाय.  गेले दोन आठवडे तोच रिपोर्ट बनवतोय. तुषारला मी दुसरं काम दिलंय. प्रथमेश नियमीतपणे आणि व्यवस्थित त्याचं काम करतो आहे. मला त्याच्या दोन आठवडय़ांच्या रिपोर्ट्समध्ये एकही चूक सापडली नाही.”

“अरे वा! शिवाय आज इतक्या लवकर रिपोर्ट तयारही आहे!”

“सर, रिपोर्ट बऱ्याचदा लवकर तयार असतो. मी आल्यावर तपासून मग तुम्हाला देतो म्हणून तो तुमच्या टेबलावर यायला थोडा उशीर होतो.”

“म्हणजे हा . प्रथमेश .. ऑफिसला लवकर येतो की काय?”

“हो सर. त्याला सकाळी निवांतपणे  रिपोर्ट बनवायला खूप आवडतं. तो म्हणतो कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं. बरीचशी तयारी तो आदल्या संध्याकाळी उशिरा बसून करतो.”

“आपला इतका गुंतागुंतीचा रिपोर्ट हा मुलगा इतक्या लवकर कसा शिकला?”

“सर, थोडं क्रेडिट त्याचं, थोडं माझं पवन म्हणाला.

“मान्य आहे. आणि मॅनेजर म्हणून कौतुक आहे तुझं.”

“धन्यवाद सर. शेवटी चिकाटीनं काम करणारी माणसं हेरणं, त्याना प्रेरित करणं आणि त्यांना टिकवून ठेवणं मॅनेजर म्हणून आपलं कामच नाही का?”

“अर्थातच!”

प्रथमेश या डिपार्टमेन्टमध्ये लागला त्या दिवसापासून त्याला तुषारबरोबर लावून देण्यात आलं. तुषारनं मग त्याला त्याच्या डेली रिपोर्टिगच्या कामातल्या सोप्या आणि रटाळ गोष्टी शिकवल्या. सगळ्यात वैतागवाणं काम म्हणजे सगळ्या रिजन्सकडून रोज डेटा गोळा करणं. प्रथमेशनं हे काम मग स्वत:कडं घेतलं. पाहता पाहता तुषारनं मग सगळी गधामजुरी प्रथमेशला दिली. प्रथमेशनं ती आनंदानं आपल्या खांद्यावर घेतली.कधीमधी तुषार प्रथमेशला डेटा अ‍ॅनॅलिटिक्समधलं काहीतरी दाखवायचा, सांगायचा. हा हा म्हणता तीन-चार महिने गेलेही.

एक दिवस बशीर सरांचे बॉस सिंग साहेब येणार होते. ते संपूर्ण एशिया रिजन पाहत. त्यांना भारताच्या मागणी-पुरवठय़ाची परिस्थिती डोळ्याखालून घालायची होती. पुढचे स्ट्रॅटेजिक निर्णय घ्यायचे होते. ऑफिसात बरेच दिवस त्यांच्या येण्याची तयारी चालली होती. त्यांच्या मीटिंगचा एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे भारतातल्या मागणी पुरवठय़ाची स्थिती. बशीर स्वत:च सिंग साहेबांना घेऊन येणार होते. इकडं पवन ऑफिसला लवकर आला होता. त्यानं तुषारलाही लवकर यायला सांगितलं होतं. पण तुषार सकाळीच चक्कर येऊन पडला होता आणि त्याला हॉस्पिटलाइज केलं होतं. पवन अगदी हताश झाला. इतक्यात त्याला प्रथमेश दिसला.  प्रथमेशनं तोवर केलेलं सगळं पवननं हातात घेतलं ..आणि त्याचे डोळेच विस्फारले. रिपोर्ट जवळजवळ तयार होता!

“कधी शिकलास तू हे सगळं?”, त्याने विचारलं.

“सर, इतके दिवस तुषारशेजारी बसून शिकतोच आहे ना सगळं.”

“हो. पण अ‍ॅनॅलिटिक्सही तुला येऊ  लागलं हे ग्रेटच! डेटाची जमवाजमव करणं एकवेळ सोपं आहे. हे किचकट आणि अनुभवाचं कामपण तू करू लागलास?! बरं चल फायनल ग्राफ्स बनवायला घेऊया.”

“पवन सर, तेही तयारआहेत.”

“प्रथमेश! माझ्यातर्फे तुला एक डिनर!”

त्या दिवसापासून सप्लाय डिमांड स्टॅटस रिपोर्टिगचं सगळं काम पवननं प्रथमेशकडं दिलं. सिंग साहेबांच्या भेटीच्या महत्त्वाच्या दिवशी रिपोर्ट प्रथमेशनं बनवला होता, आणि तेव्हापासून तोच हा रिपोर्ट बनवतो आहे, हे बशीर सरांना आज कळलं. म्हणायला गेलं तर ही फार साधी गोष्ट. प्रथमेशनं तुषारबरोबर काम करायला सुरुवात केली, हळू हळू तो सगळं शिकला. मग एके दिवशी तुषार नसताना त्यानं सगळं काम करून दाखवलं आणि तो हिरो झाला! पहिलं म्हणजे प्रथमेशने रोजचं काम न कुरकुरता अंगावर घेतलं आणि नियमितपणं करायला सुरुवात केली. रोज डेटा पाठवायला लोकांच्या मागं लागायचं. कधी गोडीगुलाबीनं तर कधी बशीर सरांचं नाव सांगून. प्रथमेशची इतर रिजनच्या सगळ्या लोकांशी चांगली ओळखच झाली होती. हे सगळे लोक त्याच्यापेक्षा सिनियर, काही तर अगदीच वरिष्ठ आणि अनुभवी. अशा सगळ्या लोकांशी गोडीगुलाबीनं बोलून, कुणालाही न दुखवता, कुणाचाही वैयक्तिक अपमान न करता त्यांच्याकडून रोज डेटा मिळवायचा. अडीअडचणीला मदतही करायची. वेळचेवेळी नियमितपणे सगळ्यांकडून डेटा मिळवण्याच्या प्रथमेशच्या हातोटीमुळे तुषार त्याच्यावर विसंबून राहू लागला. लवकरच प्रथमेशनं तुषारचा विश्वास संपादन केला. यानंतर प्रथमेशनं अगदी हळूहळू रूटीन डेटा जमविण्यापलीकडच्या गोष्टीत अलगद लक्ष घातलं. डेटा अ‍ॅनालिटिक्स, जो खरा रिपोर्टिगचा गाभा आहे, तो शिकायला सुरुवात केली. पूर्ण रिपोर्ट त्यानं कधी ऑफिशियली बनवला नव्हता. पण तो त्याचा स्वत:चा रिपोर्ट उशिरा थांबून बनवायचा, दुसऱ्या दिवशी तुषारनं फायनल केलेल्या रिपोर्टशी जुळवून बघायचा. काही आठवडय़ातच प्रथमेशला कामाची नस सापडल्यासारखं झालं. मग हे सगळे पैलू प्रकर्षपणे वरिष्ठांना दिसण्याची संधी चालून आली आणि या नोकरीत तो चपखलपणे बसून गेला. करिअरमध्ये यशस्वी होणं असंच तर असतं. पण मग असे सगळे गुण नसलेली अजिंक्यसारखी अतिहुशार, अव्वल मुलं कशी यशस्वी होणार? पाहूया पुढच्या लेखात.

मिलिंद पळसुले palsule.milind@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career planning
First published on: 10-12-2016 at 05:01 IST