सी सॅट पेपरमधील गुणांच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा विस्तार अंकगणित आणि बुद्धिमत्ता या घटकाचा आहे. यामध्ये ६२.५ गुणांसाठी २५ प्रश्न विचारले जातात. ढोबळ मानाने हा विभाग अंकगणित, तर्कक्षमता आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा तीन विभागांत विभागता येईल. या तीन उपघटकांमधील प्रश्नांचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रकार सोडविण्याचा सराव करणे आणि त्यांच्यासाठीची सूत्रे, युक्त्या, टिप्स लक्षात ठेवणे हे सगळे उगाचच आव्हानात्मक वाटते. पण मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पाहिले तर यातील महत्त्वाचे प्रकार शोधता येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंकगणित या उपघटकामध्ये गणिती क्रिया (६ ते ८ प्रश्न) आणि संख्यामालिका (२ ते ५ प्रश्न) हे मुख्य प्रकार आहेत. यांमध्ये शेकडेवारी, व्याज, नफा तोटा, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, समीकरणे, काळ-काम-वेग अंतर, माहिती विश्लेषण आणि संभाव्यता हे घटक विशेष महत्त्वाचे आहेत. यांच्यासाठीची सूत्रे आणि १ ते ३० पर्यंत पाढे पाठ असतील तर ही गणिते कमी वेळेत आणि आत्मविश्वासाने सोडविता येतात. संख्यामालिका सोडविण्यासाठी १ ते ३० पर्यंतचे पाढे, १ ते २० पर्यंतचे वर्ग आणि १ ते १५ पर्यंतचे घन पाठ असतील तर सर्वसाधारण गणिती प्रक्रिया करून हे प्रश्न सोडविण्यातही आत्मविश्वास मिळवता येतो. यामध्ये पहिले पाच घटक एकत्रितपणे अभ्यासावेत. नफ्याचे गुणोत्तर किंवा टक्केवारी, व्याजातील फरकाचे प्रमाण अशा प्रकारे यांच्या एकत्रित उपयोजनाचे प्रश्न विचारण्यावर आयोगाचा भर दिसतो. सूत्रे पाठ असावीतच पण हे घटक सोडविताना का आणि कसे हे नेमकेपणाने समजून घेऊन सराव केल्यास कशाही प्रकारे प्रश्न विचारला तरी नेमकी कोणती प्रक्रिया करायला हवी हे लक्षात येते.

तर्कक्षमतेमध्ये विधानांवर आधारित निष्कर्ष पद्धती (किमान १ प्रश्न), नातेसंबंध (१ प्रश्न), बठकव्यवस्था (१ प्रश्न) हे मुद्दे समाविष्ट होतात. प्रथमदर्शनी क्लिष्ट वाटणाऱ्या या प्रश्नांचा सराव केल्यास आणि त्यांच्यामागचे नेमके तर्क समजून घेतल्यास हेही प्रश्न वेळेच्या मर्यादेत सोडविणे शक्य होते. निष्कर्ष पद्धतीमध्ये दिलेली विधाने खरी मानून ती वेन आकृत्यांमध्ये मांडून प्रश्न सोडवावेत. नातेसंबंधांवरील प्रश्नांसाठी त्यातील एका पात्राच्या जागी स्वत:स कल्पून ते प्रश्न सोडवावेत. बैठक व्यवस्थेचे प्रश्न सोडविताना डावी आणि उजवी बाजू कटाक्षाने लक्षात घ्यावी.

बुद्धिमत्ता चाचणी घटकामध्ये आकृतीमालिका (० ते २ प्रश्न ), अक्षरमालिका (२ ते ४ प्रश्न), व्यक्तींचा क्रम, छंद, व्यवसाय यांच्या संयोजनावरील प्रश्न (० ते २), सांकेतिक भाषा (० ते २ प्रश्न), इनपूट आऊटपूट (० ते २ प्रश्न ) या महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो. घडय़ाळ, कॅलेंडर यांवरील प्रश्नही (० ते २) या विभागात समाविष्ट होतात. आकृती मालिकांवरील प्रश्न सोडविताना निरीक्षणशक्ती आणि विश्लेषण क्षमता यांचा वापर आवश्यक ठरतो. अक्षरमालिका सोडविण्यासाठी इंग्रजी वर्णमाला एकाखाली एक सरळ आणि उलटय़ा क्रमाने लिहावी आणि त्यांना त्याच क्रमाने आकडे द्यावेत. या आधारे अक्षरमालिका आणि आकृतीमधील अक्षरांचे प्रश्न सोडवावेत. संयोजनावरील प्रश्न सोडविण्यासाठी दिलेली माहिती टेबलमध्ये भरावी. सांकेतिक भाषेवरील प्रश्नांसाठी एलिमिनेशन पद्धतीने शब्द व त्यांचे संकेत शोधावेत. ईनपुट आऊटपुट प्रश्नांसाठी दिलेल्या शब्द / संख्यांना क्रमांक देऊन त्यांचे क्रम कशा प्रकारे बदलत जातात त्यांचे नियम शोधावेत.

हे सर्व घटक दहावीपर्यंतच्या अभ्यासाच्या आधारावर सोडविता येतात. चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेची गाइड्स, आठवी; नववी; दहावीची प्रज्ञा शोध परीक्षेची गाइड्स तसेच स्पर्धा परीक्षा अंकगणित या आणि अशा वरील घटकांचा समावेश असणाऱ्या पुस्तकांचा वापर करावा. राष्ट्रचेतनाचे राज्यसेवा अभ्यास प्रश्नपत्रिका हे तसेच अगरवाल यांचे यावरील पुस्तक यासाठी उपयोगी ठरतील.

गेल्या चार वर्षांतील उत्तीर्ण उमेदवारांच्या गुणांच्या विश्लेषणावरून हे लक्षात येते की, जे उमेदवार या घटकांमध्ये किमान पन्नास ते साठ टक्के प्रश्न सोडवितात ते नक्कीच चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात. त्यामुळे या मुद्दय़ांचा बारकाईने अभ्यास व सराव केल्यास २५ ते ३५ गुण निश्चितपणे मिळवता येतात.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Csat arithmetic and intelligence mpsc exam
First published on: 30-03-2018 at 01:33 IST